आंबोली... स्वप्नातलं गावं! निसर्गाच्या सानिध्यात माणूस स्वत:ची दु:ख हरवून जातो हे हळूवार सांगणारं, डोंगराच्या कुशीतलं, एखादी सुंदर स्त्री श्वेत वसने लेऊन ओलेत्याने सामोरी यावी तसं शुभ्र धुक्यात भिजलेलं चिंब ओलं, बेहोश करणारं पण पावित्र्याची साद घालणारं, माणसाच्या विनाशक स्पर्शापासून अजून काहीसं दूर असलेलं हे खेडं! माझा आंबोलीला जाण्याचा योग अचानक आला. योग हा ठरवून येत नसतोच म्हणा. तो जमून येतो अथवा येत नाही. अचानक एक दिवस ठरलं, हॉटेलचं बूकींग मिळालं, आणि निघालो आम्ही आंबोलीला! पहाटे ५:३० ला घरातून निघालो.
जाता जाता आधी कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यावं असं मनात योजलं होतं. सारी मदार महालक्ष्मीवरच! तिच्या मनात असेल तर दर्शन झाल्यावाचून रहायचं नाही. रस्त्यात आधी एका ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट करायचं ठरलं. मग घरातून आणलेला ब्रेड बटर आणि गरम चहा पिऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. पुढे नॉन स्टॉप कोल्हापूरपर्यंत गेलो. कोल्हापुरच्या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर तिथे महालक्ष्मी मंदिराचा रस्ता विचारत विचारत आम्ही पुढे जात होतो. महाराष्ट्रात कोठेही १०० कि.मी. दूर गेल्यास भाषा बदलते हा प्रत्यय येत होता. त्या त्या ठिकाणची बोलीभाषा, बोलण्याची पद्धत, शब्दांचं टोनींग, शब्दकोष सारं वेगळचं. पण वेगळं म्हणूनच कानाला अतिशय गोड. माणूस बदलासाठी किती आसुसलेला असतो!
कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे सौंदर्य आणि शक्ती यांचा अजोड मिलाफ! तिचं रूप, तिची शक्ती अवर्णनीय! त्या मंडपात गेल्यावरच काहीतरी दैवी भासायला लागतं. कोल्हापूरशी माझा तसा काही संबंध नाही. पण काही वर्षांपासून कोल्हापुरबाबत का कोणास ठाऊक जिव्हाळा वाटतो. रांगडेपणा भले ठायी ठायी भरलेला असेल पण दिलाचा सच्चेपणाही दिसतो यात शंका नाही. मंदिरात 'मुख्य'-दर्शनासाठी मोठी रांग होती म्हणून आम्ही 'मुख'-दर्शन करण्यासाठी वेगळ्या रांगेतून आत गेलो. दर्शन झालं यात सारं काही आलं. पण कोल्हापुरची कमान पार केल्यापासून एक अनामिक हुरहुर सदैव जाणवत होती. माणूस आठवणींचा गुलाम असतो आणि त्या मंदिराशीही माझं एक जुनं नातं आहे. तिथल्या काही जुन्या आठवणी फार अस्वस्थ करून गेल्या. तो मंडप, फुलांचे हार, वेण्या, नारळ, हळद-कुंकु, तांदूळ, खारवलेल्या कच्च्या कैर्या, त्या मागे असणारी ती एक शाळा... असो... एखादी जखम जितकी खोल तितकी चांगली... त्यामुळे इतर दु:ख काहीशी लोभसवाणी वाटू लागतात.
आणि मग तिथून आम्ही आंबोलीसाठी रवाना झालो. कोल्हापूरहून आंबोलीकडे जाण्याचा रस्ता म्हणजे एक चमत्कार आहे. लोण्यासारखा रस्ता बनविला आहे. डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आपल्या देशाचे/राज्याचे सरकार इतके कार्यक्षम असू शकते? जर असू शकते तर मग बाबांनो पुण्यातले रस्ते बनवा की. का जाळता आम्हाला कणाकणानी आणि किमी-किमीनी?
