Saturday, September 1, 2012

'पाऊसवाट - एक कोलाज' documentation


बर्‍याच वेळेस मनात असूनही ती गोष्ट करणं राहून जातं. तसंच राहून गेलं बरेच दिवस "पाऊसवाट" च्या प्रकाशनाचा व्हीडीओ अपलोड करायचं. तो आज शेवटी अपलोड झाला. आज तुमच्यासोबत share करीत आहे. हे प्रकाशन समारंभाचे documentation आहे आणि ते प्रेमाने आणि अत्यंत कष्टाने केलेलं आहे माझा मित्र बन्सीधर किंकर याने!

Thanks Bansi for doing this! I truly value it!तुमचा,
केदार
Monday, August 27, 2012

'पाऊसवाट-एक कोलाज' कार्यक्रम आज साताऱ्यात

'पाऊसवाट - एक कोलाज' या माझ्या पुस्तकावर आणि त्याच्या संकल्पनेवर आधारित पहिला संगीत कार्यक्रम काल २६ ऑगस्ट रोजी सातारा येथील नगर वाचनालयात झाला. त्याची 'दैनिक ऐक्य' मधील ही न्यूज!

तुमचा,
केदार

Monday, July 30, 2012

एक अविस्मरणीय मैफल

काल हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील 'खमाज' थाटावरील कार्यक्रमात पं संजीव अभ्यंकर यांचे गाणे झाले. संजीवदादांनी सुरूवातीस 'रागेश्री' व नंतर 'देस' पेश केला. त्यांनी गाण्याची सांगता 'खमाज-बहार' या रागातील दृत बंदीशीने केली. त्या गाण्यातून रसिकांना नेहेमीप्रमाणेच उत्तुंग कलाकृतीचा नमूना ऐकण्यास मिळाला पण त्यापेक्षाही जास्त मी आनंदात होतो ते दादांना साथ करण्याची संधी मिळाली म्हणून! हे काही फोटोज.
तुमचा,
केदार


Sunday, July 29, 2012

संसार

कधी म्हणतेस... "घरातलं तेल संपलंय, साखर संपलीय, तांदूळ संपलेत..."
मी येतो घेऊन वाण्याच्या दुकानातून... नेहमीसारखं...
संसारासाठी नाहीतरी यांची गरज असतेच...

पण आज अकस्मात म्हणालीस...
"समजूतदारपणा संपलाय, गोडवा संपलाय, विश्वास तेलासारखा सांडून गेलाय...
सांडलेलं तेल हातानी निपटून घेत भरलं तरी त्याचा काय उपयोग?"

अन् मी म्हणालो...
"काही नाही तर त्या तेलाची एक पणतीच लाव घरात...
तोवर मी बघतो बाकीच्या सामानाचं..."

(संसारासाठी खरंतरं याचीच गरज जास्त असते)

तुमचा,
केदार
२८-जुलै-२०१२

Monday, July 16, 2012

Tuesday, June 5, 2012

'पाऊसवाट - एक कोलाज' प्रकाशन सोहळ्यातील काही क्षण...

३ जून २०१२, रविवारी माझ्या पहिल्या पुस्तकाचे 'पाऊसवाट - एक कोलाज'चे प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे झाले. त्या सोहळ्यातील काही क्षण...

मनोगत व्यक्त करताना


प्रकाशन क्षण
तुमचा,
केदार

Thursday, May 24, 2012

'पाऊसवाट - एक कोलाज' पुस्तक प्रकाशन


मित्रांनो, 

आयुष्यातले काही क्षण मोहोरलेले असतात. असाच एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात ३ जून रोजी येत आहे. माझ्या प्रथम पुस्तकाचे प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे ३ जूनला होत आहे. त्याचा हा वृत्तांत. 

आजच्या या धावपळीच्या स्पर्धायुगात कुठेतरी मनाचा कोंडमारा होणं ही नित्याचीच बाब झाली. ही होणारी कोंडी आणि घुसमट कमी करण्यासाठी प्रत्येक माणूस दिवसागणिक काही प्रयोग करतही असतो. आयुष्यानं घालून दिलेल्या कुंपणापलिकडे उडी मारायची आहे पण ते साधत नाही अशा संदिग्ध अवस्थेत तोल सांभाळत तारेवरची कसरत करत असणार्‍या अशाच एका व्यक्तिच्या विचारांचा कोलाज म्हणजे 'पाऊसवाट' हे पुस्तक. मनात आलेले विचार कुठल्याही वेगळ्या रूपामध्ये परिवर्तित न करता आहेत तसे या पुस्तकात उतरलेले आहेत.

जे आयुष्य वाट्याला आलेलं आहे ते या दुष्टचक्रातून सुटका नाही म्हणून परिस्थितीला दोष लावत नि:संकोच जगायचं याला लेखकाचा आक्षेप आहे. त्या पलिकडेही काहीतरी उदात्त असेल या आशेतून आणि विचारातून ही 'पाऊसवाट' फुललेली आहे.


