Friday, October 28, 2011

धुकं!

काल धुकं बराच वेळ उतरलंच नाही. मी सकाळी उठलो आणि ऑफीसला जाणार नाही ही मंगलवार्ता घरात सांगितली. क्षणात सगळीकडे आनंदी आनंद झाला. बायकोनी माझ्याकडे लाडाने, कौतुकाने पाहीलं आणि मी खिडकीत धुकं पहात उभा असतांना माझ्याजवळ येऊन काहीतरी बोलण्यास सुरूवात केली. कधीतरी आत इतका कोलाहल माजलेला असतो की त्यावेळेस कुणाचेही शब्द, मग ते अगदी साधेच असले तरी नकोसे वाटतात. तिचं मन दुखावू नये म्हणून मी ही काहीतरी बोलत होतो. ते फारसं सुसंगत नव्हतं हे माझ्या ध्यानात येत होतं. मग उगाचंच "अग, बघ जरा कशी छान हवा पडलीय, गरम-गरम पोहे करतेस?" असं काहीसं बोलून मी त्या संभाषणाला अर्धविराम दिला.

बहुतेक आजकाल माझ्याकडचे बोलण्याचे विषय संपत आलेत किंवा मी बोलायचा कंटाळा करायला लागलोय. "काय बोलू?" हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा रहातो. बोलण्यासारखं काही नाही. आवडीचं करण्यासारखं बरचं आहे पण वेळ नाही. खूप कंटाळा आलाय. जीव घुसमटतोय. काहीतरी करायचंय असं मनाला वाटतंय पण हातून घडत नाही. जे हातून एक दिवस घडतं ते दुसर्‍या दिवशी टिकत नाही. स्वप्न पूर्ण कशी करायची याचा विचार मनाला अस्वस्थ करतोय. मध्येच वाटत की निघून जावं परदेशात कायमस्वरूपी परत या सगळ्यापासून दूर, पण ते धारिष्ट्य होत नाही. कुठेतरी चार दिवस सुट्टीवर जावं असं वाटलं तर पैसे वायफळ खर्च होतील हा विचार. या अशा हल्लकल्लोळात जर कोणी माझ्यासमोर येउन उभं ठाकलं आणि म्हणालं "बोल", तरं काय बोलणार? डोंबल? आजकाल माझी अशी बर्‍याच वेळा गोची होते. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून सोडून द्यायचं अजून काय?

पोहे खाऊन झाल्यावर कॉफी केली. एक कप बायकोला दिला आणि म्हटलं "अगं आज जेवायला उगाच काहीतरी जास्त गोंधळाचं करू नकोस. बाहेर जाऊयात जेवायला." एका हॉटेलात जेवून आलो. वामकुक्षी घ्यायची म्हणुन पहूडलो आणि झोपायचा प्रयत्न केला. पण झोप येईना. मनात पुन्हा विचारांचं वादळ चालू झालं. दुपार अस्वस्थच गेली. आळसावून टीवी पहात बसलो ते संध्याकाळच्या ७ पर्यंत. मग हीची चुळबुळ पुन्हा चालू झाली. आता बहूधा अपेक्षा असेल कुठेतरी बाहेर फिरायला जावं अशी! तथास्तु! लक्ष्मी रोडवर फिरून आलो आणि येता-येता हिला एक मोगर्‍याचा गजरा घेऊन दिला. घरी आलो तेव्हा रात्रीचे १०:३० वाजले होते. डोळे मिटायला लागले होते. झोपण्याआधी काहीतरी तरी करावं म्हणून जाऊन एकटाच गॅलरीत उभा राहीलो, सिगारेट पेटवली आणि थंडपणे विचारात गढून गेलो.