आंबोलीला जाण्याचा मार्ग संकेश्वरवरून जातो. संकेश्वरपर्यंत रस्ता अफाट आहे. गजब वेगानी जाता येतं. संकेश्वरला आंबोली फाट्याला वळल्यानंतरही रस्ता उत्तमच आहे पण मग वेग थोडा मंदावतो. वळणं आहेत. मध्ये गावं आहेत. तिथून गाडी सांभाळून चालवलेली बरी. बरच अंतर पार केल्यावरती आम्ही गडहिंग्लजला पोहोचलो. दुपारी २ चा सुमार. भूक लागली होती. मग तिथल्या एका सामान्य हॉटेलमध्ये जेवून आम्ही पुढची वाट धरली. आंबोली जसं जसं जवळ येत चाललं तसा तसा हवेत गारठा जाणवू लागला. ढग खाली खाली येऊ लागले. दुपारी ३-४ ची वेळ असूनही धुकं दाट होतं. पाऊस पडत होता आणि अशा वेळेस आम्ही आंबोलीत शिरलो. प्रथम काही विशेष लक्षात येईना. रस्ते कळेनात. आम्ही रहाणार होतो ते ग्रीन वॅली रेसॉर्ट सुद्धा नीट कळेना अन तेवढ्यात मला हॉटेलचा साईनबोर्ड दिसला. आम्ही हॉटेलवर येऊन थडकलो. सामान काढलं, चेक इन केलं आणि पहिला चहा मागवला. थंडी होती, त्यात पावसात थोडसं भिजायला झालं होतं. गरम चहाचा पहिला ऊष्ण घोट आनंद देऊन गेला. सकाळपासून ड्रायविंग करत असल्यामुळे मी सुद्धा जरा पहूडलो पण झोप लागली नाही. बाहेर इतकं सुंदर वातावरण असतांना झोपायचं कसं? मन मनासी खायला लागलं. गरम पाण्यानी आंघोळ केली आणि खूर्ची टाकून गप्पा मारत हॉटेलच्या ऐसपैस पॅसेजमध्ये बसलो. आजूबाजूला किर्रर्र जंगल. वाहनांचे आवाज नाहीत, माणसांचा कोलाहल नाही. आवाज फक्त जंगलातील रातकिड्यांचे, बेडकांचे, टिटव्यांचे, काहीसे अपरिचित!
ग्रीन वॅली रेसॉर्ट
हळूहळू संध्याकाळ होत चालली. जंगलातील आवाज गडद होत गेले. धुकं गडद होत गेलं. समोरच्या हॉटेलमधील गॅलरीत टांगलेला केशरी कंदील धुक्याच्या आड गेला. आपलं क्षीण अस्तित्व दर्शवू लागला. जोराच्या वार्याबरोबर धुकं काहीसं फिस्कटलं की एक फिक्कट केशरी लकेर उमटे. पुन्हा सारं धुकंमय! थोड्या वेळाने आम्ही जेवणासाठी उठलो. आंबोली सिंधुदूर्ग जिल्ह्यात येतं. Authentic मालवणी खाण्यास मिळेलं या आशेने मी मालवणी चिकन मागविले. सुरमईचा एक तुकडा मागविला. पण जेवण खास नव्हतं. थोडी निराशा झाली. सोलकढी मात्र उत्तम होती. शतपावली करून आम्ही झोपण्यास रूमवर परत आलो. खरतर इतकं ड्रायविंग झाल्यामुळे झोप यायला हवी होती. पण थकवा कुठल्या कुठे दूर पळून गेला होता. बराच वेळ झोप लागली नाही. काही काळानी डोळे मिटले आणि जाग आली तेव्हा चहाचा घमघमाट रूममध्ये पसरत होता. मसाला चहा.... अहा.......
आंबोलीतील दुसरा दिवस. आज सावंतवाडीला जाण्याचा बेत होता. सावंतवाडी आंबोलीच्या पूर्वेस आहे. मध्ये घाट लागतो. आंबोली-सावंतवाडी म्हणजे ३०-३५ किमी. उतरंड आहे. घाट तसा अवघड आहे पण गाडी चांगली चालविणार्यास फार त्रास नाही व्हायचा. घाट अवघड आहे त्यामागे अजून कारणं म्हणजे दुहेरी वाहतुक, बर्याच ठिकाणी कठडे मोडलेले, दरड कोसळण्याचा धोका, पर्यटकांची गर्दी आणि धुकं. त्यातून वाट काढत जाणं म्हणजे थोडसं अवघड. आम्ही ९:३० ला सकाळी हॉटेलवरून निघालो. धुकं साधारण तसचं होतं. घाटाच्या सुरूवातीला धुकं दाट होतं ते नंतर जसा जसा घाट उतरू तसं तसं विरळ होत गेलं. संततधार चालूच होती. तो घाट म्हणजे डाव्या बाजूस उंच कपार आणि उजव्या बाजूस खोल दरी. दरीतून खालची गावं पत्त्यातल्या घरांसारखी दिसतात. पण सगळं हिरवंगार! जंगलच! कोकणी लोकांच्या म्हणण्यानुसार फॉरेष्ट! घाट फारच रमणीय. रस्ता मुळात चांगला आहे. फार खड्डे नाहीत. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यात दुतर्फा दाट झाडी. फणस, आंबे, नारळी, पोफळीची झाडं. छोट्या छोट्या वाड्या. हातात झावळ्या घेऊन खेचत चाललेली किंवा डोक्यावर फणस वागवत चाललेली कोकणी कष्टाळू माणसं. थोडं अजून खाली गेलं की दोन्ही बाजूंनी वस्त्या चालू होतात. लाल उतरत्या छपरांची कौलारू घरं, घरात ऐसपैस चौसोपी वर्हांडा, घरापुढे विहीर, एखादं गाय वासरू, तुळशी वृंदावन. हे मात्र खरं की सार्यांच्या घरासमोर हटकून तुळशी वृंदावन होतं. म्हणजे आपली संस्कृती अजून कुठेतरी जपली जातेय!
