Thursday, July 7, 2011

आंबोली...स्वप्नातलं गावं!

आंबोली... स्वप्नातलं गावं! निसर्गाच्या सानिध्यात माणूस स्वत:ची दु:ख हरवून जातो हे हळूवार सांगणारं, डोंगराच्या कुशीतलं, एखादी सुंदर स्त्री श्वेत वसने लेऊन ओलेत्याने सामोरी यावी तसं शुभ्र धुक्यात भिजलेलं चिंब ओलं, बेहोश करणारं पण पावित्र्याची साद घालणारं, माणसाच्या विनाशक स्पर्शापासून अजून काहीसं दूर असलेलं हे खेडं! माझा आंबोलीला जाण्याचा योग अचानक आला. योग हा ठरवून येत नसतोच म्हणा. तो जमून येतो अथवा येत नाही. अचानक एक दिवस ठरलं, हॉटेलचं बूकींग मिळालं, आणि निघालो आम्ही आंबोलीला! पहाटे ५:३० ला घरातून निघालो.

जाता जाता आधी कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यावं असं मनात योजलं होतं. सारी मदार महालक्ष्मीवरच! तिच्या मनात असेल तर दर्शन झाल्यावाचून रहायचं नाही. रस्त्यात आधी एका ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट करायचं ठरलं. मग घरातून आणलेला ब्रेड बटर आणि गरम चहा पिऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. पुढे नॉन स्टॉप कोल्हापूरपर्यंत गेलो. कोल्हापुरच्या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर तिथे महालक्ष्मी मंदिराचा रस्ता विचारत विचारत आम्ही पुढे जात होतो. महाराष्ट्रात कोठेही १०० कि.मी. दूर गेल्यास भाषा बदलते हा प्रत्यय येत होता. त्या त्या ठिकाणची बोलीभाषा, बोलण्याची पद्धत, शब्दांचं टोनींग, शब्दकोष सारं वेगळचं. पण वेगळं म्हणूनच कानाला अतिशय गोड. माणूस बदलासाठी किती आसुसलेला असतो!

कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे सौंदर्य आणि शक्ती यांचा अजोड मिलाफ! तिचं रूप, तिची शक्ती अवर्णनीय! त्या मंडपात गेल्यावरच काहीतरी दैवी भासायला लागतं. कोल्हापूरशी माझा तसा काही संबंध नाही. पण काही वर्षांपासून कोल्हापुरबाबत का कोणास ठाऊक जिव्हाळा वाटतो. रांगडेपणा भले ठायी ठायी भरलेला असेल पण दिलाचा सच्चेपणाही दिसतो यात शंका नाही. मंदिरात 'मुख्य'-दर्शनासाठी मोठी रांग होती म्हणून आम्ही 'मुख'-दर्शन करण्यासाठी वेगळ्या रांगेतून आत गेलो. दर्शन झालं यात सारं काही आलं. पण कोल्हापुरची कमान पार केल्यापासून एक अनामिक हुरहुर सदैव जाणवत होती. माणूस आठवणींचा गुलाम असतो आणि त्या मंदिराशीही माझं एक जुनं नातं आहे. तिथल्या काही जुन्या आठवणी फार अस्वस्थ करून गेल्या. तो मंडप, फुलांचे हार, वेण्या, नारळ, हळद-कुंकु, तांदूळ, खारवलेल्या कच्च्या कैर्‍या, त्या मागे असणारी ती एक शाळा... असो... एखादी जखम जितकी खोल तितकी चांगली... त्यामुळे इतर दु:ख काहीशी लोभसवाणी वाटू लागतात.

आणि मग तिथून आम्ही आंबोलीसाठी रवाना झालो. कोल्हापूरहून आंबोलीकडे जाण्याचा रस्ता म्हणजे एक चमत्कार आहे. लोण्यासारखा रस्ता बनविला आहे. डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आपल्या देशाचे/राज्याचे सरकार इतके कार्यक्षम असू शकते? जर असू शकते तर मग बाबांनो पुण्यातले रस्ते बनवा की. का जाळता आम्हाला कणाकणानी आणि किमी-किमीनी?

आंबोलीला जाण्याचा मार्ग संकेश्वरवरून जातो. संकेश्वरपर्यंत रस्ता अफाट आहे. गजब वेगानी जाता येतं. संकेश्वरला आंबोली फाट्याला वळल्यानंतरही रस्ता उत्तमच आहे पण मग वेग थोडा मंदावतो. वळणं आहेत. मध्ये गावं आहेत. तिथून गाडी सांभाळून चालवलेली बरी. बरच अंतर पार केल्यावरती आम्ही गडहिंग्लजला पोहोचलो. दुपारी २ चा सुमार. भूक लागली होती. मग तिथल्या एका सामान्य हॉटेलमध्ये जेवून आम्ही पुढची वाट धरली. आंबोली जसं जसं जवळ येत चाललं तसा तसा हवेत गारठा जाणवू लागला. ढग खाली खाली येऊ लागले. दुपारी ३-४ ची वेळ असूनही धुकं दाट होतं. पाऊस पडत होता आणि अशा वेळेस आम्ही आंबोलीत शिरलो. प्रथम काही विशेष लक्षात येईना. रस्ते कळेनात. आम्ही रहाणार होतो ते ग्रीन वॅली रेसॉर्ट सुद्धा नीट कळेना अन तेवढ्यात मला हॉटेलचा साईनबोर्ड दिसला. आम्ही हॉटेलवर येऊन थडकलो. सामान काढलं, चेक इन केलं आणि पहिला चहा मागवला. थंडी होती, त्यात पावसात थोडसं भिजायला झालं होतं. गरम चहाचा पहिला ऊष्ण घोट आनंद देऊन गेला. सकाळपासून ड्रायविंग करत असल्यामुळे मी सुद्धा जरा पहूडलो पण झोप लागली नाही. बाहेर इतकं सुंदर वातावरण असतांना झोपायचं कसं? मन मनासी खायला लागलं. गरम पाण्यानी आंघोळ केली आणि खूर्ची टाकून गप्पा मारत हॉटेलच्या ऐसपैस पॅसेजमध्ये बसलो. आजूबाजूला किर्रर्र जंगल. वाहनांचे आवाज नाहीत, माणसांचा कोलाहल नाही. आवाज फक्त जंगलातील रातकिड्यांचे, बेडकांचे, टिटव्यांचे, काहीसे अपरिचित!

ग्रीन वॅली रेसॉर्ट

हळूहळू संध्याकाळ होत चालली. जंगलातील आवाज गडद होत गेले. धुकं गडद होत गेलं. समोरच्या हॉटेलमधील गॅलरीत टांगलेला केशरी कंदील धुक्याच्या आड गेला. आपलं क्षीण अस्तित्व दर्शवू लागला. जोराच्या वार्‍याबरोबर धुकं काहीसं फिस्कटलं की एक फिक्कट केशरी लकेर उमटे. पुन्हा सारं धुकंमय! थोड्या वेळाने आम्ही जेवणासाठी उठलो. आंबोली सिंधुदूर्ग जिल्ह्यात येतं. Authentic मालवणी खाण्यास मिळेलं या आशेने मी मालवणी चिकन मागविले. सुरमईचा एक तुकडा मागविला. पण जेवण खास नव्हतं. थोडी निराशा झाली. सोलकढी मात्र उत्तम होती. शतपावली करून आम्ही झोपण्यास रूमवर परत आलो. खरतर इतकं ड्रायविंग झाल्यामुळे झोप यायला हवी होती. पण थकवा कुठल्या कुठे दूर पळून गेला होता. बराच वेळ झोप लागली नाही. काही काळानी डोळे मिटले आणि जाग आली तेव्हा चहाचा घमघमाट रूममध्ये पसरत होता. मसाला चहा.... अहा.......


आंबोलीतील दुसरा दिवस. आज सावंतवाडीला जाण्याचा बेत होता. सावंतवाडी आंबोलीच्या पूर्वेस आहे. मध्ये घाट लागतो. आंबोली-सावंतवाडी म्हणजे ३०-३५ किमी. उतरंड आहे. घाट तसा अवघड आहे पण गाडी चांगली चालविणार्‍यास फार त्रास नाही व्हायचा. घाट अवघड आहे त्यामागे अजून कारणं म्हणजे दुहेरी वाहतुक, बर्‍याच ठिकाणी कठडे मोडलेले, दरड कोसळण्याचा धोका, पर्यटकांची गर्दी आणि धुकं. त्यातून वाट काढत जाणं म्हणजे थोडसं अवघड. आम्ही ९:३० ला सकाळी हॉटेलवरून निघालो. धुकं साधारण तसचं होतं. घाटाच्या सुरूवातीला धुकं दाट होतं ते नंतर जसा जसा घाट उतरू तसं तसं विरळ होत गेलं. संततधार चालूच होती. तो घाट म्हणजे डाव्या बाजूस उंच कपार आणि उजव्या बाजूस खोल दरी. दरीतून खालची गावं पत्त्यातल्या घरांसारखी दिसतात. पण सगळं हिरवंगार! जंगलच! कोकणी लोकांच्या म्हणण्यानुसार फॉरेष्ट! घाट फारच रमणीय. रस्ता मुळात चांगला आहे. फार खड्डे नाहीत. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यात दुतर्फा दाट झाडी. फणस, आंबे, नारळी, पोफळीची झाडं. छोट्या छोट्या वाड्या. हातात झावळ्या घेऊन खेचत चाललेली किंवा डोक्यावर फणस वागवत चाललेली कोकणी कष्टाळू माणसं. थोडं अजून खाली गेलं की दोन्ही बाजूंनी वस्त्या चालू होतात. लाल उतरत्या छपरांची कौलारू घरं, घरात ऐसपैस चौसोपी वर्‍हांडा, घरापुढे विहीर, एखादं गाय वासरू, तुळशी वृंदावन. हे मात्र खरं की सार्‍यांच्या घरासमोर हटकून तुळशी वृंदावन होतं. म्हणजे आपली संस्कृती अजून कुठेतरी जपली जातेय!