कुणालाही आनंद देण्यात समाधान आहेच पण त्या समाधानाची खाती उघडत दरिद्री बॅंकर होऊन किती दिवस बसायचं? कॅशिअरच्या हाताला दर दिवशी लाखो रुपयांच्या नोटांचा स्पर्श होत असेल, पण त्या नोटा त्याच्या स्वत्:च्या खात्यात पडणार नाहीत किंबहूना तो तसं करू शकत नाही यातील कर्तव्याचा आनंद जास्त मोठा की त्याला महिनाअखेरी ज्या तुटपुंज्या पगारावर समाधान मानावं लागणार आहे त्यातून उमटणार्‍या जळजळीत वास्तवाच दु:ख मोठं? घरातून बाहेर पडतांना साध्या पोषाखात बाहेर पडून, कुठल्यातरी अज्ञात जागी कुणीही पहात नसतांना, स्पायडरमॅनचा वेष करून जगात वावरलं किंवा बाहेर साध्या पोषाखात वावरल्यानंतर घरी परततांना स्पायडरमॅनचा वेष करून घरात आलं तरी सरते शेवटी माझ्या वाटणीची एक बनियान आणि नाडी नसलेला बर्मुडा माझी कवचं-कुंडल बनली आहेत ही वास्तवता जीवाची कालवा-कालव करणारी का ठरू नये? हीच मनाची अस्वस्थता एक दिवस प्रज्वलीत होऊन माझा मार्ग मला दिसू लागेल या विश्वासावर मी भिस्त ठेवून आहे.

कोणताही मनुष्य शेवटी त्याच्या कुटुंबासाठी झटतच असतो. आपल्या माणसांच्या चेहर्‍यावरील समाधान पहाण्यात जो आनंद आहे त्याची सर अजून कुठल्या गोष्टीला सहसा येणार नाही. पण या सोबत स्वत:चं काहीतरी हवं. एक छोटासा कोपरा, स्वत:चा, सार्‍या बेगडीपणापासून, कोलाहलापासून दूर, अलिप्त असा एक कोपरा. चाळीशीला मागे वळून पाहिल्यानंतर "आपण काय मिळवलं" याचं उत्तर स्वत:ला देतांना

"दोन मुलं आहेत माझी, मोठा वर्गात पहिला आला बरं का...धाकटी कथ्थक शिकते" केवळ हे असं काही सांगण्याची मला तरी लाज वाटेल. आमच्या बागेतल्या मांजराला सुद्धा ४ पिल्लं झाली हो! ऋतू आला की प्राणीसुद्धा हेच करतात. मग मी त्यांच्यापासून वेगळा कसा होऊ शकेन हा विचार आला की सारं थबकतं. आपली राहून गेलेली स्वप्न मुलांमध्ये पहायची, त्यांना ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, सहकार्य करायचं. का? त्यांना त्यांची स्वत:ची स्वप्न नाहीत?

"बाबा रे, तू स्वत:साठी काय मिळवलंस? किती तुझी राहून गेलेली स्वप्न जगलास?" या प्रश्नाचं उत्तर देतांना आपण किती पोकळ आणि उथळ जगलो याची जाणीव मला होवू नये....बस...हे इतकंच मनापासून वाटतं.

अपेक्षापूर्ती पण ती स्वत:ची नाही दुसर्‍यांची हे माझ्या आयुष्याचं ब्रीद बनून गेलयं. ऑफीसमध्ये साहेबाची, घरात आपल्या माणसांची, ज्यांना आपल्या आनंदाचं, दु:खाचं फारसं सोयर-सुतक नसतं अशा काही सोयर्‍यांची, परक्यांची, शेजार्‍यांची. आपण जन्माला येतो तोच मुळी अपेक्षापूर्तीचा शाप घेऊन. मग या अपेक्षा रास्त आणि डोळस असाव्यात याचा प्रयत्न फारसा का केला जात नाही? का?