सावंतवाडी छोटसं गाव आहे. गावात मोती तलाव, राजवाडा वगैरे प्रेक्षणीय स्थळ आहेत. आम्ही तेथे पोचलो तेव्हा पाऊस पडत होता. मग मोती तलावाच्या बाजूस गाडी पार्क करून आम्ही मे. काणेकर यांच्या लाकडी खेळण्यांच्या दुकानात गेलो. माझ्या ५ वर्षांच्या भाच्याने मला एक लाकडी सायकल आणि घोडा आणण्यास सांगितला होता. तिथे थोडी खरेदी केल्यानंतर, आम्ही वरच्या चितार आळीत गेलो. तिथे काही अजून दुकान दिसली. तिथून अजून थोडीशी खरेदी करून आम्ही राजवाडा पहाण्यास गेलो. राजवाडा बाह्यदर्शनी चांगला आहे. अंतरंग कुणी पाहू दिलं नाही म्हणून काही अजून सांगू शकत नाही. तिथे गेलो तेव्हा एक माणूस टेबलावर पाय पसरून खुर्चीत निवांत झोपला होता. त्याला उठवल्यावर त्याने काहीशा नाराजीच्या सुरात आम्हाला राजवाडा बंद आहे असं संगितलं. अजून काही बोलण्याचा प्रश्न नव्हताच. तसेच मागे वळलो आणि राजवाड्यालगतच एक गल्ली जाते तीत शिरलो. तिथे ऐतिहासिक काही नव्हतं पण 'भूक' ही भौतिक गरज सतावू लागली होती. त्या गल्लीत 'साधले मेस' प्रसिद्ध आहे असं कळलं होतं. पूर्ण शाकाहारी आणि उत्तम प्रतीचे घरगुती ब्राम्हणी जेवण. पोळ्या, भाजी, आमटी, ताक, कोशिंबीर. साधच पण सुग्रास. ५० रु एक ताट. :) मला आमच्या पुण्यातलं बादशाही आठवलं. तिथे सुद्धा असचं छान जेवण पेशवाई थाटात मिळतं.
मोती तलाव
राजवाडा (सावंतवाडी)
सावंतवाडीत अजून करण्यासारखं काही नव्हतं. २ - २:३० वाजले असावेत. सावंतवाडीपासून काही अंतरावर रेडी गणपती आहे. तिथे जाण्याचं ठरलं. गणपतीची विशाल, देखणी मूर्ती आहे. मंदिराच्या मागील भागातून समोर समुद्र दिसतो. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. रेडी गणपतीला जाताना शक्य तेवढा सावधपणा बाळगलेला बरा. रस्ता सरळ नाही. दोन्ही बाजूंनी जंगल. गावं आहेत पण काही खास मदत मिळणार नाही. अत्यंत आत आत गेल्यावर हे मंदिर आहे. पुन्हा निसर्ग विशेष नाही. वाट्टेल तेव्हा पाऊस पडतो, रस्ता पूर्ण अंधारात बुडून जातो. का कोणास ठाऊक पण या रस्त्यावर फारसं बरं नाही वाटलं. एखादी वास्तू, ठिकाण, जागा, रस्ता असा असतो जिथे मनाला प्रसन्न वाटत नाही. त्यातलाच हा एक रस्ता. पुन्हा समुद्राचं दर्शन होऊनही मन आनंदी झालं नाही. समुद्र उसळलेला होता. त्या रूपात रौद्रता भासली. अगदी जाण्याचा निर्णय घेतलात तरी दिवसाउजेडी गेलेलं आणि परत आलेलं बरं.
पावसाचा रंग दिसायला लागला. वेळेत आंबोलीच्या दिशेने कूच केलेलं बरं अस मनात म्हणत होतो आणि ज्याची भिती होती तेच झालं. मी माझ्या आयुष्यात पाहीलेलं सगळ्यात दाट धुकं त्यादिवशी चराचरावर पसरलं. सारंच गायब. गाडीचे फॉग लॅंप्स लावूनही काही उपयोग नाही. २ फुटांवरलं काही दिसायला तयार नाही. मग घाटात एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. थोडी वाट पाहीली. पण धुकं कमी होइना. काहीसा अंधार जाणवायला लागला. आजुबाजुनी गर्द झाडी. तुरळक माणसं. आता मात्र मनात ठरवलं की आंबोलीला लवकरात लवकर पोचायचं. घाट चढून थोडा वर आलो आणि पाहीलं जवळ जवळ सार्यांचीच ही अवस्था आहे. गाड्या अत्यंत धीम्या गतीने चालत होत्या. समोरून येणार्या गाड्या थांबून शहानिशा करून पुढे सरकत होत्या. आता मी घाट चढत असल्याने दरीची बाजू माझी होती आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे बर्याच ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. त्यात गाडी चालविणे म्हणजे दिव्य होतं. जरा गफलत झाली म्हणजे आम्हाला दरीचं जवळून दर्शन आणि देवाचही. गाडीच्या काचा बंद केल्या तर हॉर्न ऐकू येईनात, बाष्प जमायला सुरूवात. उघड्या ठेवायला माझी हरकत होती. का? कारण घाटमाथ्यावर माकडांची टोळकी निर्व्याज नाचत होती. त्यातलं एक माकड गाडीत घुसलं तर सारं कितीत पडेल? :) अन शेवटी एकदाची ती आंबोलीची कमान आली. मनात देवाचं स्मरण केलं आणि हॉटेल मध्ये पोचून मसाला चहा मागविला. त्या रात्री मी हॉटेलमध्ये चायनिज फूड मागविलं. सुरेख चायनिज फूड. आता याला काय म्हणायचं? ग्लोबलायझेशन की लोकलायझेशन?