सावंतवाडी छोटसं गाव आहे. गावात मोती तलाव, राजवाडा वगैरे प्रेक्षणीय स्थळ आहेत. आम्ही तेथे पोचलो तेव्हा पाऊस पडत होता. मग मोती तलावाच्या बाजूस गाडी पार्क करून आम्ही मे. काणेकर यांच्या लाकडी खेळण्यांच्या दुकानात गेलो. माझ्या ५ वर्षांच्या भाच्याने मला एक लाकडी सायकल आणि घोडा आणण्यास सांगितला होता. तिथे थोडी खरेदी केल्यानंतर, आम्ही वरच्या चितार आळीत गेलो. तिथे काही अजून दुकान दिसली. तिथून अजून थोडीशी खरेदी करून आम्ही राजवाडा पहाण्यास गेलो. राजवाडा बाह्यदर्शनी चांगला आहे. अंतरंग कुणी पाहू दिलं नाही म्हणून काही अजून सांगू शकत नाही. तिथे गेलो तेव्हा एक माणूस टेबलावर पाय पसरून खुर्चीत निवांत झोपला होता. त्याला उठवल्यावर त्याने काहीशा नाराजीच्या सुरात आम्हाला राजवाडा बंद आहे असं संगितलं. अजून काही बोलण्याचा प्रश्न नव्हताच. तसेच मागे वळलो आणि राजवाड्यालगतच एक गल्ली जाते तीत शिरलो. तिथे ऐतिहासिक काही नव्हतं पण 'भूक' ही भौतिक गरज सतावू लागली होती. त्या गल्लीत 'साधले मेस' प्रसिद्ध आहे असं कळलं होतं. पूर्ण शाकाहारी आणि उत्तम प्रतीचे घरगुती ब्राम्हणी जेवण. पोळ्या, भाजी, आमटी, ताक, कोशिंबीर. साधच पण सुग्रास. ५० रु एक ताट. :) मला आमच्या पुण्यातलं बादशाही आठवलं. तिथे सुद्धा असचं छान जेवण पेशवाई थाटात मिळतं.

मोती तलाव

राजवाडा (सावंतवाडी)

सावंतवाडीत अजून करण्यासारखं काही नव्हतं. २ - २:३० वाजले असावेत. सावंतवाडीपासून काही अंतरावर रेडी गणपती आहे. तिथे जाण्याचं ठरलं. गणपतीची विशाल, देखणी मूर्ती आहे. मंदिराच्या मागील भागातून समोर समुद्र दिसतो. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. रेडी गणपतीला जाताना शक्य तेवढा सावधपणा बाळगलेला बरा. रस्ता सरळ नाही. दोन्ही बाजूंनी जंगल. गावं आहेत पण काही खास मदत मिळणार नाही. अत्यंत आत आत गेल्यावर हे मंदिर आहे. पुन्हा निसर्ग विशेष नाही. वाट्टेल तेव्हा पाऊस पडतो, रस्ता पूर्ण अंधारात बुडून जातो. का कोणास ठाऊक पण या रस्त्यावर फारसं बरं नाही वाटलं. एखादी वास्तू, ठिकाण, जागा, रस्ता असा असतो जिथे मनाला प्रसन्न वाटत नाही. त्यातलाच हा एक रस्ता. पुन्हा समुद्राचं दर्शन होऊनही मन आनंदी झालं नाही. समुद्र उसळलेला होता. त्या रूपात रौद्रता भासली. अगदी जाण्याचा निर्णय घेतलात तरी दिवसाउजेडी गेलेलं आणि परत आलेलं बरं.

पावसाचा रंग दिसायला लागला. वेळेत आंबोलीच्या दिशेने कूच केलेलं बरं अस मनात म्हणत होतो आणि ज्याची भिती होती तेच झालं. मी माझ्या आयुष्यात पाहीलेलं सगळ्यात दाट धुकं त्यादिवशी चराचरावर पसरलं. सारंच गायब. गाडीचे फॉग लॅंप्स लावूनही काही उपयोग नाही. २ फुटांवरलं काही दिसायला तयार नाही. मग घाटात एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. थोडी वाट पाहीली. पण धुकं कमी होइना. काहीसा अंधार जाणवायला लागला. आजुबाजुनी गर्द झाडी. तुरळक माणसं. आता मात्र मनात ठरवलं की आंबोलीला लवकरात लवकर पोचायचं. घाट चढून थोडा वर आलो आणि पाहीलं जवळ जवळ सार्‍यांचीच ही अवस्था आहे. गाड्या अत्यंत धीम्या गतीने चालत होत्या. समोरून येणार्‍या गाड्या थांबून शहानिशा करून पुढे सरकत होत्या. आता मी घाट चढत असल्याने दरीची बाजू माझी होती आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे बर्‍याच ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. त्यात गाडी चालविणे म्हणजे दिव्य होतं. जरा गफलत झाली म्हणजे आम्हाला दरीचं जवळून दर्शन आणि देवाचही. गाडीच्या काचा बंद केल्या तर हॉर्न ऐकू येईनात, बाष्प जमायला सुरूवात. उघड्या ठेवायला माझी हरकत होती. का? कारण घाटमाथ्यावर माकडांची टोळकी निर्व्याज नाचत होती. त्यातलं एक माकड गाडीत घुसलं तर सारं कितीत पडेल? :) अन शेवटी एकदाची ती आंबोलीची कमान आली. मनात देवाचं स्मरण केलं आणि हॉटेल मध्ये पोचून मसाला चहा मागविला. त्या रात्री मी हॉटेलमध्ये चायनिज फूड मागविलं. सुरेख चायनिज फूड. आता याला काय म्हणायचं? ग्लोबलायझेशन की लोकलायझेशन?

तिसरा दिवस उजाडला सोनपावलांनी! धुकं गायब झालेलं होतं. उरला होता तलम सोनेरी सूर्यप्रकाश. काल रात्री भरपूर पाऊस पडून गेलेला. वातावरण थंड. त्यात कोवळी उन्हं. मस्त होतं यार! एकदम मस्त! अन्हिकं आटोपून बाहेर पडलो. आज आंबोलीतील स्थळं (लग्नाची नव्हे) पहाण्याचा बेत होता. हॉटेलमधील वर्कर भिकाजी मातोंडकर गाईड म्हणून सज्ज झाला. कोवळ्या उन्हात टोपी वगैरे चढवून थाटात आम्हाला बोलवायला आला. आम्ही तयार होतोच. मग आधी कुठे ब्रेकफास्ट करायचा हा प्रश्न? मला या प्रश्नांची कधी कधी तिडीक येते. साग्रसंगीत ब्रेकफास्ट केलाच पाहीजे का? कधी तरी नाही केला तर काय बिघडलं? रस्त्यात थांबून कुठेतरी वडापाव वगैरे घ्यायचा आणि गाडी चालू असतांना खायचा यात मजा आहे. वेळही वाचत नाही का? मग शेवटी लोकाग्रहास्तव आंबोलीत कामत रेस्तरॉं आहे तिथे गेलो. कडक डोसा आणि फिल्टर कॉफी छान होती. तिथून आमची सफारी निघाली. मातोंडकर रंगात येऊन सगळं सांगत होता.

प्रथम हिरण्यकेशी नदीचा उगम पहाण्यास गेलो. फार रमणीय जागा आहे. गाडी बरीच दूर उभी करावी लागते. तिथून जाण्यासाठी छोटीशी पायवाट आहे. नदीवर बांधलेला पूल आहे.



हिरण्यकेशीवरील पूल

हिरण्यकेशी देवस्थान

वाटेच्या सभोवार मोकळं रान आहे. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तिथे एक कणसं विकणारं छोटसं दुकान होतं. पण भाजलेली कणसं नव्हेत. उकडवलेली. अजूनच उत्तम! आधी आलोय ते कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही दर्शनासाठी गेलो. गाभार्‍याबाहेर एक प्रशस्त कुंड आहे. पाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे. त्या कुंडात पाय धुण्यासाठी पाऊल ठेवलं आणि अंगावर शहारा आला. थंड निवळशंख पाणी. पाय धूवून मंदिरात गेलो.