'पाऊसवाट'. या नावातचं ही वाट कशी असावी याचं उत्तर मिळतं. पाऊस म्हणजे जीवन. जीवनाची वाट म्हणजे पाऊसवाट. ही वाट कितीही अडचणीची, गुंतागुंतीची असली तरी लोभस वाटते. याचं कारण आपण पाहिलेली स्वप्नं या वाटेवर पावलापावलांवर विखुरलेली असतात. ती गोळा करत पुढे जाण्यात अवीट गोडी असते. एखाद्या हमरस्त्याला लागल्यानंतर त्या गर्दीच्या ओघात किंवा मधमाश्यांचं मोहोळ फुटावं अशा फुटलेल्या कुठल्यातरी जमावाच्या पावलांखाली सारं चिरडून जाण्यापेक्षा आपण आपली वाट निवडलेली बरी असं लेखकाला वाटतं. आणि म्हणूनच उन्हाची काहिली असह्य झाली, सगळीकडे रखरखाट, सारं नीरस, शुष्क, निर्द्रव;निव्वळ कोरडेपणा आसमंतात भरून राहीलाय आणि अशा वेळेस अचानक पावसाची एक सर यावी; ते साक्षात्कारी थेंब आपल्या चेहर्‍यावरून ओघळू लागले आणि ती शीतलता मनात उतरली की जो आनंद होतो तोच या वाटेवर अपेक्षित आहे.

प्रेम, विरह, नातेसंबंध, प्रयत्न, देव अशा विविध विषयांवरील कथा, स्फुटं, लेख, कविता यांचा कोलाज असलेले केदार केसकर यांचे 'पाऊसवाट' हे ललित साहित्यातील पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे रविवार, दिनांक ३ जून २०१२ रोजी, पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात प्रकाशित होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. विनया देसाई करणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर पुस्तकातील काही लेखांचे वाचन होईल. 

प्रकाशनाध्यक्ष: ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक, जागतिक मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष मा. द. भि. कुलकर्णी
शुभहस्ते: सुप्रसिद्ध संगीतकार मा. आनंद मोडक
विशेष उपस्थिती: मा. डॉ. शोभा अभ्यंकर

स्थळः एस. एम. जोशी सभागृह, 
गांजवे चौक,
पत्रकार भवना शेजारी. 

वेळः

सायंकाळी ६:०० ते ६:३० - कॉफीपान
६:३० ते ८:०० - मुख्य कार्यक्रम

या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून माझा आनंद द्विगुणित राल अशी आशा मला आहे. 

तुमचा, 
केदार

Tuesday, March 27, 2012

ग्रेसग्रेस कुणाला कळले आणि कुणाला कळले नाहीत या युक्तिवादात आता तसा काहीच अर्थ उरलेला नाही. कारण हा संध्यासूक्ताचा यात्रिक आता आपल्यातून कायमचा निघून गेलेला आहे. तो निघून गेला आहे महानिर्वाणाच्या दिशेकडे. त्यांच्यावर दुर्बोधतेचा शिक्का मारणार्‍या अनेकांचे डोळे ते गेल्याने भरून आलेले असतील. ते मान्य करण्यासाठी सुद्धा दिलदारी लागते.

ग्रेस यांची कविता मला एक दिवस सहज भेटली. त्या कवितेतला आपल्याला कळलेला अर्थ आणि त्यातील गर्भितार्थ यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्यानंतर हळूहळू जाणवत गेलं. कविता कुठलीही असू दे, त्यातील गूढरम्यता, भावविवशता आपण कल्पनाही करू शकणार नाही आणि सहसा तिथवर पोचू शकणार नाही अशा अमर्त्य भावविश्वाचं दर्शन घडवते. हृदय कोरून बाहेर काढावं, त्याचे ठोके आपल्या समोर पडतांना पहावेत, आणि आपण जिवंत आहोत का निवर्तलोय या असल्या संभ्रमात आपण पडावं असं काहीसं देखणं, मोहून टाकणारं, बर्‍याच अंशी ठाव न लागणारं किंबहूना ठाव न लागु देणारं लेखन हे खूप आतूनच उमटावं लागतं. म्हणजे...

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
नभातूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

ही कविता असू दे किंवा

देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही कारूण्याची धार


ही असू दे, त्यातील गांभीर्य आणि भावानुभुती हा केवळ अनुभव नाही. तो साक्षात्कार आहे. अनुभव शिळे होतात, साक्षात्कार नव्हेत.

अगदी त्यांच्या मृगजळाचे बांधकाम या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत सुद्धा ग्रेस म्हणतात...

