Saturday, December 31, 2011

नववर्षाच्या शुभेच्छा!

३१ डिसेंबर साजरा करण्याच्या माझ्या संकल्पना बदलायला लागल्या आहेत. पूर्वी ३१ डिसेंबरसाठी आठवडाभर आधीपासून तयारी चालू असायची. नवे कपडे, त्या दिवशी ज्या क्लबमध्ये पार्टीला जायचं असेल त्याचे पासेस, ग्रुपची जमवाजमव वगैरे गोष्टी मी आनंदाने करायचो. पण आता ते काहीच नको वाटतं. नाचणं, गर्दीला कसंतरी बाजुला सारत जाऊन काहीतरी अर्वाच्य खाणं-पिणं, ते काऊंटडाऊन आणि बरोबर १२ वाजता एकमेकांना मिठी मारून Happy New Year असं जोरात ओरडणं. पुन्हा पार्टी संपली की डीजे invariably सगळ्यांना Happy New Year wish करतो आणि पुढे म्हणतो Have safe sex. आता मला या सगळ्या गोष्टी हास्यास्पद वाटायला लागल्या आहेत.

३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन्सचा माझ्या मते अर्थ आता फक्त एका 'सॉरी' आणि एका 'थॅंक्यू' पर्यंत मर्यादित होऊ लागला आहे. मागील वर्षी ज्या गोष्टी हातुन चुकीच्या झाल्या त्याबाबतीत सॉरी आणि या चुका सुधारण्यासाठी मला जे नवं वर्षं बहाल करण्यात आलं आहे त्या बाबतीत मनापासून थॅंक्यू.

अर्थात, माझा दृष्टीकोन याबाबतीत बदलला म्हणजे आजही जी माणसं नाचतात, दारू पितात ती वाईट आहेत असा मुळीच नाही. या सार्‍या गोष्टी शेवटी आयुष्यातील सौंदर्यशोधनाचे प्रयत्न आहेत आणि सौंदर्य कुणाला कशात दिसेल हे आपण कसं ठरवणार? मला भावणार्‍या सौंदर्याचा शोध मात्र मला लागला आहे इतकाच त्याचा अर्थ!

सार्‍यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा,
केदार

Thursday, December 22, 2011

माणुसपण देगा देवा, नाही देवत्वाचा हेवा!

काही माणसं अध्यात्माच्या नावाखाली मनात भयगंड बाळगून वावरत असतात ते पाहून मी सुन्न होतो. सुन्न अशासाठी की मी ही त्याच संस्कृतीतला. पण आताशा माझे विचार थोडेसे सत्याच्या जवळ यायला लागले आहेत. देवाला हे आवडतं, ते आवडत नाही. हे चुकीचं झालं की देव रागावतो. देवाला योग्य वेळेला नैवेद्य दाखवला नाही तर देव पाप करतो. देवाला काय, बाकीचे धंदे नाहीत? त्यानी आपल्याला फक्त आपण केलेल्या चुकींच्या शिक्षा करण्यासाठी जन्माला घातले आहे काय? बापरे... अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आत्ता घोळत आहेत. त्यांची उत्तरं फक्त माझी मलाच माहीत. दुसर्‍यांना त्यांचं ना सोयर ना सुतक. त्यांना ज्या गोष्टी करण्याची सवय झाली आहे ते त्या गोष्टी करणारंच. करा की... पण दुसर्‍यांना का तुमच्या देवाबद्दलच्या गलिच्छ संकल्पनांनी विणलेल्या जाळ्यात ओढता?

देव म्हणजे काय याचं उत्तर मोठमोठे गणिती, शास्त्रज्ञ अजून देऊ शकले नाहीत. याचा अर्थ देव नाही असा काढायचा का? छे छे... माझ्या मते देव आहे... नक्की आहे... पण तो दयाळु आहे... कनवाळु आहे... एखादा मनुष्य २० किलोमीटर प्रवास करून भुकेला आपल्या दर्शनाला किंवा पुजनाला आला आहे, मग भले तो येतांना दोन फुलं कमी का घेऊन येईनात, त्याचा चेहरा उतरलेला का असेनात, त्याची दाढी वाढलेली का असेनात... तो माझा आहे असाच विचार देवाच्या मनात येत असावा. पण अध्यात्माचं थोतांडं माजवणारे काय काहीही बोलतात. त्याचा विचार मी कुठपर्यंत करावा? मनात भिती असावीच पण भयगंड नसावा हे नक्की. भिती आपल्याला चुकीचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करेल पण भयगंड आपल्याला पाऊलंच उचलु देणार नाही, मग आपल्या मनुष्यपणाचं काय करायचं? माणसाचा गुणधर्म चुका करणं, त्यातून शिकणं. हा गुणधर्म जर देवानीच माणसात घातला असेल तर तोच देव हातून चुकुन झालेल्या चुकांसाठी माणसाला शिक्षा करेल ह्यावर माझा तरी नाही बुवा विश्वास बसत.

