Wednesday, December 15, 2010

सवाई गंधर्व २०१० – मनोगत

या वर्षीचा सवाई गंधर्व अद्वितीय झाला. पुणेकरांनी आनंदाचा अक्षरश: जल्लोश केला. स्वरांच्या वर्षावात चिंब भिजून घेता घेता रुचकर पदार्थांची चव चाखण्यात अनेक जण गढून गेलेले दिसले. मुख्य मंडपाच्या मागच्या बाजूस एक स्पीकर बसविला असल्यामुळे कडाक्याच्या थंडीत गरम गरम चहाचा आस्वाद घेत आणि सिगारेटचे झुरके ओढीत त्या स्पीकरजवळ कोंडाळे करून उभ्या असणार्‍या व्यक्तींमध्ये मी सहजी मिसळून गेलो.

पण या वर्षीचा सवाई माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला तो अजून एका गोष्टीमुळे. गाण्याच्या घराण्यांबद्दल आजवर उत्साहाने बोलणारा मी, सवाई संपताच काहीसा मूक झालो. हे चार दिवस स्वसंवाद अगदी भरभरून झाला आणि काही गोष्टी मनात पक्क्या झाल्या. आता बुडून रियाज करायचा ही त्यातली एक. पण त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे घराणेशाहीच्या भिंती उभारण्यात काहीच अर्थ नाही हे आत खोलवर कुठेतरी जाणवलं. मेवाती, किराणा, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार, ग्वाल्हेर, बनारस, इटावा आणि इतर अशाच घराण्यांच्या गायकांनी, वादकांनी उभं केलेलं दैवी स्वरविश्व आणि त्यांना अगदी मनमुराद मिळणारी दाद पाहून वाटलं की शेवटी उत्तम गाणं हेच महत्वाचं! उत्तम गाणं घराणेशाहीत रमत नाही. घराण्यांच्या भिंती तोडून आक्रमकरित्या नामशेष करण्याची गरज अशा गाण्याला पडत नाही किंबहुना अशा गाण्यापुढे या भिंती मातीचं ढेकूळ पाण्यात विरघळावं तशा विरघळून जातात. हा भेद नाहीसा होताच सारी घराणी हातात हात घेऊन फेर धरून नाचतात. "आनंदाचे डोही आनंद तरंग" या उक्तीचा साक्षात्कार होतो. पृथ्वीवरील सार्‍या नद्यांनी शेवटी सागराला जाऊन मिळावं आणि सागरानी त्यांना प्रेमानी सामावून घ्यावं अशाच काहीशा त्या वैविध्यपूर्ण मिलाफातून उमटतो एक ताल, एक सूर, एक नाद आणि शेवटी उरतो वैश्विक आत्मानंदाचा संजीवन सखोल गाभा! नाथांच्या घड्यासारखा, कधीही भरून न येणारा!

कधीही भरून न येणारा आनंद म्हणजे अपूर्णता आणि अपूर्णतेचा आनंद म्हणजे जीवाला लागलेली परिपूर्णतेची आस! ती आस लागो आणि तिचा व्यास दिवसागणिक वृद्धींगत होत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

केदार केसकर