हिरण्यकेशी कुंड

हिरण्यकेशीची मूर्ती सुंदर आहे, तिच्याशेजारीच शंकराची पिंडी आहे आणि त्याच्या बाजूस गणपतीची मूर्ती. मातोंडकराने आम्हाला थोडासा इतिहास त्याच्या कोकणी मराठीत सांगितला. मंदिराचा गुरव बाजूलाच उभा होता. शर्ट पॅंट घालून पूजा चालू होती. त्याने दोन-तीन वेळेस जीर्णोद्धार हा शब्द वापरला. शेवटी नाइलाजाने १०० रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि पावती मागितली. पण पावती पुस्तक घरी आहे असे सांगून त्याने हात झटकले. छान! ते पैसे खरच देवाच्या कामी येतील अशी आशा करून आम्ही बाहेर आलो. मुख्य गाभार्‍याशेजारी एक मोठी निमुळती घळ आहे. आत जाण्यासाठी सरपटत जावं लागतं. पुन्हा ऑक्सिजन अत्यंत विरळ आहे असं सांगण्यात आलं. काही वर्षांपूर्वी आत काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला म्हणे. काही साहसी माणसं ऑक्सिजन सिलिंडर्स लावून आत गेली. काय काय सापडलं याचा तपशील माझ्या जवळ नाही पण त्यांना ५०० ते १००० माणूस सहज बसू शकेल असा मोठा हॉल सापडला. त्या हॉलची प्रकाशयोजना नैसर्गिक होती म्हणे. योग्य ठिकाणी घळीस भोकं होती ज्यांतून आरपार सूर्यप्रकाश आणि हवा यांचा पुरवठा घळीला होत होता. आश्चर्य आहे!

मंदिराबाहेर आता वेळ झाली होती कणसं खाण्याची. त्या आधी त्या कुंडात एके ठिकाणी गोमुख आहे तिथलं पाणी प्यायलो. आजवर गोड पाणी हे फक्त पुस्तकात वाचलं होतं. त्याचा अनुभव घेण्याची ही वेळ होती. मधुर आणि थंड पाणी. कितिही प्या पोट भरत नाही. फ्रीजमधल्या पाण्याला त्याची सर येईल काय? पुढे तिखट आणि मीठ लावून उकडवलेली कणसं खाल्ली आणि पुढच्या स्थानाच्या दिशेने निघालो.

राघवेश्वर! खूप कमी जणांना माहित असलेलं हे ठिकाणं. त्यासाठी मी मातोंडकरचा आभारी आहे. राघवेश्वर हे स्वयंभू देवस्थान! इथला सिद्धिविनायक एका मोठ्या घळीत निर्माण झालेला आहे. इथलं सारचं स्वयंभू आहे. नागाची मूर्ती, कासवाची मूर्ती. अविश्वसनीय! हे ठिकाण म्हणजे भारतदास स्वामींचे उपासना स्थान! त्यांचच समाधी स्थान! फार सुंदर, पवित्र, शांत! ना गडबड, ना गोंधळ! हिरण्यकेशी वहात वहात मंदिराच्या मागील बाजूस येते. तिथे हत्तीची मूर्ती आहे. भारतदास स्वामींच्या समाधीपाशी एक पणती अखंड तेवत असते. सकाळच्या सूर्यप्रकाशात सुद्धा ती लक्ष वेधून घेत होती. मंद तेज प्रकट करत होती. सिद्धीविनायकाची मूर्ती तर फारच देखणी आहे. पुन्हा स्वयंभू आहे त्यामुळे सारी बातच न्यारी. अक्षरश: मन प्रसन्न झालं. भारतदास स्वामींनी नुसती टिचकी वाजवली की सारे नाग, साप, हिंस्त्र प्राणी त्यांच्याशेजारी शांतपणे जमायचे अशी आख्यायिका आहे. मातोंडकराने ते स्वत: पाहीले आहे (असं तो म्हणतो). तिथेच एक फोटो सेशन झालं आणि आम्ही पुढे निघालो.

राघवेश्वर

राघवेश्वर

भारतदास महाराज समाधी

आता नांगरतास धबधबा! थोडा दूर आहे पण रस्ता मस्त आहे. पण धबधब्यास पाणी फार नव्हतं त्यामुळे पाण्याचा छोटासा प्रवाह खळाळत वहात खाली असणार्‍या कातळात पडत होता. कोकणात एक मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक गावास एक देव आहे. येथेही गावदेव नांगरतासकरीचा मोठा पुतळा आहे. त्याला भेट देऊन आम्ही पुढे निघालो. पाऊस झाल्यानंतर नांगरतास विलक्षण दिसेल यात शंका नाही.

नांगरतास


नांगरतास

मातोंडकराशी ४ ठिकाणं दाखवायची बोली ठरली होती त्याप्रमाणे पुढच्या स्थानाकडे तो आम्हाला घेऊन निघाला. कावळेसाद. हा एको पॉइंट आहे. प्रचंड खोल दरी. चारी बाजूनी डोंगर. कावळेसादचा अर्थ विचारला असता मातोंडकर म्हणाला, जेव्हा कधी एखादं जनावर दरीत पडतं (पडतं म्हणजे त्याची शिकार होते) त्यावेळेस कावळे दरीच्या तोंडाशी एकत्र कलकलाट करतात. त्यातून निर्माण झालेलं हे नाव. कावळेसाद. आम्ही तेथे गेलो तेव्हा पुन्हा दाट धुकं फैलत चाललेलं होतं. डोंगर आणि दरी जवळ जवळ सारी झाकोळून गेली होती. पण थोड्या वेळाने ढग ओसरले आणि समोरील लावण्य आम्हाला दिसू लागलं. खाली दाट जंगल. सारं हिरवगार. वेगवेगळ्या आकाराचे डोंगर. तिथून महादेवगड पॉईंट दिसतो असं ऐकलं होतं. धुकं निवळलं आणि तो ही दिसायला लागला. महादेवगड म्हणजे शंकाराच्या पिंडीचा आकार असलेला डोंगर. छान दिसतो. तिथेच मग निरनिराळ्या नावांनी हाका मारून एकोचा अनुभव घेतला. आपण ३डी सराउंड साउंडच कौतुक करतो. पण तिथुन निघणारा एको म्हणजे आश्चर्य आहे. एकामागोमाग एक ३ एको आम्हाला ऐकू आले. ते सुद्धा अगदी स्पष्ट आणि वेगवेगळ्या दिशांकडून. एखाद्या अतिशय खोल विहिरीत दगड पडावा आणि त्याचा प्रतिध्वनी ऐकू यावा असा तो एको होता. तिथेच मग एक चहा घेऊन आम्ही मातोंडकरचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला निघालो. कावळेसादला माझ्याकडून १०० गुण. कधी गेलात तर जरूर अनुभव घ्या.

कावळेसाद


कावळेसाद (महादेवगड दिसतोय)


कावळेसाद

साधारण १ वाजला होता. जेवणासाठी आम्ही पुन्हा कामत मध्ये गेलो. तिथे सुंदर जेवण मिळालं. मसाला ताक तर फारच मस्त होतं. पोटभर चेपून मग आता पुढे काय याच्या विचारात आम्ही होतो. हॉटेलवर पुन्हा इतक्या लवकर जाण्यासाठी मी राजी नव्हतो. अजून काही आजुबाजुचं पहावं असं सारखं वाटत होतं आणि मग बोलता बोलता आम्हाला २ ठिकाणं सुचली. दाणोली आणि माडखोल. दाणोलीस साटम महाराजांचा मठ आहे आणि माडखोलला प्रति शिर्डी साईबाबा मंदिर आहे. प्रथम दाणोलीस गेलो. सावंतवाडीचा घाट संपल्यानंतर दाणोली गाव येतं. मठात गेलो. साटम महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. सुंदर जागा आहे. नारळी पोफळीची बनं आहेत. छोटसं कुंड आहे. तिथेच समोर एका दुकानात जरा विसावा घेण्यासाठी थांबलो. त्यांच्या घरचा गोड अननस खाल्ला. येताना त्याची खोडं घेऊन आलो आणि घरातील बागेत तो लावूनही टाकला. काही महिन्यात रुजण्यास हरकत नाही. दाणोलीवरून पुढे माडखोल ३ किमी आहे. तिथे गेलो. साईबाबांचं मंदिर सुंदर आहे. प्रशस्त आहे. तिथे सोवनी म्हणून एक गृहस्थ भेटले. १० वर्षं आनंदाश्रमाचं काम ते पहात होते. बाबा आमट्यांच्या जवळच्या साथीदारांमधले. त्यानंतर ते पावसला स्वरुपानंद स्वामींच्या मठात बरीच वर्षं कामकाज पहात होते. त्यांच्याशी बोलून बरं वाटलं. फार निरिच्छ आणि साधा माणूस!

