Thursday, June 2, 2011

पाऊस आला...


पाऊस आला की मला दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते. पार्ल्याची माझी शाळा आणि माझं बालपण ही पहिली गोष्ट. मे महिन्याची सुट्टी संपून शाळा पुन्हा चालू व्हायची ती याच सुमारास. घराबाहेर पावसाच्या पाण्याचं तळं व्हायचं. कधी कधी मी रहात असलेल्या सुभाष रोडवर तर गुडघ्याएवढं पाणी असायचं. त्यातून वाट काढत जाण्यास मजा यायची. कधी कधी शाळेला सुट्टी मिळायची त्यावेळेस तर काय धमाल. आम्ही होड्यांचा खेळ खेळायचो. पावसात मनसोक्त भिजायचो. आईची मग हाक यायची. चिखलात माखलेला मी... आई खसखसून आंघोळ घालायची. कधी भजी, कधी वडा, कधी डोसा असं काहीतरी नाविन्यपूर्ण खायला असायचं. ते खायचं आणि पाऊस बघत आतल्या खिडकीला लागून असलेल्या बिछान्यावर पडून रहायचं.

दुसरी गोष्ट म्हणजे माझं पुण्यातील डी.एस.के. विश्वमधील घर. आधीच ते डोंगरांनी वेढलेलं. आपण जरी हातांनी झाडांना, रोपांना कितीही पाणी दिलं, तरी पाऊस प्यायल्यानंतरचं त्यांच रूप वेगळच दिसतं. तेच रूप समोर चारीही दिशांना दिसायचं. सभोवार सारे हिरवे-पोपटी छटा ल्यालेले डोंगर, तुडुंब भरलेले खडकवासला, सगळीकडे पसरलेलं धुकं. त्यात संध्याकाळ झाली की धुक्यातून लागत जाणारे दिवे समोर अंधूक अंधूक दिसायचे. सारं पुणचं समोर पसरलेलं. पहाणार तरी किती आणि कुठे? निसर्ग असा धुक्याची दुलई लेऊन शांत पहुडला असता आपणही अंगावर मऊ दुलई घेऊन पडून रहायचं. कुणाची कटकट नाही, गडबड नाही, आपणं आपले आणि आपलं कुणीतरी... आज मी त्यापासून दूर आहे पण पाऊस आला की त्या सार्‍या गोष्टी पुन्हा स्मरतात. म्हणावसं वाटतं...

ए आई, मला पावसात जाऊ दे...
एकदाच ग भिजूनी मला चिंबचिंब होऊ दे...

ती निरागसता आता शक्य नाही. माझ्यातील तारुण्याने माझ्यातलं बाल्य माझ्यापासून हिरावून नेलयं. पण तरीही लहानपणी पाहिलेली एक जाहिरात नेहमी आठवते. त्यात ऊंचावरून फेसाळत पडणारा एक धबधबा आठवतो, आकाशात उडणारे पक्षी आठवतात, हिरवागार माळ आठवतो आणि मग मनात त्या जाहिरातीतील शब्द रुंजी घालायला लागतात...

चल मन् चल उस और चले जहाँ होता ह्रदय प्रफुल्लित भी
जहाँ पंख पसारे बिना भय के खुले गगन मे उड सके मन भी...

सर्वांना पहिल्या पावसाच्या शुभेच्छा!

तुमचा,
केदार

No comments: