Tuesday, March 27, 2012

ग्रेस



ग्रेस कुणाला कळले आणि कुणाला कळले नाहीत या युक्तिवादात आता तसा काहीच अर्थ उरलेला नाही. कारण हा संध्यासूक्ताचा यात्रिक आता आपल्यातून कायमचा निघून गेलेला आहे. तो निघून गेला आहे महानिर्वाणाच्या दिशेकडे. त्यांच्यावर दुर्बोधतेचा शिक्का मारणार्‍या अनेकांचे डोळे ते गेल्याने भरून आलेले असतील. ते मान्य करण्यासाठी सुद्धा दिलदारी लागते.

ग्रेस यांची कविता मला एक दिवस सहज भेटली. त्या कवितेतला आपल्याला कळलेला अर्थ आणि त्यातील गर्भितार्थ यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्यानंतर हळूहळू जाणवत गेलं. कविता कुठलीही असू दे, त्यातील गूढरम्यता, भावविवशता आपण कल्पनाही करू शकणार नाही आणि सहसा तिथवर पोचू शकणार नाही अशा अमर्त्य भावविश्वाचं दर्शन घडवते. हृदय कोरून बाहेर काढावं, त्याचे ठोके आपल्या समोर पडतांना पहावेत, आणि आपण जिवंत आहोत का निवर्तलोय या असल्या संभ्रमात आपण पडावं असं काहीसं देखणं, मोहून टाकणारं, बर्‍याच अंशी ठाव न लागणारं किंबहूना ठाव न लागु देणारं लेखन हे खूप आतूनच उमटावं लागतं. म्हणजे...

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
नभातूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

ही कविता असू दे किंवा

देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही कारूण्याची धार


ही असू दे, त्यातील गांभीर्य आणि भावानुभुती हा केवळ अनुभव नाही. तो साक्षात्कार आहे. अनुभव शिळे होतात, साक्षात्कार नव्हेत.

अगदी त्यांच्या मृगजळाचे बांधकाम या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत सुद्धा ग्रेस म्हणतात...

संध्यामायेच्या शुभमकरोती ओंजळीतून सांडताना
तू अचानक, अवाक होऊन,
दरदरून थरथरलीस... मला प्रयाणाची दिशा दाखवीत...
तू थांबली असतीस तर या मृगजळात
एखादा रंगीत मासा तरंगू शकला असता...
तिरीप एकदा बुबुळात शिरली की मग ती
अश्रूंच्या आदेशानेही पापण्यातून खाली
सांडतच नाही; या सबब, शरमेवर तू नाही
थांबलीस !
पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे
शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?
तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच
अर्पण करतोय.
अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पणही
यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ
असतात काय ? संभवतात काय?

माझ्या मते भाषेनी बहाल केलेली चौकट बर्‍याच वेळेला वर्तुळाकार असते. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कौशल्य स्वतःला अभिमन्यू समजणार्‍या बर्‍याच साहित्यिकांकडे नसतं. तीच करामत या भाषेच्या जादूगाराने करून दाखविली. वेदनेला केवळ दु:ख समजणार्‍या महाभागांना ग्रेसची कविता समजायची नाही. अ़ज्ञाताच्या तळाशी बुडी मारण्यासाठी साहस लागतं. मनस्वीता लागते.

पुन्हा कवितेचं गाणं झालं, तरी गाणं त्यातील कवितेसाठी आणि त्यातील वेदनेच्या पुनःप्रत्ययासाठी ऐकलं जाणं यात शब्दकाराचा विजय आहे. तो विजय आहे या अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा वारसा लाभलेल्या सांध्यमग्न पुरूषाचा. ग्रेस जिंकले. मृत्युंजय ठरले ते त्या अर्थीसुद्धा.

ग्रेस म्हणजे एक गूढ. एखाद्या शापीत देवाच्या टेकडीवरील, वार्‍यावर किंचितही न हलणार्‍या एका पोक्त, अनासक्त वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या ढोलीत कुणीतरी ओलेती दिवा लावून जाते तसं काहीसं!


तुमचा,
केदार

Tuesday, February 28, 2012

दोष ना कुणाचा...

डर्बनच्या समुद्रकिनार्‍यावर फिरत असतांना किंवा सनबाथ घेत निवांत पहुडलेलं असतांना एक गोष्ट आवर्जून पहावयास मिळते. इथे असणारे ब्लॅक्स कधी सनग्लासेस तर कधी आइसक्रीम विकण्यासाठी हातात ते डबोलं घेऊन भर उन्हात फेरीवाल्यासारखे अखंड फिरत असतात. इथली गरिबी आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असमानता बर्‍याच अंशी भारताशी मिळती जुळती आहे. असो...

सांगायचा मुद्दा इतकाच की ते तसं फिरत असतांना पाहून मन भरून येतं. शेवटी 'पापी पेट का सवाल आहे' असं म्हणत मनाची समजूत करून घेतली, तरी एक सवाल मनात तसाच अबाधित आणि अनुत्तरीत राहातो. देवानी हे पोट दिलंच कशासाठी? ह्म्म...तिथेच तर खरी गोम आहे. शेवटी हे असं वणवण फिरायचं ते कशासाठी? पोटासाठीच ना?

पोटाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मीही मनाचा कौल झुगारून पोटाची भूक मिटवण्यासाठी या गराड्यात सामील झालो. तेव्हापासुनचं सारं काही लख्ख आठवतयं. माझी झुंज सुरू आहे ती तेव्हापासून. सकाळ होताच पायाला चक्र लावलेल्या पिसाटासारखा घराबाहेर पडतो. महिनाअखेरी मिळणार्‍या पगारावर माझा पिंड पोसतो. निव्वळ पोटासाठी. हे पोटच नसतं तर किती बरं झालं असतं! अशी काही पोटं माझ्या कर्तबगारीवर भरलेली ठेवायची जबाबदारी माझी! प्रत्येकाचा पिंड वेगळा तो या पैशांवर पोसला जातो. पण त्याच बरोबरीने मनाची, बुद्धीची भुक काय असते ते सुद्धा मला माहितेय आणि देवानी ती भूक शमविण्यासाठी मला संधी दिली म्हणुन मी कृत़ज्ञसुद्धा आहेच. पण ही अशी वणवण फिरणारी माणसं दिसली की एक क्षण वाटून जातं... यांच्या आयुष्याचं फलित काय?

झालं... सनबाथ घेऊन झाला... किनार्‍यावरील भिजलेल्या वाळूवरून पायांचे क्षणभंगुर ठसे उमटवत घरी चाललो...मन मनाची समजूत घालत होतं...

"जाऊ दे केदार..., जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही... ज्याचे त्याचे भोग... ज्यानी त्यानी भोगून संपवायचे..., अरे, संतांना, देवाला हे भोग सुटले नाहीत... तुझी माझी काय कथा? त्या गीतरामायणातल्या गीतातला भावार्थ आता तरी भिडतोय का मनाला?"

"भिडतोय कसला... बोचतोय...चांगलाच बोचतोय..."

बहुतेक अशाच एका उद्विग्न क्षणी प्रभु राम भरताला म्हणाले असावेत...

"दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा...

दोष ना कुणाचा..."

तुमचा,
केदार

Saturday, December 31, 2011

नववर्षाच्या शुभेच्छा!

३१ डिसेंबर साजरा करण्याच्या माझ्या संकल्पना बदलायला लागल्या आहेत. पूर्वी ३१ डिसेंबरसाठी आठवडाभर आधीपासून तयारी चालू असायची. नवे कपडे, त्या दिवशी ज्या क्लबमध्ये पार्टीला जायचं असेल त्याचे पासेस, ग्रुपची जमवाजमव वगैरे गोष्टी मी आनंदाने करायचो. पण आता ते काहीच नको वाटतं. नाचणं, गर्दीला कसंतरी बाजुला सारत जाऊन काहीतरी अर्वाच्य खाणं-पिणं, ते काऊंटडाऊन आणि बरोबर १२ वाजता एकमेकांना मिठी मारून Happy New Year असं जोरात ओरडणं. पुन्हा पार्टी संपली की डीजे invariably सगळ्यांना Happy New Year wish करतो आणि पुढे म्हणतो Have safe sex. आता मला या सगळ्या गोष्टी हास्यास्पद वाटायला लागल्या आहेत.