संध्यामायेच्या शुभमकरोती ओंजळीतून सांडताना
तू अचानक, अवाक होऊन,
दरदरून थरथरलीस... मला प्रयाणाची दिशा दाखवीत...
तू थांबली असतीस तर या मृगजळात
एखादा रंगीत मासा तरंगू शकला असता...
तिरीप एकदा बुबुळात शिरली की मग ती
अश्रूंच्या आदेशानेही पापण्यातून खाली
सांडतच नाही; या सबब, शरमेवर तू नाही
थांबलीस !
पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे
शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?
तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच
अर्पण करतोय.
अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पणही
यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ
असतात काय ? संभवतात काय?

माझ्या मते भाषेनी बहाल केलेली चौकट बर्‍याच वेळेला वर्तुळाकार असते. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कौशल्य स्वतःला अभिमन्यू समजणार्‍या बर्‍याच साहित्यिकांकडे नसतं. तीच करामत या भाषेच्या जादूगाराने करून दाखविली. वेदनेला केवळ दु:ख समजणार्‍या महाभागांना ग्रेसची कविता समजायची नाही. अ़ज्ञाताच्या तळाशी बुडी मारण्यासाठी साहस लागतं. मनस्वीता लागते.

पुन्हा कवितेचं गाणं झालं, तरी गाणं त्यातील कवितेसाठी आणि त्यातील वेदनेच्या पुनःप्रत्ययासाठी ऐकलं जाणं यात शब्दकाराचा विजय आहे. तो विजय आहे या अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा वारसा लाभलेल्या सांध्यमग्न पुरूषाचा. ग्रेस जिंकले. मृत्युंजय ठरले ते त्या अर्थीसुद्धा.

ग्रेस म्हणजे एक गूढ. एखाद्या शापीत देवाच्या टेकडीवरील, वार्‍यावर किंचितही न हलणार्‍या एका पोक्त, अनासक्त वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या ढोलीत कुणीतरी ओलेती दिवा लावून जाते तसं काहीसं!


तुमचा,
केदार

Tuesday, February 28, 2012

दोष ना कुणाचा...

डर्बनच्या समुद्रकिनार्‍यावर फिरत असतांना किंवा सनबाथ घेत निवांत पहुडलेलं असतांना एक गोष्ट आवर्जून पहावयास मिळते. इथे असणारे ब्लॅक्स कधी सनग्लासेस तर कधी आइसक्रीम विकण्यासाठी हातात ते डबोलं घेऊन भर उन्हात फेरीवाल्यासारखे अखंड फिरत असतात. इथली गरिबी आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असमानता बर्‍याच अंशी भारताशी मिळती जुळती आहे. असो...

सांगायचा मुद्दा इतकाच की ते तसं फिरत असतांना पाहून मन भरून येतं. शेवटी 'पापी पेट का सवाल आहे' असं म्हणत मनाची समजूत करून घेतली, तरी एक सवाल मनात तसाच अबाधित आणि अनुत्तरीत राहातो. देवानी हे पोट दिलंच कशासाठी? ह्म्म...तिथेच तर खरी गोम आहे. शेवटी हे असं वणवण फिरायचं ते कशासाठी? पोटासाठीच ना?

पोटाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मीही मनाचा कौल झुगारून पोटाची भूक मिटवण्यासाठी या गराड्यात सामील झालो. तेव्हापासुनचं सारं काही लख्ख आठवतयं. माझी झुंज सुरू आहे ती तेव्हापासून. सकाळ होताच पायाला चक्र लावलेल्या पिसाटासारखा घराबाहेर पडतो. महिनाअखेरी मिळणार्‍या पगारावर माझा पिंड पोसतो. निव्वळ पोटासाठी. हे पोटच नसतं तर किती बरं झालं असतं! अशी काही पोटं माझ्या कर्तबगारीवर भरलेली ठेवायची जबाबदारी माझी! प्रत्येकाचा पिंड वेगळा तो या पैशांवर पोसला जातो. पण त्याच बरोबरीने मनाची, बुद्धीची भुक काय असते ते सुद्धा मला माहितेय आणि देवानी ती भूक शमविण्यासाठी मला संधी दिली म्हणुन मी कृत़ज्ञसुद्धा आहेच. पण ही अशी वणवण फिरणारी माणसं दिसली की एक क्षण वाटून जातं... यांच्या आयुष्याचं फलित काय?

झालं... सनबाथ घेऊन झाला... किनार्‍यावरील भिजलेल्या वाळूवरून पायांचे क्षणभंगुर ठसे उमटवत घरी चाललो...मन मनाची समजूत घालत होतं...

"जाऊ दे केदार..., जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही... ज्याचे त्याचे भोग... ज्यानी त्यानी भोगून संपवायचे..., अरे, संतांना, देवाला हे भोग सुटले नाहीत... तुझी माझी काय कथा? त्या गीतरामायणातल्या गीतातला भावार्थ आता तरी भिडतोय का मनाला?"

"भिडतोय कसला... बोचतोय...चांगलाच बोचतोय..."

बहुतेक अशाच एका उद्विग्न क्षणी प्रभु राम भरताला म्हणाले असावेत...

"दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा...

दोष ना कुणाचा..."

तुमचा,
केदार