देव निळ्याशार आकाशासारखा निरामय असेल, भरून आलेल्या काळ्या आभाळासारखा गुरगुरत अंगावर येईल असं मला तरी वाटत नाही. देव पाण्याच्या संततधार नैसर्गिक प्रपातासारखा एकसंध आणि शुद्ध असेल, तो साठुन राहिलेल्या डबक्यासारखा कळकट्ट आणि संकुचित नक्कीच नसेल. देव समईच्या ज्योतीप्रमाणे शीतल असेल, तो भसाभ्भस तेज अंगावर फेकून आपलं देवपण सिद्ध करणारा असेल असं मला वाटत नाही. आपलं बाळ आपल्यापाशी आलंय, ते थकलंय, त्याच्या हातून आपल्यासाठी होत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याबद्द्ल त्याला खरी आत्मीयता आहे म्हणून होत आहे हे देवाला कळत नसेल? कोण आई दमून आलेल्या मुलाला किंवा मुलीला पाय चेपण्यासाठी तासनतास राबवून घेईल? माझ्या तरी पहाण्यात अशी आई आजवर आलेली नाही. मग 'माऊली' असं बेंबीच्या देठापासून केकाटायचं आणि त्याच 'माऊली'ला घाबरून बिचकुन रहायचं यात कितपत तथ्य आहे? बहूतेक अशी माणसं अर्धवट तरी असतात किंवा अतिशहाणी तरी यावर माझा ठाम विश्वास बसत चालला आहे. संताघरचं अन्न मिळणार म्हणून ही माणसं काहीही करतील, पण अंगात खरखुर संतंपण भिनावं यासाठी ही माणसं काय विशेष करतात? अरे बेट्यांनो, प्रसाद खाऊनच जर सुख मिळणार असेल तर मग प्रसादासाठी दर दिवशी रांगेत उभे रहाणारे भिकारी आज एकावेळच्या अन्नापासून वंचित का रहातात? हा साला सगळा स्वार्थ आहे. यात शुद्ध भावना किती आणि वासना किती हे त्यांचं त्यांनाच माहीत. आणि अगदी खरी भावना असली तरीही जोवर देवाधर्माच्या या बाजारात त्यांच्यासारख्यांनी निर्माण केलेल्या दिखाऊ संकल्पना आहेत तोवर देवाबद्द्लचा भयगंड माणसाच्या मनात तसाच राहील आणि कालांतराने तिथे अंधश्रद्धा तरी निर्माण होईल किंवा अनास्था तरी!

माणसातलं माणुसपण मेलं की त्याच्यातला देवही मरतो असं मला वाटतं आणि म्हणुनच देव आपल्यासोबत असावा असं वाटत असेल तर माणुसपण जपणं हा इतकाच सोपा उपाय रामबाण आहे. बाकी हे झाले माझे विचार... थोडे जहाल असतीलही...पण ज्या देवाने मला निर्माण केलं त्याच्याविषयी आणि मला जसं निर्माण केलं त्याबाबतीत कृतज्ञ रहाण्याचं सोडून त्यानी माझ्यात ओतलेल्या जिवंत माणुसपणाशी प्रतारणा करण्याचा मुर्खपणा मी आजवर करत आलो. आता बास! अध्यात्मात उंचावर पोचणं यापेक्षाही उंची गाठणं जास्त महत्वाचं आणि उंची गाठायचीच असेल तर देवाधर्माबद्द्लचा डोळस दृष्टीकोन अंगिकारणं याला पर्याय नाही. शेवटी...

जेथे जातो तेथे तो माझा सांगाती ।
चालविलं हाती धरोनिया ।।

तुमचा(काहीसा उद्विग्न),
केदार

Monday, December 19, 2011

आज संध्याकाळी...


आज संध्याकाळी,
घुसमटलेपण असह्य झालं,
मनात पाचोळा पाचोळा झालेल्या स्मृतींशी,
एकांतात बोलण्यात बराच वेळ निघून गेला.
तरी त्यांचा चोथा झाला असं अजून म्हणवत नाही.

कारण ते घुसमटलेपण मला कुठेतरी हवयं.
तुझ्या आठवणींचं ते द्योतक आहे.
माझ्यातील उर्जेचा ते स्त्रोत आहे.

समोर सूर्य अस्ताला चाललाय.
आणि मी तुझ्यासोबत....

छे.... तु आहेस कुठे?
आहेत फक्त तुझ्या स्मृती... काळोखात नकळत विरणार्‍या...
घुसमटलेपण तीव्र करणार्‍या...

अन् तरीही....
तुझ्या आठवणींत रमण्यासारखी रमणीय संध्याकाळ नाही.

..
केदार