३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन्सचा माझ्या मते अर्थ आता फक्त एका 'सॉरी' आणि एका 'थॅंक्यू' पर्यंत मर्यादित होऊ लागला आहे. मागील वर्षी ज्या गोष्टी हातुन चुकीच्या झाल्या त्याबाबतीत सॉरी आणि या चुका सुधारण्यासाठी मला जे नवं वर्षं बहाल करण्यात आलं आहे त्या बाबतीत मनापासून थॅंक्यू.

अर्थात, माझा दृष्टीकोन याबाबतीत बदलला म्हणजे आजही जी माणसं नाचतात, दारू पितात ती वाईट आहेत असा मुळीच नाही. या सार्‍या गोष्टी शेवटी आयुष्यातील सौंदर्यशोधनाचे प्रयत्न आहेत आणि सौंदर्य कुणाला कशात दिसेल हे आपण कसं ठरवणार? मला भावणार्‍या सौंदर्याचा शोध मात्र मला लागला आहे इतकाच त्याचा अर्थ!

सार्‍यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा,
केदार

Thursday, December 22, 2011

माणुसपण देगा देवा, नाही देवत्वाचा हेवा!

काही माणसं अध्यात्माच्या नावाखाली मनात भयगंड बाळगून वावरत असतात ते पाहून मी सुन्न होतो. सुन्न अशासाठी की मी ही त्याच संस्कृतीतला. पण आताशा माझे विचार थोडेसे सत्याच्या जवळ यायला लागले आहेत. देवाला हे आवडतं, ते आवडत नाही. हे चुकीचं झालं की देव रागावतो. देवाला योग्य वेळेला नैवेद्य दाखवला नाही तर देव पाप करतो. देवाला काय, बाकीचे धंदे नाहीत? त्यानी आपल्याला फक्त आपण केलेल्या चुकींच्या शिक्षा करण्यासाठी जन्माला घातले आहे काय? बापरे... अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आत्ता घोळत आहेत. त्यांची उत्तरं फक्त माझी मलाच माहीत. दुसर्‍यांना त्यांचं ना सोयर ना सुतक. त्यांना ज्या गोष्टी करण्याची सवय झाली आहे ते त्या गोष्टी करणारंच. करा की... पण दुसर्‍यांना का तुमच्या देवाबद्दलच्या गलिच्छ संकल्पनांनी विणलेल्या जाळ्यात ओढता?

देव म्हणजे काय याचं उत्तर मोठमोठे गणिती, शास्त्रज्ञ अजून देऊ शकले नाहीत. याचा अर्थ देव नाही असा काढायचा का? छे छे... माझ्या मते देव आहे... नक्की आहे... पण तो दयाळु आहे... कनवाळु आहे... एखादा मनुष्य २० किलोमीटर प्रवास करून भुकेला आपल्या दर्शनाला किंवा पुजनाला आला आहे, मग भले तो येतांना दोन फुलं कमी का घेऊन येईनात, त्याचा चेहरा उतरलेला का असेनात, त्याची दाढी वाढलेली का असेनात... तो माझा आहे असाच विचार देवाच्या मनात येत असावा. पण अध्यात्माचं थोतांडं माजवणारे काय काहीही बोलतात. त्याचा विचार मी कुठपर्यंत करावा? मनात भिती असावीच पण भयगंड नसावा हे नक्की. भिती आपल्याला चुकीचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करेल पण भयगंड आपल्याला पाऊलंच उचलु देणार नाही, मग आपल्या मनुष्यपणाचं काय करायचं? माणसाचा गुणधर्म चुका करणं, त्यातून शिकणं. हा गुणधर्म जर देवानीच माणसात घातला असेल तर तोच देव हातून चुकुन झालेल्या चुकांसाठी माणसाला शिक्षा करेल ह्यावर माझा तरी नाही बुवा विश्वास बसत.

देव निळ्याशार आकाशासारखा निरामय असेल, भरून आलेल्या काळ्या आभाळासारखा गुरगुरत अंगावर येईल असं मला तरी वाटत नाही. देव पाण्याच्या संततधार नैसर्गिक प्रपातासारखा एकसंध आणि शुद्ध असेल, तो साठुन राहिलेल्या डबक्यासारखा कळकट्ट आणि संकुचित नक्कीच नसेल. देव समईच्या ज्योतीप्रमाणे शीतल असेल, तो भसाभ्भस तेज अंगावर फेकून आपलं देवपण सिद्ध करणारा असेल असं मला वाटत नाही. आपलं बाळ आपल्यापाशी आलंय, ते थकलंय, त्याच्या हातून आपल्यासाठी होत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याबद्द्ल त्याला खरी आत्मीयता आहे म्हणून होत आहे हे देवाला कळत नसेल? कोण आई दमून आलेल्या मुलाला किंवा मुलीला पाय चेपण्यासाठी तासनतास राबवून घेईल? माझ्या तरी पहाण्यात अशी आई आजवर आलेली नाही. मग 'माऊली' असं बेंबीच्या देठापासून केकाटायचं आणि त्याच 'माऊली'ला घाबरून बिचकुन रहायचं यात कितपत तथ्य आहे? बहूतेक अशी माणसं अर्धवट तरी असतात किंवा अतिशहाणी तरी यावर माझा ठाम विश्वास बसत चालला आहे. संताघरचं अन्न मिळणार म्हणून ही माणसं काहीही करतील, पण अंगात खरखुर संतंपण भिनावं यासाठी ही माणसं काय विशेष करतात? अरे बेट्यांनो, प्रसाद खाऊनच जर सुख मिळणार असेल तर मग प्रसादासाठी दर दिवशी रांगेत उभे रहाणारे भिकारी आज एकावेळच्या अन्नापासून वंचित का रहातात? हा साला सगळा स्वार्थ आहे. यात शुद्ध भावना किती आणि वासना किती हे त्यांचं त्यांनाच माहीत. आणि अगदी खरी भावना असली तरीही जोवर देवाधर्माच्या या बाजारात त्यांच्यासारख्यांनी निर्माण केलेल्या दिखाऊ संकल्पना आहेत तोवर देवाबद्द्लचा भयगंड माणसाच्या मनात तसाच राहील आणि कालांतराने तिथे अंधश्रद्धा तरी निर्माण होईल किंवा अनास्था तरी!

माणसातलं माणुसपण मेलं की त्याच्यातला देवही मरतो असं मला वाटतं आणि म्हणुनच देव आपल्यासोबत असावा असं वाटत असेल तर माणुसपण जपणं हा इतकाच सोपा उपाय रामबाण आहे. बाकी हे झाले माझे विचार... थोडे जहाल असतीलही...पण ज्या देवाने मला निर्माण केलं त्याच्याविषयी आणि मला जसं निर्माण केलं त्याबाबतीत कृतज्ञ रहाण्याचं सोडून त्यानी माझ्यात ओतलेल्या जिवंत माणुसपणाशी प्रतारणा करण्याचा मुर्खपणा मी आजवर करत आलो. आता बास! अध्यात्मात उंचावर पोचणं यापेक्षाही उंची गाठणं जास्त महत्वाचं आणि उंची गाठायचीच असेल तर देवाधर्माबद्द्लचा डोळस दृष्टीकोन अंगिकारणं याला पर्याय नाही. शेवटी...

जेथे जातो तेथे तो माझा सांगाती ।
चालविलं हाती धरोनिया ।।

तुमचा(काहीसा उद्विग्न),
केदार

Monday, December 19, 2011

आज संध्याकाळी...


आज संध्याकाळी,
घुसमटलेपण असह्य झालं,
मनात पाचोळा पाचोळा झालेल्या स्मृतींशी,
एकांतात बोलण्यात बराच वेळ निघून गेला.
तरी त्यांचा चोथा झाला असं अजून म्हणवत नाही.

कारण ते घुसमटलेपण मला कुठेतरी हवयं.
तुझ्या आठवणींचं ते द्योतक आहे.
माझ्यातील उर्जेचा ते स्त्रोत आहे.

समोर सूर्य अस्ताला चाललाय.
आणि मी तुझ्यासोबत....

छे.... तु आहेस कुठे?
आहेत फक्त तुझ्या स्मृती... काळोखात नकळत विरणार्‍या...
घुसमटलेपण तीव्र करणार्‍या...

अन् तरीही....
तुझ्या आठवणींत रमण्यासारखी रमणीय संध्याकाळ नाही.

..
केदार

Friday, November 11, 2011

'शलाका'

Photo of Engagement Proposal Sunrise on the Beach

माझी मैत्रिण माझ्याशी आज सहज बोलत असता तिच्या डोळ्यात अचानक साठुन आलेलं पाणी मी पाहीलं. तशी ती फार जुनी मैत्रिण आहे असंही नाही. पण तरीही तिला तिच्या दु:खाचं कारण विचारण्याचं स्वातंत्र्य मी आपणहून घेतलं. तिने सुद्धा मला मोकळेपणाने तिच्या मनातलं सांगायला सुरूवात केली.

"७-८ वर्षं लग्नासाठी मुलं बघतेय रे, पण अजून लग्न ठरतं नाही. वय वाढत चाललंय. प्रत्येक गोष्टी त्या त्या वयात व्हायला हव्या. वयाची पस्तिशी झाली. बहूतेक माझ्या नशीबात लग्न दिसत नाहीये".

मी या अनपेक्षित प्रसंगामुळे थोडासा गांगरूनच गेलो, खोटं कशाला बोला? शलाका अगदी उदास होऊन गेली होती, क्षीण झाली होती. तिच्यात तेजाचा अंश शिल्लक राहिला असावा असं वाटत नव्हतं. या सार्‍या वर्षात तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता यात शंका नाही. स्वाभिमानासोबतच रंगवलेली स्वप्न पटापट उलटणार्‍या वर्षांसोबत फिकट होत चालली होती. थोडावेळ शांततेत गेला अन् थोड्या वेळाने ती शांतताही बोचू लागली. मला बोलल्यावाचून करमेना. मी हळूहळू बोलण्यास सुरूवात केली.

"शलाका, लग्न ठरत नाही हे तुझं दु:ख एकवेळ मी समजू शकतो पण त्यासाठी आयुष्य आनंदाने जगण्याचं टाळणं हे कितपत योग्य वाटतं तुला?"

"नाही रे, एकटी मुलगी लग्नाशिवाय राहिली की समाज मागे बोलतो"

"समाज.................." मी किंचाळणारच होतो. (: "आता माझी सटकेल" असंच म्हणावसं वाटायला लागलं मला... :)

"समाज... समाजाची चिंता करायला, समाजानी तुझं काय केलंय? तुझं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झालं असतं तर याच समाजानी बालविवाह केला म्हणून नावं ठेवली असती हे कळतंय का तुला? आपली पाठ फिरल्यावर आपल्याविषयी गैर बोलणार्‍या समाजाबद्दल मला काहीही सोयर-सुतक नाही आणि या असल्या कृतघ्न समाजाचं आपण देणं लागतो हे मला अजिबात मान्य नाही. समाजाचा विचार समाजाभिमुख लोकांनी करावा. आपण कुणासाठी जगणं शक्य झालं नाही तर स्वत:साठी तरी जगावं. You are just answerable to yourself. स्वत:ला आरशात पहातांना प्रसन्न वाटलं की आरसा पण हसतो. आरशाला कशाला कारणं द्यायची नावं ठेवायला? आणि कारण द्यायचीच कशासाठी? काय कमी आहे तुझ्यात? दिसायला छान आहेस, सुशिक्षित आहेस, सुसंस्कृत आहेस, मोठा पगार आहे, हुद्दा आहे, स्वत:ची गाडी आहे, फ्लॅट आहे. याचा माझ्यामते अर्थ तु यशस्वी आहेस असा नाही पण समाजाच्या दृष्टीने नक्कीच आहेस."