"चला, आज हा घरी आहे" म्हणुन आमच्यासाठी काहीतरी करेल ही त्यांची अपेक्षा महत्वाची की "चला, मी आज घरी आहे", हा एक दिवस स्वत:च्या मनाप्रमाणे खमंग जगीन ही भावना जास्त महत्वाची? ही सुद्धा एक अपेक्षाच माझी, दुसर्‍यांकडून केलेली. पण "तुझं मन भरल्यावर जो वेळ मिळेल तो माझा" हा विचार मला "माझं मन भरल्यावर जो वेळं मिळेल तो तुझा" ह्यापेक्षा कितीतरी श्रेयस्कर वाटतो आणि तोच मी जास्त मानतो. याचे परिणाम चकीत करून सोडणारे असतात हा माझा अनुभव आहे. बहुतेक वेळा आपली सामंजस्याची भूमिका दुसर्‍यामध्ये कर्तव्याची जाणीव आपोआप निर्माण करते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट स्वाभाविक असते. अशा वेळेस ती गोष्ट करणार्‍या व्यक्तीच्या कृतीमध्ये कर्तव्यपूर्तीचा दर्प नसतो आणि ज्याच्यासाठी ती केली जाते त्याच्या मनात उपकृत झाल्याची भावनाही!

गुलाबी थंडीत करण्यासारख्या गोष्टी बर्‍याच असतात. अंगावर गुबगुबीत पांघरूण घेऊन आवडतं पुस्तक वाचत पडून राहीलोय. त्यातल्या एका वाक्याशी मनातल्या भावना एकरूप झाल्याने, डोळे भरून येतांना होणार्‍या आनंदाचा साक्षात्कार अनुभवतोय. पूरिया-धनाश्री हवेत दरवळतोय. बाहेरचा पाऊस वाढत चाललाय. हातात पॉपकॉर्नचा डबा घेऊन The Shawshank Redemption सारखा एखादा ह्रदयाला हात घालणारा आणि दर वेळी तितकीच अनामिक स्फुर्ती आणि विश्वास जागविणारा चित्रपट बघितलाय. त्यामुळे Life is beautiful ही संकल्पना मनात पुनर्निर्माण होतेय, दृढ होतेय. संध्याकाळी गार हवेवर छान फिरायला गेलोय. एकमेकांच्या सहवासाचा आनंद मूकपणानी, स्पर्षातून घेतलाय. मनसोक्त पाऊस पिऊन मत्त पण अनासक्त झालेल्या प्राजक्ताचा सडा कुठेशी जमिनीवर पडलाय आणि कुठेतरी वेलीला लगडलेली तृप्त मोगर्‍याची फुलं त्यांच्या इवल्याश्या ओंजळीतून सुगंधाची लयलूट करत आहेत. एक सुंदर, निवांत दिवस झोळीत टाकल्याबद्दल मनात कुटुंबियांबद्दल आणि देवाबद्दल कृतद्यता आणि आदर भरून राहीलाय. आनंदाची व्याख्या कधी कधी अशी ही होऊ शकेल?

अचानक हाताला चटका बसला आणि भानावर आलो. सिगारेट संपली होती. दिवस संपला होता. दोघांचीही राख झाली होती. संध्याकाळी विकत घेतलेला मोगर्‍याचा गजरा सुकून गेला होता आणि बायको शांतपणे झोपून गेली होती. बेडरूममधला मिणमिणता दिवा मला खुणावत होता आणि बाहेरचं धुकं आणखीनंच गडद होत होतं.

तुमचा,
केदार

Wednesday, October 26, 2011

दिवाळी म्हणजे...



दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव!
दिवाळी म्हणजे चैतन्य!
दिवाळी म्हणजे आनंद!
दिवाळी म्हणजे आरास!
दिवाळी म्हणजे दारापुढील रंगीत रांगोळी!
दिवाळी म्हणजे दिव्यांची माळ!
दिवाळी म्हणजे आकाशकंदील!
दिवाळी म्हणजे अभ्यंग स्नान!
दिवाळी म्हणजे नवे कपडे!
दिवाळी म्हणजे फटाके!
दिवाळी म्हणजे स्नेहभोजन!
दिवाळी म्हणजे फराळ!
दिवाळी म्हणजे...
दिवाळी म्हणजे नरकासूराचा कृष्णाने वध केला तो क्षण!
दिवाळी म्हणजे अंधार उजळून टाकणारा तेज:कण!
दिवाळी म्हणजे प्रकाशसण! दिवाळी म्हणजे प्रकाशसण!