तिसरा दिवस उजाडला सोनपावलांनी! धुकं गायब झालेलं होतं. उरला होता तलम सोनेरी सूर्यप्रकाश. काल रात्री भरपूर पाऊस पडून गेलेला. वातावरण थंड. त्यात कोवळी उन्हं. मस्त होतं यार! एकदम मस्त! अन्हिकं आटोपून बाहेर पडलो. आज आंबोलीतील स्थळं (लग्नाची नव्हे) पहाण्याचा बेत होता. हॉटेलमधील वर्कर भिकाजी मातोंडकर गाईड म्हणून सज्ज झाला. कोवळ्या उन्हात टोपी वगैरे चढवून थाटात आम्हाला बोलवायला आला. आम्ही तयार होतोच. मग आधी कुठे ब्रेकफास्ट करायचा हा प्रश्न? मला या प्रश्नांची कधी कधी तिडीक येते. साग्रसंगीत ब्रेकफास्ट केलाच पाहीजे का? कधी तरी नाही केला तर काय बिघडलं? रस्त्यात थांबून कुठेतरी वडापाव वगैरे घ्यायचा आणि गाडी चालू असतांना खायचा यात मजा आहे. वेळही वाचत नाही का? मग शेवटी लोकाग्रहास्तव आंबोलीत कामत रेस्तरॉं आहे तिथे गेलो. कडक डोसा आणि फिल्टर कॉफी छान होती. तिथून आमची सफारी निघाली. मातोंडकर रंगात येऊन सगळं सांगत होता.
प्रथम हिरण्यकेशी नदीचा उगम पहाण्यास गेलो. फार रमणीय जागा आहे. गाडी बरीच दूर उभी करावी लागते. तिथून जाण्यासाठी छोटीशी पायवाट आहे. नदीवर बांधलेला पूल आहे.
हिरण्यकेशीवरील पूल
हिरण्यकेशी देवस्थान
वाटेच्या सभोवार मोकळं रान आहे. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तिथे एक कणसं विकणारं छोटसं दुकान होतं. पण भाजलेली कणसं नव्हेत. उकडवलेली. अजूनच उत्तम! आधी आलोय ते कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही दर्शनासाठी गेलो. गाभार्याबाहेर एक प्रशस्त कुंड आहे. पाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे. त्या कुंडात पाय धुण्यासाठी पाऊल ठेवलं आणि अंगावर शहारा आला. थंड निवळशंख पाणी. पाय धूवून मंदिरात गेलो.
हिरण्यकेशी कुंड
हिरण्यकेशीची मूर्ती सुंदर आहे, तिच्याशेजारीच शंकराची पिंडी आहे आणि त्याच्या बाजूस गणपतीची मूर्ती. मातोंडकराने आम्हाला थोडासा इतिहास त्याच्या कोकणी मराठीत सांगितला. मंदिराचा गुरव बाजूलाच उभा होता. शर्ट पॅंट घालून पूजा चालू होती. त्याने दोन-तीन वेळेस जीर्णोद्धार हा शब्द वापरला. शेवटी नाइलाजाने १०० रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि पावती मागितली. पण पावती पुस्तक घरी आहे असे सांगून त्याने हात झटकले. छान! ते पैसे खरच देवाच्या कामी येतील अशी आशा करून आम्ही बाहेर आलो. मुख्य गाभार्याशेजारी एक मोठी निमुळती घळ आहे. आत जाण्यासाठी सरपटत जावं लागतं. पुन्हा ऑक्सिजन अत्यंत विरळ आहे असं सांगण्यात आलं. काही वर्षांपूर्वी आत काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला म्हणे. काही साहसी माणसं ऑक्सिजन सिलिंडर्स लावून आत गेली. काय काय सापडलं याचा तपशील माझ्या जवळ नाही पण त्यांना ५०० ते १००० माणूस सहज बसू शकेल असा मोठा हॉल सापडला. त्या हॉलची प्रकाशयोजना नैसर्गिक होती म्हणे. योग्य ठिकाणी घळीस भोकं होती ज्यांतून आरपार सूर्यप्रकाश आणि हवा यांचा पुरवठा घळीला होत होता. आश्चर्य आहे!
मंदिराबाहेर आता वेळ झाली होती कणसं खाण्याची. त्या आधी त्या कुंडात एके ठिकाणी गोमुख आहे तिथलं पाणी प्यायलो. आजवर गोड पाणी हे फक्त पुस्तकात वाचलं होतं. त्याचा अनुभव घेण्याची ही वेळ होती. मधुर आणि थंड पाणी. कितिही प्या पोट भरत नाही. फ्रीजमधल्या पाण्याला त्याची सर येईल काय? पुढे तिखट आणि मीठ लावून उकडवलेली कणसं खाल्ली आणि पुढच्या स्थानाच्या दिशेने निघालो.
राघवेश्वर! खूप कमी जणांना माहित असलेलं हे ठिकाणं. त्यासाठी मी मातोंडकरचा आभारी आहे. राघवेश्वर हे स्वयंभू देवस्थान! इथला सिद्धिविनायक एका मोठ्या घळीत निर्माण झालेला आहे. इथलं सारचं स्वयंभू आहे. नागाची मूर्ती, कासवाची मूर्ती. अविश्वसनीय! हे ठिकाण म्हणजे भारतदास स्वामींचे उपासना स्थान! त्यांचच समाधी स्थान! फार सुंदर, पवित्र, शांत! ना गडबड, ना गोंधळ! हिरण्यकेशी वहात वहात मंदिराच्या मागील बाजूस येते. तिथे हत्तीची मूर्ती आहे. भारतदास स्वामींच्या समाधीपाशी एक पणती अखंड तेवत असते. सकाळच्या सूर्यप्रकाशात सुद्धा ती लक्ष वेधून घेत होती. मंद तेज प्रकट करत होती. सिद्धीविनायकाची मूर्ती तर फारच देखणी आहे. पुन्हा स्वयंभू आहे त्यामुळे सारी बातच न्यारी. अक्षरश: मन प्रसन्न झालं. भारतदास स्वामींनी नुसती टिचकी वाजवली की सारे नाग, साप, हिंस्त्र प्राणी त्यांच्याशेजारी शांतपणे जमायचे अशी आख्यायिका आहे. मातोंडकराने ते स्वत: पाहीले आहे (असं तो म्हणतो). तिथेच एक फोटो सेशन झालं आणि आम्ही पुढे निघालो.
राघवेश्वर
राघवेश्वर
भारतदास महाराज समाधी
आता नांगरतास धबधबा! थोडा दूर आहे पण रस्ता मस्त आहे. पण धबधब्यास पाणी फार नव्हतं त्यामुळे पाण्याचा छोटासा प्रवाह खळाळत वहात खाली असणार्या कातळात पडत होता. कोकणात एक मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक गावास एक देव आहे. येथेही गावदेव नांगरतासकरीचा मोठा पुतळा आहे. त्याला भेट देऊन आम्ही पुढे निघालो. पाऊस झाल्यानंतर नांगरतास विलक्षण दिसेल यात शंका नाही.
नांगरतास
नांगरतास
मातोंडकराशी ४ ठिकाणं दाखवायची बोली ठरली होती त्याप्रमाणे पुढच्या स्थानाकडे तो आम्हाला घेऊन निघाला. कावळेसाद. हा एको पॉइंट आहे. प्रचंड खोल दरी. चारी बाजूनी डोंगर. कावळेसादचा अर्थ विचारला असता मातोंडकर म्हणाला, जेव्हा कधी एखादं जनावर दरीत पडतं (पडतं म्हणजे त्याची शिकार होते) त्यावेळेस कावळे दरीच्या तोंडाशी एकत्र कलकलाट करतात. त्यातून निर्माण झालेलं हे नाव. कावळेसाद. आम्ही तेथे गेलो तेव्हा पुन्हा दाट धुकं फैलत चाललेलं होतं. डोंगर आणि दरी जवळ जवळ सारी झाकोळून गेली होती. पण थोड्या वेळाने ढग ओसरले आणि समोरील लावण्य आम्हाला दिसू लागलं. खाली दाट जंगल. सारं हिरवगार. वेगवेगळ्या आकाराचे डोंगर. तिथून महादेवगड पॉईंट दिसतो असं ऐकलं होतं. धुकं निवळलं आणि तो ही दिसायला लागला. महादेवगड म्हणजे शंकाराच्या पिंडीचा आकार असलेला डोंगर. छान दिसतो. तिथेच मग निरनिराळ्या नावांनी हाका मारून एकोचा अनुभव घेतला. आपण ३डी सराउंड साउंडच कौतुक करतो. पण तिथुन निघणारा एको म्हणजे आश्चर्य आहे. एकामागोमाग एक ३ एको आम्हाला ऐकू आले. ते सुद्धा अगदी स्पष्ट आणि वेगवेगळ्या दिशांकडून. एखाद्या अतिशय खोल विहिरीत दगड पडावा आणि त्याचा प्रतिध्वनी ऐकू यावा असा तो एको होता. तिथेच मग एक चहा घेऊन आम्ही मातोंडकरचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला निघालो. कावळेसादला माझ्याकडून १०० गुण. कधी गेलात तर जरूर अनुभव घ्या.
