Thursday, February 10, 2011

"प्रेटी वुमन"

आज खूप दिवसांनी "प्रेटी वुमन" पाहीला. पूर्णपणे त्यात हरवून गेलो. त्यातील सार्‍याच कलाकारांच्या अभिनय सामर्थ्यापुढे शब्द थिटे. जुलिआ रॉबर्ट्स आणि रिचर्ड गेअरनी रंगवलेल्या भुमिका केवळ अविस्मरणीय. काही काही सीन खूप आवडले. रात्रभर आता त्याचाच विचार करत राहीन. विविअनच्या (जुलिआ रॉबर्ट्स) तोंडून उमटलेले ते दोन शब्द "he sleeps..."... भावना नुसत्या ओतप्रोत भरून राहील्यात या शब्दांत. तिची ते शब्द उच्चारण्याची किमया तीच करू जाणे.

एडवर्ड शेवटी विवियन निघून जातांना एक वाक्य बोलतो, "I never treated you like a prostitute."
विवियन हळू आवाजात बोलते. "you just did!"

अंगावर काटा येतो. हा सिनेमा आहे. पण खरोखर वेश्याव्यवसायात असलेल्या मुलींच्या पदरी किती उपेक्षा आणि अपमान पडत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. आणि शेवटी तिला तो लाभतो त्यावेळी मला अतोनात आनंद होतो. एका गरीब मुलीला इतकी सुखं मिळतील अशी स्वप्नातही आशा नसते. पण तिला ते प्रेम मिळतं, जोडीदार मिळतो. शेवटी वेश्येतही एक स्त्री असते, हा सांगण्याचा मतितार्थ. आयुष्य कधी कोणते रंग दाखवेल काही सांगता येतं नाही. म्हणून दु:खासाठी स्वत:ला तयार करण्यासोबत, सुखाचं स्वागत करण्यासाठी कायम तयार रहाणं हे ही तितकचं योग्य.

पुन्हा प्रत्येक पुरुष एका "प्रेटी वुमन"च्या शोधात असतोच. कुणाला आई, कुणाला बायको, कुणाला बहीण, कुणाला अजून कुणी तरी. स्त्री च्या भुरळ घालणार्‍या असंख्य रूपांपैकी कुठलं रूप कोणाला भावेल सांगता येणं कठीण आहे. आज "प्रेटी वुमन" पाहील्यावर "प्रत्येक स्त्रीरूपात एक प्रेयसी दडलेली असते" असं म्हटलं तर ते अयोग्य ठरायला नको.

केदार

Sunday, February 6, 2011

'तोडी'ची गोडी!

रविवारची निवांत सकाळ, हवेत असलेला गारठा, धुक्यातून पसरत जाणारी कोवळी किरणं आणि अशा प्रसन्न वातावरणात भिनलेल्या 'तोडी'च्या सूरांनी २६ डिसेंबरची सकाळ अविस्मरणीय झाली. डॉ. शोभाताई अभ्यंकर आणि शिष्यपरिवारातर्फे आयोजित 'तोडी'चे प्रकार या अनौपचारिक कार्यक्रमात 'तोडी'चे बरेचसे अप्रचलित आणि काही प्रचलित प्रकार सादर करण्यात आले. गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे पुणेकरांना तोडीचे अनवट प्रकार ऐकण्याची सुसंधी लाभली. कोमल रिषभ आसावरी तोडी, जौनपुरी तोडी, देवगंधार तोडी, गांधारी तोडी, जयवंती तोडी, सालग वराळी तोडी, देसी, लाचारी तोडी, अबीरी तोडी, भूपाल तोडी, बिलासखानी तोडी, मियॉं की तोडी, हुसैनी तोडी, खट तोडी, बहाद्दूरी तोडी, गुजरी तोडी असे तोडी रागाचे एकूण सोळा प्रकार या वेळेस सादर करण्यात आले. प्रत्येक रागाच्या सुरूवातीला त्या रागाचे शास्त्रशुद्ध विवेचन, रागाचा स्त्रोत, रागाचे स्वरूप, रागातील महत्वाच्या जागा, रागविस्तारातील अपेक्षित अंग आणि त्याचे जुने संदर्भ शोभाताईंनी संगीतरसिकांपुढे मांडले. अनेक संगीतप्रेमींना हा कार्यक्रम त्यांच्या संगीत अभ्यासासाठी चालना देणारा ठरला. संगीतकार केदार पंडित, डॉ. अरविंद थत्ते, पं. संजीव अभ्यंकर, डॉ. सुचेता बिडकर, डॉ. सुहासिनी कोरटकर, डॉ. शीतल मोरे यासारखे अनेक मान्यवर व संगीतज्ञ ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

