काल धुकं बराच वेळ उतरलंच नाही. मी सकाळी उठलो आणि ऑफीसला जाणार नाही ही मंगलवार्ता घरात सांगितली. क्षणात सगळीकडे आनंदी आनंद झाला. बायकोनी माझ्याकडे लाडाने, कौतुकाने पाहीलं आणि मी खिडकीत धुकं पहात उभा असतांना माझ्याजवळ येऊन काहीतरी बोलण्यास सुरूवात केली. कधीतरी आत इतका कोलाहल माजलेला असतो की त्यावेळेस कुणाचेही शब्द, मग ते अगदी साधेच असले तरी नकोसे वाटतात. तिचं मन दुखावू नये म्हणून मी ही काहीतरी बोलत होतो. ते फारसं सुसंगत नव्हतं हे माझ्या ध्यानात येत होतं. मग उगाचंच "अग, बघ जरा कशी छान हवा पडलीय, गरम-गरम पोहे करतेस?" असं काहीसं बोलून मी त्या संभाषणाला अर्धविराम दिला.
बहुतेक आजकाल माझ्याकडचे बोलण्याचे विषय संपत आलेत किंवा मी बोलायचा कंटाळा करायला लागलोय. "काय बोलू?" हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा रहातो. बोलण्यासारखं काही नाही. आवडीचं करण्यासारखं बरचं आहे पण वेळ नाही. खूप कंटाळा आलाय. जीव घुसमटतोय. काहीतरी करायचंय असं मनाला वाटतंय पण हातून घडत नाही. जे हातून एक दिवस घडतं ते दुसर्या दिवशी टिकत नाही. स्वप्न पूर्ण कशी करायची याचा विचार मनाला अस्वस्थ करतोय. मध्येच वाटत की निघून जावं परदेशात कायमस्वरूपी परत या सगळ्यापासून दूर, पण ते धारिष्ट्य होत नाही. कुठेतरी चार दिवस सुट्टीवर जावं असं वाटलं तर पैसे वायफळ खर्च होतील हा विचार. या अशा हल्लकल्लोळात जर कोणी माझ्यासमोर येउन उभं ठाकलं आणि म्हणालं "बोल", तरं काय बोलणार? डोंबल? आजकाल माझी अशी बर्याच वेळा गोची होते. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून सोडून द्यायचं अजून काय?
पोहे खाऊन झाल्यावर कॉफी केली. एक कप बायकोला दिला आणि म्हटलं "अगं आज जेवायला उगाच काहीतरी जास्त गोंधळाचं करू नकोस. बाहेर जाऊयात जेवायला." एका हॉटेलात जेवून आलो. वामकुक्षी घ्यायची म्हणुन पहूडलो आणि झोपायचा प्रयत्न केला. पण झोप येईना. मनात पुन्हा विचारांचं वादळ चालू झालं. दुपार अस्वस्थच गेली. आळसावून टीवी पहात बसलो ते संध्याकाळच्या ७ पर्यंत. मग हीची चुळबुळ पुन्हा चालू झाली. आता बहूधा अपेक्षा असेल कुठेतरी बाहेर फिरायला जावं अशी! तथास्तु! लक्ष्मी रोडवर फिरून आलो आणि येता-येता हिला एक मोगर्याचा गजरा घेऊन दिला. घरी आलो तेव्हा रात्रीचे १०:३० वाजले होते. डोळे मिटायला लागले होते. झोपण्याआधी काहीतरी तरी करावं म्हणून जाऊन एकटाच गॅलरीत उभा राहीलो, सिगारेट पेटवली आणि थंडपणे विचारात गढून गेलो.
कुणालाही आनंद देण्यात समाधान आहेच पण त्या समाधानाची खाती उघडत दरिद्री बॅंकर होऊन किती दिवस बसायचं? कॅशिअरच्या हाताला दर दिवशी लाखो रुपयांच्या नोटांचा स्पर्श होत असेल, पण त्या नोटा त्याच्या स्वत्:च्या खात्यात पडणार नाहीत किंबहूना तो तसं करू शकत नाही यातील कर्तव्याचा आनंद जास्त मोठा की त्याला महिनाअखेरी ज्या तुटपुंज्या पगारावर समाधान मानावं लागणार आहे त्यातून उमटणार्या जळजळीत वास्तवाच दु:ख मोठं? घरातून बाहेर पडतांना साध्या पोषाखात बाहेर पडून, कुठल्यातरी अज्ञात जागी कुणीही पहात नसतांना, स्पायडरमॅनचा वेष करून जगात वावरलं किंवा बाहेर साध्या पोषाखात वावरल्यानंतर घरी परततांना स्पायडरमॅनचा वेष करून घरात आलं तरी सरते शेवटी माझ्या वाटणीची एक बनियान आणि नाडी नसलेला बर्मुडा माझी कवचं-कुंडल बनली आहेत ही वास्तवता जीवाची कालवा-कालव करणारी का ठरू नये? हीच मनाची अस्वस्थता एक दिवस प्रज्वलीत होऊन माझा मार्ग मला दिसू लागेल या विश्वासावर मी भिस्त ठेवून आहे.