कावळेसाद
कावळेसाद (महादेवगड दिसतोय)
कावळेसाद
साधारण १ वाजला होता. जेवणासाठी आम्ही पुन्हा कामत मध्ये गेलो. तिथे सुंदर जेवण मिळालं. मसाला ताक तर फारच मस्त होतं. पोटभर चेपून मग आता पुढे काय याच्या विचारात आम्ही होतो. हॉटेलवर पुन्हा इतक्या लवकर जाण्यासाठी मी राजी नव्हतो. अजून काही आजुबाजुचं पहावं असं सारखं वाटत होतं आणि मग बोलता बोलता आम्हाला २ ठिकाणं सुचली. दाणोली आणि माडखोल. दाणोलीस साटम महाराजांचा मठ आहे आणि माडखोलला प्रति शिर्डी साईबाबा मंदिर आहे. प्रथम दाणोलीस गेलो. सावंतवाडीचा घाट संपल्यानंतर दाणोली गाव येतं. मठात गेलो. साटम महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. सुंदर जागा आहे. नारळी पोफळीची बनं आहेत. छोटसं कुंड आहे. तिथेच समोर एका दुकानात जरा विसावा घेण्यासाठी थांबलो. त्यांच्या घरचा गोड अननस खाल्ला. येताना त्याची खोडं घेऊन आलो आणि घरातील बागेत तो लावूनही टाकला. काही महिन्यात रुजण्यास हरकत नाही. दाणोलीवरून पुढे माडखोल ३ किमी आहे. तिथे गेलो. साईबाबांचं मंदिर सुंदर आहे. प्रशस्त आहे. तिथे सोवनी म्हणून एक गृहस्थ भेटले. १० वर्षं आनंदाश्रमाचं काम ते पहात होते. बाबा आमट्यांच्या जवळच्या साथीदारांमधले. त्यानंतर ते पावसला स्वरुपानंद स्वामींच्या मठात बरीच वर्षं कामकाज पहात होते. त्यांच्याशी बोलून बरं वाटलं. फार निरिच्छ आणि साधा माणूस!
साटम महाराज मठ (दाणोली)
तिथे जवळ जवळ ४:३० वाजले. अध्यात्मिक खूप झालं. आता काहीतरी happening करावं म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि सनसेट पॉइंटवर येऊन दाखल झालो. रस्त्यातच प्रचंड धुकं लागल होतं आता सनसेट हुकतो की काय असं वाटत होतं नेमकं तसच झालं. धुकं हटायचं नाव घेईना. अर्धा तास वाट पाहून खट्टू होऊन हॉटेल वर परत आलो. पण तरीही सतत वाटत होतं की हे धुकं हटेल आणि सनसेट पहाता येईल आणि कसं कोणास ठाऊक पण धुकं निवळलं. बहूतेक इच्छा खूप तीव्र असावी. धुकं निवळलेलं पहाताच हॉटेल वर दमून भागून येऊन, गरम चहा घेत बसलेले आम्ही सारे उत्साहाने तयार झालो आणि पुन्हा सनसेट पॉईंटवर दाखल झालो. सनसेट पॉईंटच वैभव काय वर्णावं. निसर्गाने आंबोलीवर खुल्या हातांनी ज्या सौंदर्याची बरसात केली आहे त्यातील सनसेट पॉइंट हा शिरपेच! आंबोलीच्या सनसेटचं वैशिष्ठ्य हे की उन्हं कलतांना पार दरीच्या कानाकोपर्यात पोचतात आणि दरी उतरत्या सोनेरी सूर्यकिरणांत नखशिखांत न्हाऊन निघते. चारी बाजुंनी डोंगर, विरळ धुकं. दाटून आलेले काळे ढग सोसाट्याच्या वार्यासवे पुढे पुढे सरकत होते. खाली दरीतील घरांतून दिवेलागणी चालू झालेली, एखाद्या खोपटातून संध्याकाळी पेटविलेल्या चुलीचा धूर येतोय, आणि थंड हवा मन प्रफुल्लित करून जातेय. काय आणि किती सांगू? थोड्या वेळाने ढग पुन्हा दाटून आले. सूर्यास्त दिसला नाहीच. पण ढग विरळ होते तोवर हे सारं सौंदर्य आम्हाला दिसलं. मावळतीची किरणं दिसली, संधीप्रकाशाचा खेळ दिसला, वारा आणि ढगांची पाठशिवण दिसली. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हळूहळू आकाशात चंद्र अवतरला, संधीप्रकाश कमी कमी होत गेला. तिथे नुसतं बसण्यात एक दीड तास सहज निघून गेला होता. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही हॉटेल वर परत आलो.
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट
हॉटेलवर येताच गरम पाण्याने आंघोळ झाली. फ्रेश होऊन बाहेर कट्ट्यावर बसून राहीलो. आंबोलीत असतांना निसर्गाचे सारे सोहळे पहाण्यास मिळाल्याबद्दल मी आनंदात होतो. मुसळधार पाऊस पाहीला. खाली उतरेलेले ढग पाहीले, दाट धुकं पाहील, चिंब भिजलेलं घनदाट जंगल पाहीलं, सोनेरी ऊन पाहीलं. काय राहीलं अजून? रात्री मी आणि बाबा नार्वेकरांच्या खानावळीत मालवणी खाण्यासाठी गेलो. जेवण ठीक होतं. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने, नार्वेकरांनी सुचवलेला खाडीतला मासा खाल्ला. त्याचं नावं शतकं किंवा शेतुक. बांगड्याच्या चवीशी मिळती जुळती चव होती. खमंग! आता उद्या परतायचे हा विचार समोर उभा ठाकला आणि मन खिन्न झालं. पण पुन्हा लवकरच परत येण्याचा निर्धार करून मी पलंगावर अंग टाकलं आणि गाढ झोपी गेलो.
आंबोलीतील शेवटचा दिवस उजाडला. चहा झाला. आवरून झालं. सार्यांना भेटून झालं. बॅग्स उचलल्या आणि जड मनानी आंबोलीचा निरोप घेतला. तीन दिवस आयुष्यातील सारी दु:ख, ताणतणाव, विवंचना या आंबोलीनी पोटात घेतल्या होत्या आणि आम्हाला पुन्हा एकदा सज्ज करून ती तिच्या कार्याला सिद्ध झाली होती.
ते सारं मनात साठवून मी गाडीला स्टार्टर मारला आणि भरधाव गाडी सोडली. आता पुढचा पल्ला नरसोबाची वाडी. आंबोली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता उत्तम आहे हे वर सांगितलेलचं आहे. आम्हाला तिथपर्यंत येण्यास फक्त अडीच तास लागला. सांगली फाट्यावरून जयसिंगपूरवरून वाडीला जाण्याचा माझा बेत ठरला होता. त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरच्या वेशीपर्यंत आलो आणि तिथे काय झालं होतं हे माहीत नाही? न भूतो न भविष्यति असा ट्रॅफिक! सारा हायवे तुंबलेला. ५०० च्या वर ट्रक अडकून पडलेले. सगळीकडे गोंधळ. सर्विस रोडवरून मागे जाऊन कागलच्या रस्त्याने जावं तर सर्विस रोड जॅम पॅक्ड. देवाच्या मनात आहे का आम्ही त्याच्या दर्शनाला यावं असं बर्याचदा वाटून गेलं आणि तो ट्रॅफिक बघून माझी चांगलीच तंतरली. म्हटलं झालं, आता २-३ तास सुटका नाही. पण देवाच्या इच्छेविरुद्ध काही कधी घडलय का? तिथेच एक माणूस भेटला. त्यानी सांगितलं कोल्हापूर शहरातून, उंचगाव-हुपरी-रेंदाळ-बोरगाव मार्गे एक रस्ता आहे नृसिंहवाडीस जाण्यासाठी. नशिबानी मी कोल्हापूराच्या कमानी जवळच होतो. सरळ गाडी कोल्हापूर शहरात घातली. एसटी स्टॅंड वरून डाव्या हाताला वळलो. तिथे एक निमुळता बोगदा आहे. तिथे पुन्हा भलीमोठी रांग होती. तिथून कसाबसा बाहेर पडलो आणि विचारत विचारत उंचगावच्या रस्त्याला लागलो. उंचगाववरून हुपरी, हुपरीवरून रेंदाळ, रेंदाळवरून बोरगाव, बोरगाववरून कुरुंदवाड आणि तिथुन वाडी असा प्रवास करून मी खरतरं आता थकून गेलो होतो. बोरगावला आणि कुरुंदवाडला मध्येच भाषा बदलते. एकदम कन्नड बोर्डस दिसायला लागतात. थोडक्यात काय कर्नाटकाच्या वेशीला चाटून आमचा प्रवास चालू होता. पण थकून सांगतो कुणाला? देवानी मार्गातला अडथळा दूर केला होता ही किती मोठी गोष्ट!
वाडीला गेलो. कृष्णेत हातपाय धुतले. नमस्कार केला आणि आमच्या पुजारी गुरुजींसोबत देवाचं दर्शन घेतलं. त्यांनी संकल्प सोडून घेतला. प्रसाद दिला. समाधान वाटलं. शेवटी आपण करू करू म्हणून काहीही होत नाही हे खरं. एक अदृष्य शक्ती आहे जी सारं हलवत असते. आपण पटावरील बाहूल्या म्हणून वावरावं. ३ वाजून गेलेले असले तरी पुजारींच्या घरी अत्यंत प्रेमाने आम्हाला जेवायला वाढलं. पूजेसाठी काही पैसे देऊन आम्ही पुण्याचा रस्ता धरला. जातांना पुजारींच्या मुलाने आम्हाला रस्ता सांगितला होता त्या रस्त्यावरून आलो. तो रस्ता म्हणजे, के.पी.टी - उदगाव - सांगली - पेठ. मी आपला गाडी चालवतोय चालवतोय. रस्ता संपायचं नावं घेईना. जीव मेटाकुटीला आला. शेवटी एकदाचा तो पेठनाका आला आणि आम्ही राजरोस मार्गावरून कराडकडे निघालो. आधीचा रस्ता मला या येतानांच्या रस्त्यापेक्षा जवळ वाटला. आता पेठ ते पुणे २२५ किमीचे अंतर कापायचे होते. स्पीड मारला. थोड्यावेळाने कराडला येउन दाखल झालो. पण कराडला थांबून काय करणार? तसाच पुढे सातार्यापर्यंत गाडी मारली, अजून ५० किमी. सातार्याला पोचलो तेव्हा ७ वाजून गेले होते. संध्याकाळ झालेली. तिथेच एका हॉटेलात चहा घेतला आणि सिगरेट मारली. अहाहा.... त्या धुरावर तरंगलो. पण अजुन १२५ किमी अंतर होतंच. तिथुन पुन्हा गाडी मारली. रस्त्यात मध्येच पाऊस, अंधार. रात्रीच्या वेळेस तोच रस्ता किती मोठा वाटतो. रस्ता काही केल्या संपत नव्हता. आणि असचं करता करता शेवटी एकदाचा तो कात्रजचा बोगदा आला. दरीपूल दिसायला लागला. पुण्याच्या वेशीवर आम्ही दाखल झालो आणि रात्री १० वाजता घरी पोचलो. सकाळी ८:३० ते रात्री १०:०० असा अविश्रांत प्रवास झाला. गाडी पार्क करत असता, मी ट्रीप मीटरवरचा आकडा पाहिला. ४८० किमी सकाळपासून. मी आजवर एका दिवसात पार केलेलं ते पहिलचं मोठं अंतर. अंग आंबून गेलं होतं. घरची मंडळी आमटी भात टाकण्यासाठी म्हणून कार्यरत झाली. मी फ्रेश झालो. जेवण केलं. थोड्याच वेळात सगळीकडे पांगापांग झाली. सारेच दमलेले, गाढ झोपेच्या आधीन झाले. मी अजुन जागाच होतो. कॅमेर्यातून ते सारे फोटोस पहिल्यांदा लॅपटॉपवर डाउनलोड करून घेतले आणि एक एक फोटो पहायला लागलो. अगदी सुरूवातीपासूनचे. पुण्यावरून निघालो, शिरवळ, सातार्याचं माइलस्टोन, पुढे कोल्हापूर, अंबाबाईचं मंदिर, बेळगावकडे जाणारा बेळगावी लोण्यासारखा रस्ता, तिथून गडहिंग्लज, मग आंबोली, आमचं रेसॉर्ट, सावंतवाडी, साधले मेस, रेडी गणपती, हिरण्यकेशी, राघवेश्वर, नांगरतास, कावळेसाद, दाणोली, माडखोल, नार्वेकरांची आंबोली बाजारातील मेस, नरसोबाची वाडी....
४ दिवसांचा हा प्रवास. पण किती सुंदर, किती enriching, किती मनमोकळा, किती निसर्गाच्या सानिध्यात! रात्र शांत होत गेली. झोपायच्या आधी सिगारेट पेटवली आणि खिडकीत शांतपणे धुराची वलयं काढत उभा राहीलो.
एक आवाज म्हणाला... केदार... मनावर कोरलेल्या गोष्टींचं विस्मरण होत नसतं.
तेवढ्यात दुसरा आवाज म्हणाला.... छे... छे... त्या विलक्षण दिवसांचं विस्मरण व्हायला नको म्हणून कुठेतरी नोंद असायलाच हवी. काहीही असो, काहीतरी लिहिण्यास सुरूवात करावी असं वाटलं आणि सुरूवात त्याच रात्री केली. ते लिखाण आज पूर्ण झालं. आंबोलीवर तसं कुणीही कितीही लिहावं अन् ते प्रत्येक वेळेस नवच वाटेल असं ते सौंदर्यं. ते अनुभवण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी... रसिकता... धुम्र वलयांवर तरंगत एक जुनं बालगीत माझ्या ओठांतून आत्ता बाहेर पडतय...
हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वार्याची पावरी.
सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.
हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.
गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होउन
फुलांफुलांतुन उडू?
आंबोली मला खुणावतेय... डोंगरांच्या कुशीत वसलेली चिंब ओली आंबोली मला पुन्हा पुन्हा खुणावतेय...
2 comments:
Khoop chan prawaswarnan aahe. Ase watle ki mi swatah wachta wachta he sarve phirun aalo. photos pan chaan aahe. lai bhari
Thanks very much!
Post a Comment