सार्‍यांना या प्रकाशसणाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

ही दिवाळी तुम्हा-आम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची, सुखाची, समाधानाची, शांतीची, समृध्दीची, भरभराटीची जावो!
स्नेह आहेच...तो वृध्दींगत होवो!

तुमचा,
केदार

Wednesday, October 19, 2011

घुसमट किंवा तत्सम काहीतरी...

कूपमंडुक वृत्तीची माणसं पाहीली की माझी घुसमट होते. अजूनपर्यंत माझ्याही हातून काहीच विशेष घडलेलं नाही याची प्रचंड खंत माझ्या मनात ठाण मांडून बसलेली आहे. त्यामुळे मीही अशा माणसांच्या पंक्तीत सहज बसतो हे कबूल करण्यात मला काहीच वावगं अथवा गैर वाटत नाही. पण त्यांच्या पंक्तीत मी बसलो तरी अजूनही अशा माणसांमध्ये मी उठून दिसत नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाजू. पंक्तीत मोक्याची जागा पटकावण्यासाठी अशा माणसांमध्ये प्रचंड चढाओढ चालू असते. तशी इच्छाही मला होत नाही अन् ही घुसमटच मला त्यांच्यापासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करते.

नोकरी आहे म्हणून करायची. संसार आहे म्हणून करायचा. मुलं आहेत म्हणून वाढवायची. आयुष्यात तडजोड आहे म्हणून ती ही करायची. कितीतरी वेळा मनाविरुद्ध गोष्टी झाल्या तरी त्या मूकपणानी पहायच्या आणि त्यांचं खापर नशीबावर फोडायचं हे सारं कसं जमणार? सकाळी पिसाटासारखं घरातून निघायचं आणि संध्याकाळच्या वेळेस थकून भागून घरी परतायचं हा आमचा ठराविक कार्यक्रम. यात कुठेच काहीच कमी नाही? कधीतरी मला वाटतं की प्रोग्राम केलेल्या रोबोटसारखा मी या अशा माणसांसोबत संवेदनाहीन होत चाललोय. पण हेही सत्य की अशी माणसं आहेत म्हणून हे जग चाललय. सगळेच Steve Jobs, Vijay Mallya कसे होणार? पण म्हणून कोणी होणारच नाही हा निराशावादी विचार मला नको वाटतो.

मी जिच्यात मजूर आहे त्या कंपनीचं स्वप्न पुढील ३ वर्षात १००० कोटींचा revenue attain करायचं आहे ना मग त्याच्यासाठी तहानभूक विसरून कामाला लागायचं. Full dedication... hardwork... आणि मग हे स्वप्न पूर्ण झाल्यावर एक महागडं टायटनचं घड्याळ बक्षीस म्हणून घ्यायचं. मोठ्या समारंभात... सगळ्या लोकांसमोर....

छे.... आता तर मला हे असं काही घेण्याची सुद्धा लाज वाटते. त्या घड्याळ्याकडे एकदा नजर गेली की मी आयुष्यातल्या किती सोनेरी क्षणांचा बळी दिलाय हे संवेदनाक्षम आणि तर्कसंगत माणसाला आठवल्याशिवाय राहील का? एखाद्या वेळेस स्वत:ची राहून गेलेली एखादी अगदी छोटी इच्छा पूर्ण करण्यासाठी निवांत वेळ हवा असेल....एखाद्या वेळेस मुल आशेनी बापाकडे पहात असेल त्याला बागेत नेण्यासाठी... एखाद्या वेळेस आई वडीलांना एका आधाराच्या बाहूची गरज असेल... कपाळावर आलेली एक बट कानामागे सारण्यासाठी कुणी पत्नी क्षणभराच्या स्पर्षासाठी आसुसलेली असेल याचा विचार कोण करणार?