कोणताही मनुष्य शेवटी त्याच्या कुटुंबासाठी झटतच असतो. आपल्या माणसांच्या चेहर्यावरील समाधान पहाण्यात जो आनंद आहे त्याची सर अजून कुठल्या गोष्टीला सहसा येणार नाही. पण या सोबत स्वत:चं काहीतरी हवं. एक छोटासा कोपरा, स्वत:चा, सार्या बेगडीपणापासून, कोलाहलापासून दूर, अलिप्त असा एक कोपरा. चाळीशीला मागे वळून पाहिल्यानंतर "आपण काय मिळवलं" याचं उत्तर स्वत:ला देतांना
"दोन मुलं आहेत माझी, मोठा वर्गात पहिला आला बरं का...धाकटी कथ्थक शिकते" केवळ हे असं काही सांगण्याची मला तरी लाज वाटेल. आमच्या बागेतल्या मांजराला सुद्धा ४ पिल्लं झाली हो! ऋतू आला की प्राणीसुद्धा हेच करतात. मग मी त्यांच्यापासून वेगळा कसा होऊ शकेन हा विचार आला की सारं थबकतं. आपली राहून गेलेली स्वप्न मुलांमध्ये पहायची, त्यांना ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, सहकार्य करायचं. का? त्यांना त्यांची स्वत:ची स्वप्न नाहीत?
"बाबा रे, तू स्वत:साठी काय मिळवलंस? किती तुझी राहून गेलेली स्वप्न जगलास?" या प्रश्नाचं उत्तर देतांना आपण किती पोकळ आणि उथळ जगलो याची जाणीव मला होवू नये....बस...हे इतकंच मनापासून वाटतं.
अपेक्षापूर्ती पण ती स्वत:ची नाही दुसर्यांची हे माझ्या आयुष्याचं ब्रीद बनून गेलयं. ऑफीसमध्ये साहेबाची, घरात आपल्या माणसांची, ज्यांना आपल्या आनंदाचं, दु:खाचं फारसं सोयर-सुतक नसतं अशा काही सोयर्यांची, परक्यांची, शेजार्यांची. आपण जन्माला येतो तोच मुळी अपेक्षापूर्तीचा शाप घेऊन. मग या अपेक्षा रास्त आणि डोळस असाव्यात याचा प्रयत्न फारसा का केला जात नाही? का?
"चला, आज हा घरी आहे" म्हणुन आमच्यासाठी काहीतरी करेल ही त्यांची अपेक्षा महत्वाची की "चला, मी आज घरी आहे", हा एक दिवस स्वत:च्या मनाप्रमाणे खमंग जगीन ही भावना जास्त महत्वाची? ही सुद्धा एक अपेक्षाच माझी, दुसर्यांकडून केलेली. पण "तुझं मन भरल्यावर जो वेळ मिळेल तो माझा" हा विचार मला "माझं मन भरल्यावर जो वेळं मिळेल तो तुझा" ह्यापेक्षा कितीतरी श्रेयस्कर वाटतो आणि तोच मी जास्त मानतो. याचे परिणाम चकीत करून सोडणारे असतात हा माझा अनुभव आहे. बहुतेक वेळा आपली सामंजस्याची भूमिका दुसर्यामध्ये कर्तव्याची जाणीव आपोआप निर्माण करते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट स्वाभाविक असते. अशा वेळेस ती गोष्ट करणार्या व्यक्तीच्या कृतीमध्ये कर्तव्यपूर्तीचा दर्प नसतो आणि ज्याच्यासाठी ती केली जाते त्याच्या मनात उपकृत झाल्याची भावनाही!
गुलाबी थंडीत करण्यासारख्या गोष्टी बर्याच असतात. अंगावर गुबगुबीत पांघरूण घेऊन आवडतं पुस्तक वाचत पडून राहीलोय. त्यातल्या एका वाक्याशी मनातल्या भावना एकरूप झाल्याने, डोळे भरून येतांना होणार्या आनंदाचा साक्षात्कार अनुभवतोय. पूरिया-धनाश्री हवेत दरवळतोय. बाहेरचा पाऊस वाढत चाललाय. हातात पॉपकॉर्नचा डबा घेऊन The Shawshank Redemption सारखा एखादा ह्रदयाला हात घालणारा आणि दर वेळी तितकीच अनामिक स्फुर्ती आणि विश्वास जागविणारा चित्रपट बघितलाय. त्यामुळे Life is beautiful ही संकल्पना मनात पुनर्निर्माण होतेय, दृढ होतेय. संध्याकाळी गार हवेवर छान फिरायला गेलोय. एकमेकांच्या सहवासाचा आनंद मूकपणानी, स्पर्षातून घेतलाय. मनसोक्त पाऊस पिऊन मत्त पण अनासक्त झालेल्या प्राजक्ताचा सडा कुठेशी जमिनीवर पडलाय आणि कुठेतरी वेलीला लगडलेली तृप्त मोगर्याची फुलं त्यांच्या इवल्याश्या ओंजळीतून सुगंधाची लयलूट करत आहेत. एक सुंदर, निवांत दिवस झोळीत टाकल्याबद्दल मनात कुटुंबियांबद्दल आणि देवाबद्दल कृतद्यता आणि आदर भरून राहीलाय. आनंदाची व्याख्या कधी कधी अशी ही होऊ शकेल?
अचानक हाताला चटका बसला आणि भानावर आलो. सिगारेट संपली होती. दिवस संपला होता. दोघांचीही राख झाली होती. संध्याकाळी विकत घेतलेला मोगर्याचा गजरा सुकून गेला होता आणि बायको शांतपणे झोपून गेली होती. बेडरूममधला मिणमिणता दिवा मला खुणावत होता आणि बाहेरचं धुकं आणखीनंच गडद होत होतं.
तुमचा,
केदार
2 comments:
+1
Thanks for visiting and your comment Sudeep!
Post a Comment