Wednesday, October 19, 2011

घुसमट किंवा तत्सम काहीतरी...

कूपमंडुक वृत्तीची माणसं पाहीली की माझी घुसमट होते. अजूनपर्यंत माझ्याही हातून काहीच विशेष घडलेलं नाही याची प्रचंड खंत माझ्या मनात ठाण मांडून बसलेली आहे. त्यामुळे मीही अशा माणसांच्या पंक्तीत सहज बसतो हे कबूल करण्यात मला काहीच वावगं अथवा गैर वाटत नाही. पण त्यांच्या पंक्तीत मी बसलो तरी अजूनही अशा माणसांमध्ये मी उठून दिसत नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाजू. पंक्तीत मोक्याची जागा पटकावण्यासाठी अशा माणसांमध्ये प्रचंड चढाओढ चालू असते. तशी इच्छाही मला होत नाही अन् ही घुसमटच मला त्यांच्यापासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करते.

नोकरी आहे म्हणून करायची. संसार आहे म्हणून करायचा. मुलं आहेत म्हणून वाढवायची. आयुष्यात तडजोड आहे म्हणून ती ही करायची. कितीतरी वेळा मनाविरुद्ध गोष्टी झाल्या तरी त्या मूकपणानी पहायच्या आणि त्यांचं खापर नशीबावर फोडायचं हे सारं कसं जमणार? सकाळी पिसाटासारखं घरातून निघायचं आणि संध्याकाळच्या वेळेस थकून भागून घरी परतायचं हा आमचा ठराविक कार्यक्रम. यात कुठेच काहीच कमी नाही? कधीतरी मला वाटतं की प्रोग्राम केलेल्या रोबोटसारखा मी या अशा माणसांसोबत संवेदनाहीन होत चाललोय. पण हेही सत्य की अशी माणसं आहेत म्हणून हे जग चाललय. सगळेच Steve Jobs, Vijay Mallya कसे होणार? पण म्हणून कोणी होणारच नाही हा निराशावादी विचार मला नको वाटतो.

मी जिच्यात मजूर आहे त्या कंपनीचं स्वप्न पुढील ३ वर्षात १००० कोटींचा revenue attain करायचं आहे ना मग त्याच्यासाठी तहानभूक विसरून कामाला लागायचं. Full dedication... hardwork... आणि मग हे स्वप्न पूर्ण झाल्यावर एक महागडं टायटनचं घड्याळ बक्षीस म्हणून घ्यायचं. मोठ्या समारंभात... सगळ्या लोकांसमोर....

छे.... आता तर मला हे असं काही घेण्याची सुद्धा लाज वाटते. त्या घड्याळ्याकडे एकदा नजर गेली की मी आयुष्यातल्या किती सोनेरी क्षणांचा बळी दिलाय हे संवेदनाक्षम आणि तर्कसंगत माणसाला आठवल्याशिवाय राहील का? एखाद्या वेळेस स्वत:ची राहून गेलेली एखादी अगदी छोटी इच्छा पूर्ण करण्यासाठी निवांत वेळ हवा असेल....एखाद्या वेळेस मुल आशेनी बापाकडे पहात असेल त्याला बागेत नेण्यासाठी... एखाद्या वेळेस आई वडीलांना एका आधाराच्या बाहूची गरज असेल... कपाळावर आलेली एक बट कानामागे सारण्यासाठी कुणी पत्नी क्षणभराच्या स्पर्षासाठी आसुसलेली असेल याचा विचार कोण करणार?

छे... मला वेळच नाही स्वत:ची स्वप्न जगायला. स्वत:चं काही घडवायला. मी दुसर्‍यांची स्वप्न जगण्यात मस्त आहे. दिवसेंदिवस परधार्जिणा होत चाललोय.

"Thank you for your dedication and outstanding efforts" असं काहीसं छापलेली सर्टिफिकेटस् माझ्याकडेही आहेत. शोकेसची शोभा वाढवण्यापलिकडे त्याचा काय उपयोग? किती वेळा ते सर्टीफिकेट पाहील्यावर मनात पुन्हा पुन्हा शिरशिरी येते? आपण काहीतरी करून दाखवलं असं वाटतं? आणि मग एक प्रश्न उभा राहतो.... खरंच आपण काय करून दाखवलं? केदार, You are not made to live this small हे कितीतरी वेळा वाटून जातं.

छे... काहीतरी केलं पाहीजे... वेगळं.. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:साठी काहीतरी केलं पाहीजे... स्वत:चं काहीतरी हवंच.... कुणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप नाही पण आपण जन्माला का आलो याचं उत्तर तरी मला आता हवंय. Knowing that, has started to become my biggest obligation.

आयुष्याच्या संध्याकाळी हा घालवलेला सारा वेळ आणि वाया घालवलेली स्वप्न क्षीण डोळ्यांनी पहायची फक्त एका आनंदात की मी चिक्कार दलाली गोळा केली माझ्या कुटुंबासाठी दुसर्‍यांची स्वप्न जगून. कंपनीची किंमत १००० कोटी झाली आणि माझ्या अमोल आयुष्याची आणि स्वप्नांची किंमत झाली काही लाख.

Have I not been downgrading myself all this time?
Deep down somewhere I know...
Its not about the price that I paid. Its about the real worth.

आणि मग दूर मावळणार्‍या सूर्याकडे पहातांना एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा....

"Was it all worth it?"

तुमचा (पराकोटीचा अस्वस्थ),

केदार


5 comments:

Unknown said...

तुमचे लिखाण आवडले, मनापासून लिहिले आहे. असेच लिहित राहावे, आम्ही वाचत राहूच.

sonal m m said...

"सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो"

Unknown said...

it is definitely not worth it, मला कळत नाही का मी शनिवार रविवार काम करु? का संध्याकाळी ६ वाजे नंतर office मध्ये थांबु? जर फक्त अशीच लोक पुढे जाणार असतील तर मला त्या लोकांबरोबर नाही जायचे, थोडी हळु प्रगती होईल पण ती होईलच, ३-४ वर्ष कुत्र्यासारखे काम करुन डोक्यावरचे केस घालवायचे आणि नंतर hair transplant चे operation करायचे हे मला पटत नाही.

स्वत:साठी नक्कीच काही तरी केले पाहिजे हे मात्र खरे आणि त्याला जास्त उशिरसुद्धा करायला नको हे ही तितकेच खरे.

Kedar said...

Thanks all for your comments!

Sonal,

धूप मे चलने का गम नही, सफर अच्छा होना चाहीये

Kedar

Kedar said...

मनापासून आभार merC_ry, Gaurav.

लोभ असावा,
केदार