छे... मला वेळच नाही स्वत:ची स्वप्न जगायला. स्वत:चं काही घडवायला. मी दुसर्‍यांची स्वप्न जगण्यात मस्त आहे. दिवसेंदिवस परधार्जिणा होत चाललोय.

"Thank you for your dedication and outstanding efforts" असं काहीसं छापलेली सर्टिफिकेटस् माझ्याकडेही आहेत. शोकेसची शोभा वाढवण्यापलिकडे त्याचा काय उपयोग? किती वेळा ते सर्टीफिकेट पाहील्यावर मनात पुन्हा पुन्हा शिरशिरी येते? आपण काहीतरी करून दाखवलं असं वाटतं? आणि मग एक प्रश्न उभा राहतो.... खरंच आपण काय करून दाखवलं? केदार, You are not made to live this small हे कितीतरी वेळा वाटून जातं.

छे... काहीतरी केलं पाहीजे... वेगळं.. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:साठी काहीतरी केलं पाहीजे... स्वत:चं काहीतरी हवंच.... कुणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप नाही पण आपण जन्माला का आलो याचं उत्तर तरी मला आता हवंय. Knowing that, has started to become my biggest obligation.

आयुष्याच्या संध्याकाळी हा घालवलेला सारा वेळ आणि वाया घालवलेली स्वप्न क्षीण डोळ्यांनी पहायची फक्त एका आनंदात की मी चिक्कार दलाली गोळा केली माझ्या कुटुंबासाठी दुसर्‍यांची स्वप्न जगून. कंपनीची किंमत १००० कोटी झाली आणि माझ्या अमोल आयुष्याची आणि स्वप्नांची किंमत झाली काही लाख.

Have I not been downgrading myself all this time?
Deep down somewhere I know...
Its not about the price that I paid. Its about the real worth.

आणि मग दूर मावळणार्‍या सूर्याकडे पहातांना एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा....

"Was it all worth it?"

तुमचा (पराकोटीचा अस्वस्थ),

केदार


Friday, October 7, 2011

कोसला

भालचंद्र नेमाड्यांची 'कोसला' हा एक अंगावर येणारा अन् चिरस्मरणीय अनुभव आहे. ही कादंबरी मी फार पूर्वीच वाचली होती पण आज त्याच्यातील 'मनीचा मृत्यू' या कथानकाचा काही भाग सहज डोळ्यांपुढे आला. पु.लं.नी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मृत्यूचे इतके नितळ दर्शन यापूर्वी खरंच कधीही पाहीले नव्हते. पुन:प्रत्ययाचा आनंद इतका असीम आणि टोकाचा असू शकतो हे 'मनीचा मृत्यू' पाहिल्यानंतर (मी "वाचल्यानंतर" असे म्हणणार नाही) जाणवलं. त्याचाच भाग तुमच्यासाठी खाली देत आहे.

केदार केसकर

ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.


आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.


दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.


पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.

...

मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.

फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.

मग ती हात सोडा म्हणाली.
तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?
तेव्हा मनी बोललीच नाही.
आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.
पण ती आईशी बोललीच नाही.
आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?
तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.
लाल साडी.
हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो?
तिला मी आठवलो असेन. लाल साडी.
हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.

मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?
हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्‍या झाल्याच होत्या.

आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?
मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.
मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.
आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ
आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.
मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.
तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.
डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.
आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.

आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.

मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?
मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.
मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.
मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.
मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.
मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन.
मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.

...

आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास.
...

तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ.
...


कादंबरी - कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे