असो. तर गाडीवर टांग टाकली आणि तुळशी बागेत पोहोचलो. (पुण्यात आम्ही दुचाकी, चारचाकी सार्यालाच 'गाडी' असं संबोधतो.) दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात सारे व्यवहार चालू होते. खुद्द राममंदिरात सुद्धा दिवे नव्हते. मनाला थोडासा आनंद झाला. सगळीकडे अंधार असतांना, फक्त एका समईच्या प्रकाशात देवाचा गाभारा, मूर्ती अद्वितीय दिसते. रामाचं, दास मारूतीचं दर्शन घेतलं, थोडा वेळ सभामंडपात विसावलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी पुढे झालो. तुळशी बागेतील राममंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या अगदी सुरूवातीस, वर भिंतीवर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं एक विधान लिहिलेलं आहे. ते मी आजवर असंख्य वेळा वाचलेलं आहे पण जेव्हा कधी मी ते पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा तोच आनंद, उत्साह, औत्सुक्य आणि उर्मी अनुभवतो. ईश्वराच्या जवळ जाण्याविषयी, साधनेविषयी त्यात काही अभूतपूर्व असं लिहिलेलं आहे. तो एक गुरूमंत्रच आहे, सोप्या शब्दात मांडलेला!
"केदार, परमेश्वर प्राप्तीचा अर्थ शोधायचा म्हणजे काय? तो आपल्यातच लपलेला, रुजलेला आहे. त्याची रूपं असंख्य आहेत. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट पहाशील, अनुभवशील त्यावेळेस तिथे परमेश्वर आहे असं समजण्यात काहीच वावगं नाही. आज तू रियाज केलास. गंधार लावलास. त्या गंधारातून जे सौंदर्य, जो आनंद निर्माण झाला त्यात परमेश्वर आहे हे विसरू नकोस. परमेश्वर असाच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतो."
सगळीकडे frequency आहे. ती जिथे match होते तिथे सूर उमटतात, जिथे होत नाही तिथे असूर उपटतात. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं ते विधान मी याच दृष्टीने बघतो. ईश्वरप्राप्तीचा अर्थ शंखचक्रगदाधारी प्रकटणं हा नव्हे, छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वराचा सहवास अनुभवणं आणि त्यावर unbiased विश्वास ठेवणं हा आहे. पुन्हा साधनेला समर्थपण येण्यासाठी सातत्याची जोड हवीच आणि नेमकं हेच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एरवी जबाबदार्यांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आणि संसार, कामकाज यात स्वत्व हरवून गेलेला मनुष्य एखाद्या स्वत:ला हव्या असलेल्या पण हरवून गेलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा पुन्हा सज्ज होतो यालाही सातत्यच म्हणायचे ना? माझ्या प्रत्येक भेटीत तुळशीबागेतील राममंदिरात जतन करून ठेवलेलं हे विचारधन माझ्या मनावर आनंदघन म्हणून बरसतं आणि मला सातत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतं. स्वामी परमहंस म्हणतात...
"अथांग महासागरात मौल्यवान मोती वैपुल्याने मिळतील, परंतु ते मिळविण्याकरता तुला अचाट साहस लागेल. जरी तुला काही वेळा अपयश आले तरी सागरात मोती नाहीतच असे म्हणता येणार नाही. सातत्याने न खचता प्रयत्नशील राहिलास तर यश खात्रीने तुझेच आहे.
त्यापेक्षाही कष्टतर अनुभव मानवास ईश्वर साधनेबद्द्ल प्रत्ययास येईल. वैफल्याने खचून न जाता तू अविश्रांत प्रयत्नशील राहिलास तर मी विश्वासपूर्वक सांगतो की ईश्वर तुझ्या जवळच येईल.
प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे.”
हाच लेख येथेही वाचता येईल.