साटम महाराज मठ (दाणोली)

तिथे जवळ जवळ ४:३० वाजले. अध्यात्मिक खूप झालं. आता काहीतरी happening करावं म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि सनसेट पॉइंटवर येऊन दाखल झालो. रस्त्यातच प्रचंड धुकं लागल होतं आता सनसेट हुकतो की काय असं वाटत होतं नेमकं तसच झालं. धुकं हटायचं नाव घेईना. अर्धा तास वाट पाहून खट्टू होऊन हॉटेल वर परत आलो. पण तरीही सतत वाटत होतं की हे धुकं हटेल आणि सनसेट पहाता येईल आणि कसं कोणास ठाऊक पण धुकं निवळलं. बहूतेक इच्छा खूप तीव्र असावी. धुकं निवळलेलं पहाताच हॉटेल वर दमून भागून येऊन, गरम चहा घेत बसलेले आम्ही सारे उत्साहाने तयार झालो आणि पुन्हा सनसेट पॉईंटवर दाखल झालो. सनसेट पॉईंटच वैभव काय वर्णावं. निसर्गाने आंबोलीवर खुल्या हातांनी ज्या सौंदर्याची बरसात केली आहे त्यातील सनसेट पॉइंट हा शिरपेच! आंबोलीच्या सनसेटचं वैशिष्ठ्य हे की उन्हं कलतांना पार दरीच्या कानाकोपर्‍यात पोचतात आणि दरी उतरत्या सोनेरी सूर्यकिरणांत नखशिखांत न्हाऊन निघते. चारी बाजुंनी डोंगर, विरळ धुकं. दाटून आलेले काळे ढग सोसाट्याच्या वार्‍यासवे पुढे पुढे सरकत होते. खाली दरीतील घरांतून दिवेलागणी चालू झालेली, एखाद्या खोपटातून संध्याकाळी पेटविलेल्या चुलीचा धूर येतोय, आणि थंड हवा मन प्रफुल्लित करून जातेय. काय आणि किती सांगू? थोड्या वेळाने ढग पुन्हा दाटून आले. सूर्यास्त दिसला नाहीच. पण ढग विरळ होते तोवर हे सारं सौंदर्य आम्हाला दिसलं. मावळतीची किरणं दिसली, संधीप्रकाशाचा खेळ दिसला, वारा आणि ढगांची पाठशिवण दिसली. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हळूहळू आकाशात चंद्र अवतरला, संधीप्रकाश कमी कमी होत गेला. तिथे नुसतं बसण्यात एक दीड तास सहज निघून गेला होता. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही हॉटेल वर परत आलो.

सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट

सनसेट पॉईंट

हॉटेलवर येताच गरम पाण्याने आंघोळ झाली. फ्रेश होऊन बाहेर कट्ट्यावर बसून राहीलो. आंबोलीत असतांना निसर्गाचे सारे सोहळे पहाण्यास मिळाल्याबद्दल मी आनंदात होतो. मुसळधार पाऊस पाहीला. खाली उतरेलेले ढग पाहीले, दाट धुकं पाहील, चिंब भिजलेलं घनदाट जंगल पाहीलं, सोनेरी ऊन पाहीलं. काय राहीलं अजून? रात्री मी आणि बाबा नार्वेकरांच्या खानावळीत मालवणी खाण्यासाठी गेलो. जेवण ठीक होतं. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने, नार्वेकरांनी सुचवलेला खाडीतला मासा खाल्ला. त्याचं नावं शतकं किंवा शेतुक. बांगड्याच्या चवीशी मिळती जुळती चव होती. खमंग! आता उद्या परतायचे हा विचार समोर उभा ठाकला आणि मन खिन्न झालं. पण पुन्हा लवकरच परत येण्याचा निर्धार करून मी पलंगावर अंग टाकलं आणि गाढ झोपी गेलो.

आंबोलीतील शेवटचा दिवस उजाडला. चहा झाला. आवरून झालं. सार्‍यांना भेटून झालं. बॅग्स उचलल्या आणि जड मनानी आंबोलीचा निरोप घेतला. तीन दिवस आयुष्यातील सारी दु:ख, ताणतणाव, विवंचना या आंबोलीनी पोटात घेतल्या होत्या आणि आम्हाला पुन्हा एकदा सज्ज करून ती तिच्या कार्याला सिद्ध झाली होती.

ते सारं मनात साठवून मी गाडीला स्टार्टर मारला आणि भरधाव गाडी सोडली. आता पुढचा पल्ला नरसोबाची वाडी. आंबोली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता उत्तम आहे हे वर सांगितलेलचं आहे. आम्हाला तिथपर्यंत येण्यास फक्त अडीच तास लागला. सांगली फाट्यावरून जयसिंगपूरवरून वाडीला जाण्याचा माझा बेत ठरला होता. त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरच्या वेशीपर्यंत आलो आणि तिथे काय झालं होतं हे माहीत नाही? न भूतो न भविष्यति असा ट्रॅफिक! सारा हायवे तुंबलेला. ५०० च्या वर ट्रक अडकून पडलेले. सगळीकडे गोंधळ. सर्विस रोडवरून मागे जाऊन कागलच्या रस्त्याने जावं तर सर्विस रोड जॅम पॅक्ड. देवाच्या मनात आहे का आम्ही त्याच्या दर्शनाला यावं असं बर्‍याचदा वाटून गेलं आणि तो ट्रॅफिक बघून माझी चांगलीच तंतरली. म्हटलं झालं, आता २-३ तास सुटका नाही. पण देवाच्या इच्छेविरुद्ध काही कधी घडलय का? तिथेच एक माणूस भेटला. त्यानी सांगितलं कोल्हापूर शहरातून, उंचगाव-हुपरी-रेंदाळ-बोरगाव मार्गे एक रस्ता आहे नृसिंहवाडीस जाण्यासाठी. नशिबानी मी कोल्हापूराच्या कमानी जवळच होतो. सरळ गाडी कोल्हापूर शहरात घातली. एसटी स्टॅंड वरून डाव्या हाताला वळलो. तिथे एक निमुळता बोगदा आहे. तिथे पुन्हा भलीमोठी रांग होती. तिथून कसाबसा बाहेर पडलो आणि विचारत विचारत उंचगावच्या रस्त्याला लागलो. उंचगाववरून हुपरी, हुपरीवरून रेंदाळ, रेंदाळवरून बोरगाव, बोरगाववरून कुरुंदवाड आणि तिथुन वाडी असा प्रवास करून मी खरतरं आता थकून गेलो होतो. बोरगावला आणि कुरुंदवाडला मध्येच भाषा बदलते. एकदम कन्नड बोर्डस दिसायला लागतात. थोडक्यात काय कर्नाटकाच्या वेशीला चाटून आमचा प्रवास चालू होता. पण थकून सांगतो कुणाला? देवानी मार्गातला अडथळा दूर केला होता ही किती मोठी गोष्ट!

वाडीला गेलो. कृष्णेत हातपाय धुतले. नमस्कार केला आणि आमच्या पुजारी गुरुजींसोबत देवाचं दर्शन घेतलं. त्यांनी संकल्प सोडून घेतला. प्रसाद दिला. समाधान वाटलं. शेवटी आपण करू करू म्हणून काहीही होत नाही हे खरं. एक अदृष्य शक्ती आहे जी सारं हलवत असते. आपण पटावरील बाहूल्या म्हणून वावरावं. ३ वाजून गेलेले असले तरी पुजारींच्या घरी अत्यंत प्रेमाने आम्हाला जेवायला वाढलं. पूजेसाठी काही पैसे देऊन आम्ही पुण्याचा रस्ता धरला. जातांना पुजारींच्या मुलाने आम्हाला रस्ता सांगितला होता त्या रस्त्यावरून आलो. तो रस्ता म्हणजे, के.पी.टी - उदगाव - सांगली - पेठ. मी आपला गाडी चालवतोय चालवतोय. रस्ता संपायचं नावं घेईना. जीव मेटाकुटीला आला. शेवटी एकदाचा तो पेठनाका आला आणि आम्ही राजरोस मार्गावरून कराडकडे निघालो. आधीचा रस्ता मला या येतानांच्या रस्त्यापेक्षा जवळ वाटला. आता पेठ ते पुणे २२५ किमीचे अंतर कापायचे होते. स्पीड मारला. थोड्यावेळाने कराडला येउन दाखल झालो. पण कराडला थांबून काय करणार? तसाच पुढे सातार्‍यापर्यंत गाडी मारली, अजून ५० किमी. सातार्‍याला पोचलो तेव्हा ७ वाजून गेले होते. संध्याकाळ झालेली. तिथेच एका हॉटेलात चहा घेतला आणि सिगरेट मारली. अहाहा.... त्या धुरावर तरंगलो. पण अजुन १२५ किमी अंतर होतंच. तिथुन पुन्हा गाडी मारली. रस्त्यात मध्येच पाऊस, अंधार. रात्रीच्या वेळेस तोच रस्ता किती मोठा वाटतो. रस्ता काही केल्या संपत नव्हता. आणि असचं करता करता शेवटी एकदाचा तो कात्रजचा बोगदा आला. दरीपूल दिसायला लागला. पुण्याच्या वेशीवर आम्ही दाखल झालो आणि रात्री १० वाजता घरी पोचलो. सकाळी ८:३० ते रात्री १०:०० असा अविश्रांत प्रवास झाला. गाडी पार्क करत असता, मी ट्रीप मीटरवरचा आकडा पाहिला. ४८० किमी सकाळपासून. मी आजवर एका दिवसात पार केलेलं ते पहिलचं मोठं अंतर. अंग आंबून गेलं होतं. घरची मंडळी आमटी भात टाकण्यासाठी म्हणून कार्यरत झाली. मी फ्रेश झालो. जेवण केलं. थोड्याच वेळात सगळीकडे पांगापांग झाली. सारेच दमलेले, गाढ झोपेच्या आधीन झाले. मी अजुन जागाच होतो. कॅमेर्‍यातून ते सारे फोटोस पहिल्यांदा लॅपटॉपवर डाउनलोड करून घेतले आणि एक एक फोटो पहायला लागलो. अगदी सुरूवातीपासूनचे. पुण्यावरून निघालो, शिरवळ, सातार्‍याचं माइलस्टोन, पुढे कोल्हापूर, अंबाबाईचं मंदिर, बेळगावकडे जाणारा बेळगावी लोण्यासारखा रस्ता, तिथून गडहिंग्लज, मग आंबोली, आमचं रेसॉर्ट, सावंतवाडी, साधले मेस, रेडी गणपती, हिरण्यकेशी, राघवेश्वर, नांगरतास, कावळेसाद, दाणोली, माडखोल, नार्वेकरांची आंबोली बाजारातील मेस, नरसोबाची वाडी....

४ दिवसांचा हा प्रवास. पण किती सुंदर, किती enriching, किती मनमोकळा, किती निसर्गाच्या सानिध्यात! रात्र शांत होत गेली. झोपायच्या आधी सिगारेट पेटवली आणि खिडकीत शांतपणे धुराची वलयं काढत उभा राहीलो.

एक आवाज म्हणाला... केदार... मनावर कोरलेल्या गोष्टींचं विस्मरण होत नसतं.

तेवढ्यात दुसरा आवाज म्हणाला.... छे... छे... त्या विलक्षण दिवसांचं विस्मरण व्हायला नको म्हणून कुठेतरी नोंद असायलाच हवी. काहीही असो, काहीतरी लिहिण्यास सुरूवात करावी असं वाटलं आणि सुरूवात त्याच रात्री केली. ते लिखाण आज पूर्ण झालं. आंबोलीवर तसं कुणीही कितीही लिहावं अन् ते प्रत्येक वेळेस नवच वाटेल असं ते सौंदर्यं. ते अनुभवण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी... रसिकता... धुम्र वलयांवर तरंगत एक जुनं बालगीत माझ्या ओठांतून आत्ता बाहेर पडतय...

हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वार्‍याची पावरी.

सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.

हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.

गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होउन
फुलांफुलांतुन उडू?


आंबोली मला खुणावतेय... डोंगरांच्या कुशीत वसलेली चिंब ओली आंबोली मला पुन्हा पुन्हा खुणावतेय...

तुमचा,
केदार

Friday, June 24, 2011

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे

आज रविवार! जेवून दुपारी झोपलो आणि उठलो तेव्हा संध्याकाळचे ६:०० वाजले होते. उगाच मग थोडा वेळ टंगळ मंगळ केली. गरम पाण्याने एक वॉश घेतला आणि फ्रेश होऊन घराबाहेर पडलो. रविवारची संध्याकाळ, शांत, निवांत, आळसावलेली... अशा संध्याकाळी करण्यासारखं काही विशेष नसलं की पावलं आपसूक वळतात तुळशी बागेकडे. तुळशी बागेतील राममंदिर म्हणजे माझं श्रद्धास्थान! आम्ही जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला यायचो तेव्हा हटकून तुळशीबागेला भेट द्यायचो. खेळण्यांच्या दुकानात ठिय्या मारून बाबांकडे नाहीतर काकाकडे हव्या त्या खेळण्यांसाठी हट्ट धरायचो. माझं आणि तुळशी बागेचं नातं आहे ते तेव्हापासून. आजही तिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं. सार्‍या कोलाहलातून मन:शांतीकडे नेणारी ती प्राचीन वास्तू, सौभाग्य अलंकारांची दुकानं, अगदी चुलबोळक्यांपासून ते खर्‍याखुर्‍या संसारमांडणीपर्यंत सार्‍या गोष्टी मिळण्याचं पुण्यातील एक हक्काचं, आपुलकीचं स्थान! प्रवेश करताच, चंदन, काश्याची वाटी, पूजा साहित्य, देव्हारा, पितळी वस्तू विकणारी ती छोटीशी दुकानं. त्यात वर्षानुवर्षं घुमत असणारा चंदनाचा, उदबत्त्यांचा परिमल, कुठे दागिने, चांदीच्या मांडून ठेवलेल्या वस्तू. झगमगाटापेक्षा साधेपणात जास्त सौंदर्य असतं हे पटवून देणारी आमची तुळशी बाग!

असो. तर गाडीवर टांग टाकली आणि तुळशी बागेत पोहोचलो. (पुण्यात आम्ही दुचाकी, चारचाकी सार्‍यालाच 'गाडी' असं संबोधतो.) दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात सारे व्यवहार चालू होते. खुद्द राममंदिरात सुद्धा दिवे नव्हते. मनाला थोडासा आनंद झाला. सगळीकडे अंधार असतांना, फक्त एका समईच्या प्रकाशात देवाचा गाभारा, मूर्ती अद्वितीय दिसते. रामाचं, दास मारूतीचं दर्शन घेतलं, थोडा वेळ सभामंडपात विसावलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी पुढे झालो. तुळशी बागेतील राममंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या अगदी सुरूवातीस, वर भिंतीवर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं एक विधान लिहिलेलं आहे. ते मी आजवर असंख्य वेळा वाचलेलं आहे पण जेव्हा कधी मी ते पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा तोच आनंद, उत्साह, औत्सुक्य आणि उर्मी अनुभवतो. ईश्वराच्या जवळ जाण्याविषयी, साधनेविषयी त्यात काही अभूतपूर्व असं लिहिलेलं आहे. तो एक गुरूमंत्रच आहे, सोप्या शब्दात मांडलेला!


या बाबतीत माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट अशी. माझी मुलुंडची मावशी आमच्याकडे पुण्याला रहाण्यास आली होती. उषामावशी. त्यावेळेस मी मास्टर्स करत होतो. शिक्षण चालू असल्याने रियाज करण्यास वेळ मिळत असे. मी पहाटे लवकर उठून तानपुरा जोडून रियाज करत बसे. त्या दिवशी सुद्धा तसाच देवघराच्या खोलीत बसलो होतो. राग निवडला होता भैरव! भैरव कमालीचा राग आहे. जितका गोड तितकाच धीरगंभीर! पहाटेच्या वेळेस गाण्याचा हा राग. यातील कोमल रिषभ आणि कोमल धैवताची जादू काही औरच आहे. पुन्हा कोमल रिषभावर आंदोलन आहे. आंदोलन म्हणजे त्या स्वराचं केलेलं गोलाकार आवर्तन! कोमल धैवतावरून पंचमावर उतरण्यातील आणि कोमल रिषभावरून शुद्ध गंधारावर जाण्यातील आनंद हा एक अनुभव असतो. मी गात बसलो होतो. उषामावशीने ते ऐकलं आणि खोलीत माझ्या नकळत ती येऊन बसली. माझी आलापी चालू होती. तानपुर्‍यातून गंधाराची निष्पत्ती अमाप होत होती. त्यात माझा गंधार सुद्धा त्या दिवशी अगदी मिसळून जात होता. प्रत्येक स्वराला एक उंची असते. त्या उंचीचा स्वर बरोबर लागला की आपण म्हणतो frequency match झाली. एखाद्या माणसाशी frequency match होणं म्हणजे अजून काय? स्वर माणसांसारखे असतात. त्यांच्याशी मैत्र जमले की त्या घोळक्यात कधीही एकटं वाटत नाही, एकटं असूनसुद्धा. माझा रियाज झाला आणि मी उठलो. पहातो तर उषामावशी मागेच बसली होती. मला मजा वाटली. तीने सुद्धा तोंड भरून कौतुक केलं आणि त्यापुढे तीने मला जे सांगितलं ते मी कधीही विसरणार नाही. ती म्हणाली…

"केदार, परमेश्वर प्राप्तीचा अर्थ शोधायचा म्हणजे काय? तो आपल्यातच लपलेला, रुजलेला आहे. त्याची रूपं असंख्य आहेत. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट पहाशील, अनुभवशील त्यावेळेस तिथे परमेश्वर आहे असं समजण्यात काहीच वावगं नाही. आज तू रियाज केलास. गंधार लावलास. त्या गंधारातून जे सौंदर्य, जो आनंद निर्माण झाला त्यात परमेश्वर आहे हे विसरू नकोस. परमेश्वर असाच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतो."


त्यावेळेस मला कळलं की
frequency match होणं म्हणजे काय? जसा रेडिओ एखाद्या frequency ला लागतो तसच हे. अगदी मनापासून देवाचं दर्शन घेत असता, मनात एखादी इच्छा यावी आणि एखादं फूल मूर्तीवरून टपकन पडावं याचा अर्थ सुद्धा माझ्या मते हाच आहे.

सगळीकडे frequency आहे. ती जिथे match होते तिथे सूर उमटतात, जिथे होत नाही तिथे असूर उपटतात. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं ते विधान मी याच दृष्टीने बघतो. ईश्वरप्राप्तीचा अर्थ शंखचक्रगदाधारी प्रकटणं हा नव्हे, छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वराचा सहवास अनुभवणं आणि त्यावर unbiased विश्वास ठेवणं हा आहे. पुन्हा साधनेला समर्थपण येण्यासाठी सातत्याची जोड हवीच आणि नेमकं हेच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एरवी जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आणि संसार, कामकाज यात स्वत्व हरवून गेलेला मनुष्य एखाद्या स्वत:ला हव्या असलेल्या पण हरवून गेलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा पुन्हा सज्ज होतो यालाही सातत्यच म्हणायचे ना? माझ्या प्रत्येक भेटीत तुळशीबागेतील राममंदिरात जतन करून ठेवलेलं हे विचारधन माझ्या मनावर आनंदघन म्हणून बरसतं आणि मला सातत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतं. स्वामी परमहंस म्हणतात...

"अथांग महासागरात मौल्यवान मोती वैपुल्याने मिळतील, परंतु ते मिळविण्याकरता तुला अचाट साहस लागेल. जरी तुला काही वेळा अपयश आले तरी सागरात मोती नाहीतच असे म्हणता येणार नाही. सातत्याने न खचता प्रयत्नशील राहिलास तर यश खात्रीने तुझेच आहे.

त्यापेक्षाही कष्टतर अनुभव मानवास ईश्वर साधनेबद्द्ल प्रत्ययास येईल. वैफल्याने खचून न जाता तू अविश्रांत प्रयत्नशील राहिलास तर मी विश्वासपूर्वक सांगतो की ईश्वर तुझ्या जवळच येईल.

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे.”


तुमचा,
केदार

हाच लेख येथेही वाचता येईल.

Monday, June 13, 2011

मन सुद्ध तुझं!

३-४ दिवसांपासून काहीसं उदास वाटतयं. त्याला काही कारणं आहेत. काही करू नये असं वाटतय. हातून काही विशेष घडत नाहीये. स्विमिंग बंद पडलयं कारण समर कॅंम्प्स चालू आहेत. एकच बॅच असते दिवसभरात आणि ती बॅच कधीकधी चुकते. ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होतो वगैरे... मग काल संध्याकाळ पण तशीच चालली होती. का कोणास ठाऊक 'मारवा' ऐकावासा खूप वाटत होता. स्वत:च गायला बसणार होतो, तानपुरा काढून ठेवला होता पण पुढे त्याचीही इच्छा होइना. कधी कधी self-motivation कमी पडतं. मग youtube वर भीमसेनजींचा 'मारवा' ऐकला. 'बंगरी मोरी' हा त्यांचा प्रसिद्ध छोटा ख्याल. काय एक एक सूर लावलाय पंडीतजींनी! पण त्यामुळे व्हायचा तो परिणाम शेवटी झालाच. अजूनच कातर वाटायला लागलं. कसली तरी हुरहुर जाणवायला लागली. अन इतक्यात काही जुन्या मराठी गाण्यांचे दुवे डोळ्यांपुढे आले. असच सहज बघता बघता 'कुंकू' चित्रपटातील एक गाणं सापडलं. आईला बहूतेक मी काहीसा उद्विग्न आहे हे कळलं असावं. ती सुद्धा माझ्या खोलीत येऊन गेली. अन् तितक्यात streaming संपून ते गाणं लागलं आणि शब्द उमटायला लागले. आई काहीच बोलली नाही फक्त माझ्या पाठीवर एक आश्वासक थाप देऊन हसत हसत कामासाठी बाहेर निघून गेली.

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची ||

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ||


हाताच्या मुठी आपसुक वळल्या. छे... आयुष्यात अचाट दु:ख आहे पण निराशेच्या दलदलीतून खेचून बाहेर काढणारे काही अदृष्य हातही आहेत. आपण फक्त हात पुढे करण्याचा अवकाश...

अन् आज मला खूप बरं वाटतयं. काल पेक्षा खूप बरं! पण वर म्हटल्याप्रमाणे या माझ्या सुधारित मनस्थितीत बर्‍याच जणांचा हात आहे. गीतकार शांताराम आठवले यांचा, संगीतकार केशवराव भोळे यांचा, पेटीवर जिवंत साथ करणार्‍या वसंत देसाई यांचा, शब्द सूर अभिनयातून काळजापर्यंत पोचविणार्‍या मा. परशुराम यांचा आणि एक हात पाठीवरचा...

तुमचा,
केदार

Thursday, June 2, 2011

पाऊस आला...


पाऊस आला की मला दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते. पार्ल्याची माझी शाळा आणि माझं बालपण ही पहिली गोष्ट. मे महिन्याची सुट्टी संपून शाळा पुन्हा चालू व्हायची ती याच सुमारास. घराबाहेर पावसाच्या पाण्याचं तळं व्हायचं. कधी कधी मी रहात असलेल्या सुभाष रोडवर तर गुडघ्याएवढं पाणी असायचं. त्यातून वाट काढत जाण्यास मजा यायची. कधी कधी शाळेला सुट्टी मिळायची त्यावेळेस तर काय धमाल. आम्ही होड्यांचा खेळ खेळायचो. पावसात मनसोक्त भिजायचो. आईची मग हाक यायची. चिखलात माखलेला मी... आई खसखसून आंघोळ घालायची. कधी भजी, कधी वडा, कधी डोसा असं काहीतरी नाविन्यपूर्ण खायला असायचं. ते खायचं आणि पाऊस बघत आतल्या खिडकीला लागून असलेल्या बिछान्यावर पडून रहायचं.

दुसरी गोष्ट म्हणजे माझं पुण्यातील डी.एस.के. विश्वमधील घर. आधीच ते डोंगरांनी वेढलेलं. आपण जरी हातांनी झाडांना, रोपांना कितीही पाणी दिलं, तरी पाऊस प्यायल्यानंतरचं त्यांच रूप वेगळच दिसतं. तेच रूप समोर चारीही दिशांना दिसायचं. सभोवार सारे हिरवे-पोपटी छटा ल्यालेले डोंगर, तुडुंब भरलेले खडकवासला, सगळीकडे पसरलेलं धुकं. त्यात संध्याकाळ झाली की धुक्यातून लागत जाणारे दिवे समोर अंधूक अंधूक दिसायचे. सारं पुणचं समोर पसरलेलं. पहाणार तरी किती आणि कुठे? निसर्ग असा धुक्याची दुलई लेऊन शांत पहुडला असता आपणही अंगावर मऊ दुलई घेऊन पडून रहायचं. कुणाची कटकट नाही, गडबड नाही, आपणं आपले आणि आपलं कुणीतरी... आज मी त्यापासून दूर आहे पण पाऊस आला की त्या सार्‍या गोष्टी पुन्हा स्मरतात. म्हणावसं वाटतं...

ए आई, मला पावसात जाऊ दे...
एकदाच ग भिजूनी मला चिंबचिंब होऊ दे...

ती निरागसता आता शक्य नाही. माझ्यातील तारुण्याने माझ्यातलं बाल्य माझ्यापासून हिरावून नेलयं. पण तरीही लहानपणी पाहिलेली एक जाहिरात नेहमी आठवते. त्यात ऊंचावरून फेसाळत पडणारा एक धबधबा आठवतो, आकाशात उडणारे पक्षी आठवतात, हिरवागार माळ आठवतो आणि मग मनात त्या जाहिरातीतील शब्द रुंजी घालायला लागतात...

चल मन् चल उस और चले जहाँ होता ह्रदय प्रफुल्लित भी
जहाँ पंख पसारे बिना भय के खुले गगन मे उड सके मन भी...

सर्वांना पहिल्या पावसाच्या शुभेच्छा!

तुमचा,
केदार

Sunday, May 29, 2011

ह्यूस्टन डायरी!

मी मागील लेखात लिहीले होते "आयुष्य कधी कोणते रंग दाखवेल काही सांगता येतं नाही. म्हणून दु:खासाठी स्वत:ला तयार करण्यासोबत, सुखाचं स्वागत करण्यासाठी कायम तयार रहाणं हे ही तितकचं योग्य." माझी ह्यूस्टनची सफर हे वाक्य सत्य आहे याची प्रचिती देणारी ठरली. तीच ही ह्यूस्टन डायरी. असच लिहावसं वाटलं. मन मोकळं करावस वाटलं. मिळालेला आनंद वाटावासा वाटला. इतकच!

मागील शुक्रवारी मी भारतात परत आलो. पु.लं.नी "म्हैस" या त्यांच्या कथेत म्हटल्याप्रमाणे "परदेशी जातांना मी का चाललोय आणि भारतात परत येतांना मी इथे का परत आलोय" अशी काहीशी द्विधा मनस्थिती माझी होती; बहुधा जेटलॅग असावा. मुंबई विमानतळावर माझं सामान येण्यास जवळ जवळ १ तास लागला. ३:०० ला पहाटे उतरलेला मी, ५:०० ला बाहेर आलो आणि त्यानंतर लगेचच पुण्याकडे रवाना झालो. तिथल्या प्रसन्न, थंड हवेतून एकदम मे महिन्याच्या उन्हाळ्यात पडण्याची ही माझी पहिली वेळ नव्हे. जो मानसिक त्रास व्हायचा तो झालाच. मी स्वप्नातून वास्तवात आलो होतो. "पहाटेचा गार वारा" वगैरे कवि-कल्पना हवेत विरून गेल्या. एक दोनदा तर ड्रायवरनी हॉर्न वाजवल्यावर मी चक्क दचकलो. एक दीड महिना माझा आणि हॉर्नचा तसा काही संबंध नव्हता. असो...

ह्यूस्टन हे अमेरिकेतील दक्षिणेकडचे गाव, टेक्सास प्रांतातील, मेक्सिकोच्या बॉर्डरवर असणारं, खूप स्पॅनिश लोकसंख्या असणारं, प्रशस्त. माझा ह्यूस्टनला जाण्याचा योग केवळ कामामुळे आला. पण ह्यूस्टनने काही इतक्या सुंदर आठवणी दिल्या आहेत की त्या विसरणं शक्य नाही. मी, प्रसन्न आणि शिवम. आमचा छोटासा पण मस्त ग्रूप. ग्रूपमधील सार्‍यांची तोंडं विरुद्ध दिशांना पण मस्ती मात्र एकत्र, काम एकत्र आणि मन लावून. त्यामुळे कोणालाच कधीच कामाविषयी सूचना कराव्या लागल्या नाहीत. अगदी योगायोगानी ही मंडळी भेटली आणि काही दिवसातच अगदी जवळची झाली. स्वत:ची दु:ख उघडपणे मांडू लागली. मलाही त्यांच्याशी बोलतांना हलकं वाटू लागलं. सोमवार ते शुक्रवार कसे जायचे ते ठाऊक नाही. मग शनिवारी दुपारपर्यंत झोप झाली की शिवम हॉटेलवर आम्हाला घेण्यासाठी यायचा. मग लंचला कधी इटॅलिअन, कधी इंडीयन, कधी मेक्सिकन, कधी सब-वे मधलं माझं लाडकं टुना सब, कधी फ्राईड चिकन, कधी फक्त एखादा बर्गर तर कधी बार्बेक्यू चिकन. खाण्यापिण्याची रेलचेल असायची. काहीही खायचो पण कधीही त्रास झाला नाही. उत्तम हवा हे कारण असावं.

मी रहात होतो ते Extended Stay हॉटेल अगदी माझ्या मनाजोगतं होतं. त्यात अपार्टमेंट हॉटेलच्या सार्‍या खूबी होत्या. म्हणजे अगदी इस्त्री पासून ते कुकींग रेंजपर्यंत सारं काही. बिछाना अगदी प्रशस्त. रात्री पाठ टेकली की डाऊनटाऊनमधील दोन टॉवर सदैव समोर चमचमत असायचे. माझ्या एकटेपणाला त्यांची मूक सोबत होती. रूममध्ये एक लेझी चेअर सुद्धा होती. तीत ऐसपैस बसून सूप वगैरे पिण्यास मजा येत असे. पुन्हा अपार्टंमेंटला dedicated swimming tank होता.

माझं अमेरिकेतील घर

ऑफीसमधून हॉटेलवर आलो की मी स्विमिंग न चुकता करत असे. १८:१५ ला ऑफिसमधून घरी आलो की १८:३० ला स्विमिंग टॅंक. तिथे ३०-४५ मिनटं पोहायचं. कधीही हा क्रम चुकला नाही. मग रूममध्ये जायचं. गरम पाण्यानी टब भरायला लावायचा आणि आंघोळ करून मस्त फ्रेश व्हायचं. कामाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जायचा.


अपार्टमेंटमधील स्विमिंग टॅंक

त्यानंतर मी आणि प्रसन्न फिरण्यासाठी जायचो. घराजवळ 'फीएस्टा' म्हणून मोठा मॉल होता. 'सुपर टारगेट' नावाचं सुपर मार्केट होतं. तिथे नुसतं फिरलं तरी दोन तास निघून जायचे. मी तिथून संध्याकाळसाठी काहीतरी विकत घेत असे. कधी फक्त दूध, फळं, प्रून्स, पीचेस. माझा सिगारेटचा ब्रॅंड होता 'मार्लबोरो स्पेशल ब्लेंड'. एखादं ते पाकिट. अशी छोटी मोठी खरेदी करून आम्ही पुन्हा हॉटेलवर परतत असू.

सुपर टारगेट मॉल

तिथे एक 'फ्रेंचीज' म्हणून रेस्तंरॉं चेन आहे. तिथलं फ्राइड चिकन आणि गंबो सूप म्हणजे केवळ आनंदाची पर्वणी. 'गंबो'त काय असतं हे मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहीलं आणि मी सुद्धा जाणून घेण्याचा विशेष प्रयत्न केला नाही.

फ्रेंचीज्

शिवमच्या गाडीतून जातांना kaskade and deadmau5 ची गाणी ऐकत जाणं म्हणजे आमच्यासाठी सुख होतं. त्यात प्रसन्न कधीकधी एकदम नाचायला सुरूवात करायचा. हळूहळू सारेच जण ती गाणी ऐकण्यात बेहोश होऊन जायचे. एक गाणं जे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही ते म्हणजे "I remember" by kaskade and deadmau5.


प्रसन्न त्याच्या रूममधून कधीतरी रात्री फोन करून मग ई-सकाळ वाचून दाखवायचा. मला खरतरं त्या सार्‍या त्याच त्याच बातम्यांपासून दूर रहायचं होतं. पण तो इतक्या मजेशीरपणे सांगायचा की मग मी सुद्धा माझ्या रूममध्ये ई-सकाळ उघडून बसायचो.

पहिल्या रविवारी मी आणि शिवम डाऊनटाऊनला गेलो. तिथे लहान मुलांचा समर कॅंप भरला होता. सगळी गर्दी. रंगीबेरंगी पोषाखातील गोड मुलं. वेगवेगळे वेष केलेली. डाऊनटाऊन ऍक्वेरीअम पहाण्यास जायचं होतं. त्या आधी फिरता फिरता मला हार्ड रॉक कॅफे दिसला. बरीच वर्ष तिथे जायचं होतच. भारतात ते आजवर शक्य झालं नाही. मला रॉक संगीत तुफ्फान आवडतं. आम्ही पोटेटो स्किन्स आणि चीज चिकन मागवलं आणि गाणी ऐकत, गप्पा मारत वेळ छान घालवला. दुर्दैवाने लाइव बॅंड ऐकण्यास मिळाला नाही. पण तरीही हार्ड रॉक कॅफे ला जाता आलं हे खरं सुख.

ह्यूस्टन डाऊनटाऊन हार्ड रॉक कॅफे

ह्यूस्टन स्कायलाईन

कामाचा ताण होताच. तो दिवसेंदिवस वाढतही होता. पण या सार्‍यातून वेळ काढून आम्ही खूप फिरलो. गॅल्वेस्टन आयलॅंड, हर्मन पार्क ची आमची सफर मस्तच झाली. गॅल्वेस्टनला शिवमचा एक मित्र रहातो. तिथे त्याच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो. अपार्टमेंटमध्ये अप्रतिम आणि ऊंची स्पा होता. त्यात नंतर जायचं असं सर्वानुमते ठरलं. मग आम्ही बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. त्याआधी फेरीतून गॅल्वेस्टन पलिकडील एका बेटावर जाऊन आलो. फेरीचा अनुभव फारच वेगळा होता. समुद्रात दिसणारे डॉल्फिन्स, जेली फिश, मधूनच लांबवर दिसणारा एखादा दीपस्तंभ आणि डोक्यावर अविश्रांत उडणारे देखणे सी-गल्स यामुळे ती फेरी अविस्मरणीय झाली.

गॅल्वेस्टन आयलॅंड

सी-गल्स

प्रसन्न आणि शिवम

फेरी

Gulf of Mexico लहानपणी पुस्तकात वाचलं होतं पण त्या अथांग समुद्रात डुंबण्याची मजा काही औरच होती. अजस्त्र लाटा किनार्‍यावर येत असतांना त्यांच्यातील शक्तीची आणि समुद्राच्या गहीरेपणाची कल्पना येत होती. थोडीशी भिती वाटत होती पण तरीही समुद्रात खूप पुढपर्यंत आम्ही गेलो. जितके पुढे जाण्याचा प्रयत्न करू तितक्याच वेगानी आम्ही परत किनार्‍यावर फेकले जात होतो. पण तो अनुभव छान होता.

गल्फ ऑफ मेक्सिको

गल्फ ऑफ मेक्सिको

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

भूक लागली तसे आम्ही एका चायनीज रेस्तरॉंमध्ये गेलो. तिथे चिकनपासून बेडकापर्यंत सारं काही यथासांग मांडून ठेवलेलं होतं. मी बेडूक खाल्ला हे मला आता सांगण्यास कसंतरीचं वाटतयं. पण आयुष्यात सगळ्या गोष्टींचा एकदा तरी आस्वाद घ्यायचा होताच. शिवमच्या मित्राने आणि मित्राच्या बायकोने अतिशय प्रेमाने आमचं आदरातिथ्य केलं.

हर्मन पार्क ही ह्यूस्ट्नमधली जॅपनीज बाग. तिथे चेरी ब्लॉसम पहाण्यास मिळेल या आशेवर तिथपर्यंत गेलो. चेरी ब्लॉसम पहाण्यास मिळाला नाही पण तरीही बाग अत्युत्तम होती. मोठा लेक, त्याच्यात बदकं, सारस पक्षी, बाजूने सगळी फुलं, दूरवर पसरलेली हिरवळ. मजा आली. तिथे बॅले नृत्याचा कार्यक्रम होणार होता.


