Tuesday, June 15, 2010

या सार्‍याच्या पलीकडे माझं स्वत:चं असं काय हा विचार अस्वस्थ करतो. आलोय तसा जाणार. यात वेगळं काहीच नाही. डोळ्याची पापणी मिटायच्या आत सगळं घडून जातं. कधीतरी असं वाटत रहातं की हे स्वप्न. दचकून जागा होतो आणि पहातो तर पुन्हा स्वप्नच. म्हणजे सत्य काही नाही. सगळच उजाड. उजेड कुठेच नाही. सगळं काही निराश करणारं. तीच माणसं, तीच वहानं, तोच वारा, तोच पाऊस, तेच आभाळ, तेच आकाश, तेच डोंगर, त्याच दर्‍या, तोच दर्या, तेच मासे.


विरून जाणार सारं काही नवं नवं वाटणारं माझ्याच रक्तात! अंगाची कातडी फाडून बाहेर येईल असं वाटणारं रक्त सुद्धा कधी कधी ईमान सोडत. जाणवत रहातो फक्त एक सजीव चाळ्यांचा निर्जीव खेळ! सार्‍या फुकटच्या गोष्टी. विकतचं सुद्धा फुकटचं! दोन श्वास अजून मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड! निरर्थक. अगम्य. डोक्याचा पार भुगा करणारे नियोजनबद्ध विचार. पाण्यात पडलं की पोहायला येतं हे ऐकून पाण्यात स्वत:ला झोकून द्यावं तर नाकातोंडात पाणी जाऊन जड जड होऊन शेवटी तळाशी जाऊन बसायचं. तिथे पुन्हा गर्दी. कोलाहल, जगण्यासाठीचा कर्कश्य चार-चार पैशांचा तमाशा. त्यात बरेच बघे. कुठे लग्गा लागतोय का याचा विचार करणारे मूर्तीमंत मतीमंद. सगळीकडे नागडेपणा. मग जीव भरला की पुन्हा वर वर यायचं. हलकं हलकं व्हायचं पुन्हा जड जड होण्यासाठी! बरचं हलकं. स्वत:च्या काळजावर 'स्वस्त' अशी पाटी कोरून लावायची किंवा 'भरघोस डिस्काउंट' असं काहीतरी वर लिहायचं. त्यासाठी आधी काळजाची मूळ किंमत कमी करून ठेवायची. म्हणजेच तुफ्फान हलकं व्हायचं. मिळालेला नफा नवं काळीज विकत घेण्यासाठी वापरायचा. कोंबडयांसारखी धो धो पैदास. एक एक काळीज अजून कमी कमी किंमतीला विकायचं आणि शेवटी कुणीतरी मानेवरून सुरी फिरवणारचं या धास्तीत जगायचं. कोंबड्यासाठी चरायला मुक्त कुरणं नसतात, त्यांच्या नशीबी खुराडं. काळजाच्या नशीबी तरी दुसरं काय येतं म्हणा? हे चक्र 'चालु'च. जीवाभावाच्या पत्नी इतकं प्रामाणिक आणि वेश्येइतकं चुकार! भिकारीपणा कणाकणात भिनलाय. मेंदू शिणलाय. विचारांची अव्यक्त आवर्तन. सारं काही 'चालु'च. तिडीक म्हणजे तिरस्कार पण पोटतिडीक म्हणजे माया. आश्चर्य! हशा! म्हणजे सगळा मार्ग पुन्हा पोटातूनच. जन्मच साला पोटातून!

... एक अव्यक्त