३-४ दिवसांपासून काहीसं उदास वाटतयं. त्याला काही कारणं आहेत. काही करू नये असं वाटतय. हातून काही विशेष घडत नाहीये. स्विमिंग बंद पडलयं कारण समर कॅंम्प्स चालू आहेत. एकच बॅच असते दिवसभरात आणि ती बॅच कधीकधी चुकते. ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होतो वगैरे... मग काल संध्याकाळ पण तशीच चालली होती. का कोणास ठाऊक 'मारवा' ऐकावासा खूप वाटत होता. स्वत:च गायला बसणार होतो, तानपुरा काढून ठेवला होता पण पुढे त्याचीही इच्छा होइना. कधी कधी self-motivation कमी पडतं. मग youtube वर भीमसेनजींचा 'मारवा' ऐकला. 'बंगरी मोरी' हा त्यांचा प्रसिद्ध छोटा ख्याल. काय एक एक सूर लावलाय पंडीतजींनी! पण त्यामुळे व्हायचा तो परिणाम शेवटी झालाच. अजूनच कातर वाटायला लागलं. कसली तरी हुरहुर जाणवायला लागली. अन इतक्यात काही जुन्या मराठी गाण्यांचे दुवे डोळ्यांपुढे आले. असच सहज बघता बघता 'कुंकू' चित्रपटातील एक गाणं सापडलं. आईला बहूतेक मी काहीसा उद्विग्न आहे हे कळलं असावं. ती सुद्धा माझ्या खोलीत येऊन गेली. अन् तितक्यात streaming संपून ते गाणं लागलं आणि शब्द उमटायला लागले. आई काहीच बोलली नाही फक्त माझ्या पाठीवर एक आश्वासक थाप देऊन हसत हसत कामासाठी बाहेर निघून गेली.
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची ||
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ||
हाताच्या मुठी आपसुक वळल्या. छे... आयुष्यात अचाट दु:ख आहे पण निराशेच्या दलदलीतून खेचून बाहेर काढणारे काही अदृष्य हातही आहेत. आपण फक्त हात पुढे करण्याचा अवकाश...
अन् आज मला खूप बरं वाटतयं. काल पेक्षा खूप बरं! पण वर म्हटल्याप्रमाणे या माझ्या सुधारित मनस्थितीत बर्याच जणांचा हात आहे. गीतकार शांताराम आठवले यांचा, संगीतकार केशवराव भोळे यांचा, पेटीवर जिवंत साथ करणार्या वसंत देसाई यांचा, शब्द सूर अभिनयातून काळजापर्यंत पोचविणार्या मा. परशुराम यांचा आणि एक हात पाठीवरचा...
तुमचा,
केदार
2 comments:
केदार नमस्कार,
खुप दिवसानी तुमचं छान पोस्ट वाचलं. आनंद वाटला.आणि हो हयुस्ट्न सफर पण मस्त.
केदार नमस्कार,
खुप दिवसानी तुमचं छान पोस्ट वाचायला मिळालं.
आणि हयुस्टन सफर पण मस्त.
Post a Comment