मी धडाधड बोलून गेलो.

बर्‍याच वेळाने शलाका थोडीशी हसली.

मला थोडं बरं वाटलं. ती हसली म्हणूनही आणि माझ्या भाषणाने मला स्वत:लाच जरा सकारात्मक वाटायला लागलं.

"The best way to cheer yourself up is to cheer someone else up" हे किती खरं आहे हे पटलं. मी पुढे बोलायला सुरूवात केली.

"पण हाच समाज तुझ्या या चांगल्या गुणांचं कौतुक न करता, तुझा ज्यात काहीही दोष नाही त्या गोष्टींवर ताशेरे ओढतो हे तुला पटतं?"

"नाही"

"नाही ना, म्हणून म्हणतो या चार भिंतीत अडकून पडू नकोस. ही चौकट सरड्यासारखी रंग बदलते. हिचं रुपांतर एकदम coffin मध्ये कधी होईल कळणारही नाही. "

तिला थोडंसं कळलेलं दिसलं. तिने डोळे पुसले. मी सिगारेट लाईट केली आणि पुढे बोलायला लागलो.

"आता राहीला प्रश्न वयाचा. त्याचा बोलबाला कशासाठी? मला माझी तिशी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापेक्षा जास्त बरी वाटते. एक प्रकारची clarity आलेली असते या वयात. काय करावं याचं उत्तर मिळतच असं नाही, पण काय करू नये हे नक्की कळतं. आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं. आपल्या स्वत:साठी जगायचं. दुसर्‍यांसाठी काही करायचं असेल तर त्याची सुरूवातसुद्धा स्वत:पासून करावी लागते. आपल्यातले गुण ओळखायचे. काहीही होवो आपला स्वत:चा effectiveness कमी होऊ द्यायचा नाही. तुझं दु:ख वय वाढत चाललयं हे नाही आहे. तुझं दु:ख वाढत्या वयासोबत आपण काही worthwhile करत नाही आहोत हे आहे. मला सांग, तुझ्या आयुष्याचं ध्येय काय?"

"आनंदी होणं" ती पटकन म्हणाली.

"मग फक्त तुझं लग्न झालं की तु आनंदी होशील, एरवी नाही?"

"तसं नाही. अरे पण वय वाढत चाललंय"

"तु जे सांगतेयस ते पटतयं मला आणि तुझं लग्न सुद्धा होईल लवकरच, पण तोपर्यंत स्वत:ला उत्तम मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थितीत टिकवून ठेवण्याचं काम कोणाचं, तुझंच ना? ज्यावेळेस तो क्षण येईल त्यावेळेस त्याचं स्वागत करायला तु धड नकोस? आणि आयुष्याचा आनंद तुझ्यामते जर तारुण्यात आहे तर मग मला एक सांग,

शुभ्र, नीटस कपडे घालून एक प्रसन्न व्यक्ती आपल्या समोर उभी आहे...
अंतर्बाह्य शांत...
तिच्या केसांमधील विरळ चंदेरी बटा तिच्या आजवरील अनुभवांचे कथन करताहेत....
तिच्या डोळ्यात एक आत्मविश्वासपूर्ण अन् मार्दव सुहास्य आहे....
शरीराचा व्यास सुसंगत आहे...
लक्ष्मीचं, कलेचं, साधनेचं तेज तिच्या चेहर्‍यावर झळकतंय, याला तारुण्य म्हणत नाहीत?"

तिचे डोळे चमकले. मी ते पाहिलं. हे सगळं बोलून मला स्वत:लाच खूप शांत वाटायला लागलं. बहूतेक माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं माझी मलाच मिळाली होती.