शोभाताईंची संगीतातील शिस्त आणि अभ्यास त्यांच्या शिष्यांच्या सादरीकरणातून दिसून येत होता. प्रत्येकातील सर्जनशीलतेला योग्य तो वाव मिळूनही शिस्तबद्ध गाणं कसं असतं याचं उत्तम उदाहरण या कार्यक्रमाद्वारे रसिकांसमोर आलं. मीनल जोशी, मृण्मयी फाटक, नेहा दिक्षित, तेजश्री पिटके, मनिषा श्रीखंडे यांनी बर्‍याचश्या बंदिशी एकत्र सादर करूनही त्या एकसंध, एकसूर वाटल्या. त्या सादरीकरणात कुठेही अनपेक्षित आक्रमकता, सूरांची चढाओढ नव्हती तर सुसंवाद होता. संवादिनीवर श्री. सुयोग कुंडलकर व तबल्यावर श्री. अरूण गवई यांनी सुरेख साथसंगत केली. संहितेची अत्यंत प्रवाही पण योजनाबद्ध आखणी, रागांची संक्षिप्त पण सर्वसमावेषक मांडणी, त्यातून स्पष्ट होणारा स्वतंत्र विचार आणि तरीही सादरीकरणातील मतैक्य यामुळे हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीला जाऊन पोहोचला. ज्यावेळेस कार्यक्रमाची सांगता गुजरी तोडी रागातील तराण्याने झाली त्यावेळेस सूरांच्या या अद्भूत प्रत्ययामुळे हरखून गेलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. 'तोडी'ला तोड नाही याची प्रचिती देणारी ही तोडीची सकाळ रसिकांसाठी दीर्घकालीन आनंदाचा ठेवा ठरली यात शंका नाही.

केदार केसकर

समाधि

अंधारात बसलो असता असंख्य चित्र उघडया डोळ्यांपुढे आपसूक तरळायला लागतात. आधी टिंब टिंब अशी नक्षी पुसटशी उमटते. मग ती टिंब जोडणारी एखादी रेषा....त्याच्या मागोमाग काही वेडीवाकडी वर्तूळं.... काही अर्धवट राहीलेले चौकोन.... मग एकदम एखादा प्रकाशाचा झोत.... सारं काही अंधारातच उगवतं आणि नाहीसं होतं. हरवलेपणाच्या पलीकडे जाऊनही हरवलेपणा उरतो. एक अशी स्थिती... जेव्हा मी निद्रेत नसतो आणि जागाही! दूरून येत असलेले आवाज, कोलाहल... सारं काही कानावर पडत असतं पण ते येतं तसचं परत फिरतं. आपला वेध घेत एखादा बाण सुस्साट सुटावा आणि तो वेध न घेताच परत फिरावा असं! कशाचाच संबंध रहात नाही.

कुठून बाळाची गोजीरवाणी पावलं ऐकू येतात. सोनसाखळ्या घातलेली.... पवित्र छोट्या छोट्या घंटिका.... नाजूक, निर्व्याज, मार्दव.... सखीचा हळवा स्पर्श.... तिच्या कुंतलांचा सुवास.... तिचं माझ्यात भिनणं.... आईची पूजा.... देवासमोर तेवत असलेलं निरांजन.... उदबत्तीचा गंध.... तिने केलेल्या अन्नाचा सात्विक, वेगळा वास... पाळण्यात मुठी करून झोपलेलं बाळं... त्याला निजवत असणारी माझी सखी... त्याच्यावर गोल गोल फिरत असलेलं रंगीत चिमणाळं.... सहज...अगदी सहज डोळे मिटतात. मी पुन्हा पुन्हा डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो. पण ते उघडत नाहीत. तशी आज्ञाच होत नाही. सगळीकडे आनंद.... देखणा आनंद.... आता काही काळ तरी मला त्या आनंदात समाधिस्थ राहू दे.

हातात पहार घेऊन उभे आहेत माझ्या जिवंत समाधिचे पहारेकरी... ती खणून काढण्यासाठी...

पण म्हणून काय मी समाधि लावूच नये....?

केदार केसकर