मी अजून बराच वेळ बोलत राहीलो असतो पण इतकं बोलून मी थांबलो. ती सुद्धा आधी पेक्षा बरीच शांत झालेली दिसत होती. दिवस संपला. कार काढली आणि घराकडे निघालो. रस्त्यात नेहमीप्रमाणे शनिवारात थांबलो चहा सिगरेटसाठी. एरवी जाणवणारा आजुबाजुचा प्रचंड कोलाहल शांत झाल्यासारखा वाटत होता. आपणं परिस्थितीपेक्षा मोठे झालो की असं घडतं हे मी कुठेतरी ऐकलं होतं.

ही तिची शांतता टिकेल, न टिकेल. मी पुन्हा या विषयावर काही बोलू शकेन न शकेन, पण एक मात्र नक्की...माझ्या प्रत्येक वाढदिवसाला "मी वयात आलो" हे असं म्हणण्याइतका नितळ दृष्टीकोन आणि निखळ मानसिकता मला लाभावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:चं स्वत:बरोबर असलेलं नातं दृढ करणं.

कुसुमाग्रजांनी कुठेशी लिहून ठेवलयं...

निराशेचा जरी अंधार हा असे
'मी'पणाचे नाते प्रकाशाशी...

माझे प्रयत्न चालू आहेत...आज फक्त झरोक्यावरची धूळ साफ केली आहे. उद्याच्या सुर्यासोबत त्यातून एखादी 'शलाका' येईल आणि ही चौकट तेजानी झळाळून उठेल...

विश्वास आहे.... मला विश्वास आहे...

तुमचा,
केदार

Thursday, November 3, 2011

स्वत:ला माफ केलं पाहीजे

मी स्वत:ला जाणते अजाणतेपणी कोसत असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की वाईट वाटतं. एक प्रकारची निराशा आणि हरल्याची भावना येते. यातला काही भाग मी स्वत:कडून जरा जास्त अपेक्षा करतो म्हणून असेल का? एखादी गोष्ट मला वाटते तशीच घडावी यासाठी आटापिटा करूनही ती गोष्ट घडायची तशीच घडल्यानंतर काहीतरी राहून गेलं असं वाटून आपल्याकडे कमीपणा घेण्यात कितपत तथ्य आहे याचा विचार मी सध्या करतोय. अहोरात्र करतोय. मी सुद्धा एक माणूस आहे हा विचार मी फार पूर्वी कुठेतरी दूर टाकून दिलाय आणि perfection च्या वाटेवर चालण्याचा दुबळा प्रयत्न चालू केलाय. Perfection? कशात perfection हवंय मला? एखादी संस्था मग ती सामाजिक असो की लग्न संस्था असो, तिच्यात perfection असणं हा झाला आदर्शवाद, पण ते तसं कधीच नसू शकतं हे आताशा मला कळायला लागलंय.

दोन भांडी आपटणारंच पण त्यांना पोचा जात नाही हे पहाणं, जमू शकतं?
एकमेकांची उणी दुणी काढतांना एकमेकांच्या चांगल्या गुणांचही स्मरण ठेवणं, जमू शकतं?
दुसर्‍यातील चुका त्याला चुका वाटणार नाहीत पण सुधारणा तर होईल अशा प्रकारे सांगणं, शक्य असतं?

असतं हे सारं शक्य असतं...पण त्यासाठी योग्य तशी साथसुद्धा मिळावी लागते. संशयाने छिन्न झालेल्या मनाला आपण केलेली कुठलीच गोष्ट कशी पटेल? थोड्क्यात perfection सापेक्ष नसतं. ते एकतर असतं किंवा अजिबात नसतं. अन् हे ठाऊक असूनही पूर्ण पुरुष बनण्यासाठी मी चालविलेला व्यर्थ खटाटोप मला आता बोचू लागलेला आहे. त्यापेक्षा अपूर्णतेतली गोडी भावण्यासाठी काय करावं हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करेन.

केदार