बॅले

'बॅले'तील कलाकार

तसेच काही काळ थांबलो. बॅलेची तिकिटे घेऊन सभागृहात जाऊन बसलो. ओपेरा संगीताच्या पार्श्वभूमीवर चालू असणार्‍या त्या नृत्याने पश्चिम संस्कृतीचे रंग अलगद उलगडले. संध्याकाळ होत चाललेली, अंधूक दिवे लागत चाललेले अन् अशा कातरवेळी मनात प्रेमासाठीची आर्तता निर्माण करणारा तो नृत्यप्रकार पाहून मन काहीसं हळवं झालं. त्यातील सारेच कलाकार एकापेक्षा एक सरस होते. तिथेच मग एक हॅमबर्गर खाऊन आणि स्लश-पपी पिऊन आम्ही घराचा रस्ता धरला.

हर्मन पार्क

हर्मन पार्क

माझा तिथल्या ऑफिसमधील अमेरिकन मित्र, स्टीव. अत्यंत गप्पिष्ट. ह्या माणसाने खूप मजा करविली. मी अमेरिकेला पहिल्यांदाच आलो आहे हे कळल्यावर तर त्याच्या उत्साहाला पारावर उरला नाही. सतत अमेरिकन संस्कृतीतील काहीतरी सांगत राहीला. दाखवत राहीला. देत राहीला. त्याला माझं नावं बोलता यायचं नाही. प्रेमाने तो मला केडी म्हणायचा. एक दिवस ऑफिसनंतर मी हॉटेलवर गेलो असतांना, हा त्याच्या गर्लफ्रेंडला आणि शिवमला बरोबर घेऊन मला घेण्यासाठी आला. मला आश्चर्य वाटलं. मला म्हणाला, "गाडीत बस". मी बसलो. कुठे चाललोय हे कुणीच सांगायला तयार नाही. त्याची गाडी मस्त होती. मून रूफ उघडून आकाशाकडे पहात, 'बोनोबो'ची गाणी ऐकत वेगाने जाण्यास मजा येत होती. बराच वेळ झाल्यानंतर त्याने एका स्टेडीयम समोर गाडी थांबविली. मला काही कळेना. मग त्याने सांगितले. मी त्याच्याकडे कधीकाळी बोललो होतो, बेसबॉलच्या मॅचबद्द्ल. अमेरिकेत जवळजवळ सार्‍यांनाच बेसबॉलचं वेड आहे. स्टीवने आमच्यासाठी त्याचे पासेस घेऊन ठेवले होते. मॅच होती ह्यूस्टन आणि शिकागो यांच्यामधील. ते प्रशस्त स्टेडीअम पाहून मी चक्रावून गेलो होतो. स्टेडीअमवर बसून लाइव मॅच पहाण्याचा माझा तो पहिला प्रसंग. मॅचनंतर तो आम्हाला "Tea and Tapioca" मध्ये घेऊन गेला. तिथे मी cold coconut tea प्यायलो. माझी एकच चुक झाली म्हणजे मी large tapioka मागितलं. त्याचे दाणे फुलून इतके मोठे झाले के पुढे पिता येईना. आता पुढील वेळेस लक्षात ठेवीन. एक दिवस स्टीव आम्हाला Thor 3D बघण्यासाठी घेऊन गेला. First day first show असूनही गर्दी फार दिसत नव्हती. ते सारं बघून मला काहीसं अजब वाटलं. टिकेटींग मशीनसमोर आम्ही उभे राहीलो आणि टिकेट्स काढली. ना धक्काबुक्की, ना त्रास. पुन्हा आपल्याला हवे त्या ठिकाणी बसायचे. सीट नंबर पद्धत नाही. पण सारं सुरळीत. आवाज नाही, गोंधळ नाही. Thor 3D हा एक वेगळाच अनुभव होता.

मी आणि स्टीव

ह्यूस्टन आणि शिकागो मधील बेसबॉल मॅच

'नासा'

नासा- माझी अमेरिकेतील शेवटची संध्याकाळ - पार थकलो होतो

मुळात ज्या कामासाठी गेलो होतो ते काम यशस्वी झालं हे सगळ्यात महत्वाचं. पण शेवटच्या क्षणापर्यंत इतकं काम होतं की शेवटी मला ऑफिसमधूनच तडक विमानतळावर जावं लागलं. किमान ४ तास आधी विमानतळावर पोचणं गरजेचं असूनही मी संध्याकाळी ५:०० पर्यंत ऑफिसमध्येच होतो, रात्री ८:३० ची फ्लाइट. मग मात्र किंचित धाकधुक वाटायला लागली. शेवटी सार्‍यांचा निरोप घेऊन मी टॅक्सीत बसलो. माझ्या बॅग्स उचलून शिवम आणि स्टीव दोघेही मला बाहेर पोचविण्यासाठी आले होते. टॅक्सीत मी बसेपर्यंत दोघेही तसेच उभे होते. शिवमबरोबर एक शेवटची सिगारेट मारली आणि त्या दोघांना जड मनानी परतीचा हात केला. टॅक्सीचं दार बंद झालं आणि क्षणभर मनात विचार येऊन गेला, "च्यायला, काय जिंदगी आहे! कुठे जिवाभावाचं कोण भेटेल काही सांगता येत नाही. सारी भूमी खरतरं अखंड आहे, मग सीमारेषा आपणच का आखल्यात?" ह्म्म्म्म....


माझी कंपनी - शेवटचा दिवस

निघालो तो नेमका हेवी ट्रॅफिकच्या वेळेस. कॅब ड्रायवरला मी माझ्या फ्लाइटची वेळ सांगितल्यावर तो ही क्षणभर चरकला असावा. काहीतरी मनात योजल्यासारखा वार्‍याच्या वेगाने निघाला आणि कुठल्यातरी निराळ्याच रस्त्यावरून जाऊ लागला. आता क्षणभर मी चरकलो. काही बोलणार एवढ्यात मला त्याच्या पुढील सीटवर ठेवलेलं बायबल दिसलं. "अरे, हा अध्यात्मिक दिसतोय" अशी मनाची समजूत करून घेत मी नि:संशय डोळे मिटले. सकाळपासून चालू असलेल्या धावपळीमुळे कधी झोप लागली हे कळलं नाही पण बरोबर त्यानंतर अर्धा तासात मी एअरपोर्टवर होतो हे खरं. पटापट बॅग्स उचलल्या आणि चेक-इन साठी निघालो. १५ तासांचा ह्यूस्टन ते दोहा प्रवास अतिशय छान झाला. मी जाण्याआधी मला कतार एअरलाइन्स दिल्याबद्द्ल मी कुरबुर केली होती. तेव्हा माझ्या ट्रॅवलडेस्क मधल्या मित्राने मला ही ५ स्टार एअरलाइन आहे असं सांगितलं होतं. अर्थातच मी त्यावर फार विश्वास ठेवला नव्हता. मुंबई-दोहा विमानप्रवास खत्रुड झाला. मी ब्लॅंकेट मागितल्यावर ब्लॅंकेटस संपली आहेत असं मला सांगण्यात आलं होतं. पुन्हा माणसं सगळीचं अद्वितीय. माझ्या बाजूच्या माणसाचा इमिग्रेशन फॉर्म मी भरून दिला. एअरहोस्टेस गोळ्या घेऊन आली, तर बचका भरून गोळ्या घेणारे असंख्य महाभाग. असो... यावर अधिक भाष्य नको.

तर सांगायचा मुद्दा मुंबई-दोहा विमानप्रवास खास झाला नाही. मी माझ्या अविश्वासावर ठाम होतो. मी जिंकलो असं वाटत असतांनाच मी दोहा-ह्यूस्टन फ्लाइटमध्ये पाय ठेवला आणि सारं चित्रच पालटलं.


ह्यूस्टन - दोहा प्रवासासाठी सज्ज होत असलेलं माझं फ्लाइट

एखाद्या ५-स्टार सारखी सरबराई बघून मी गोंधळलो. गेल्यागेल्या हॉट टॉवेल, गोळ्या, फ्रेशनेस नॅपकीन्स, ब्लॅंकेट्स, इअर फोन्स, वेलकम ड्रींक कशाची म्हणून ददात नव्हती. पुन्हा फ्लीट अगदी नवीन आहे हे जाणवत होतं. टीवी वर २०० च्या वर चॅनेल्स. असंख्य गाणी. ४०००० फूट उंचीवर, गरम कॉफीचा कप हातात असतांना, बडे गुलाम अली खॉं साहेबांचा 'कोमल रिषभ आसावरी' ऐकणं हे काय सुख आहे ते मला विचारा. थोडक्यात, कतार एअरलाइन्स खरोखरच चांगली आहे यावर माझा विश्वास बसला. पण पुन्हा परतीच्या प्रवासात दोहा-मुंबईची एअरलाइन फ्लीट पाहून यावेळेस थोडं वाईट वाटलं. हा भेद का? प्रश्न मनात असंख्य वेळा डोकावून गेला. उत्तर मात्र मिळालं नाही. मुंबईला पोचल्यावरची कहाणी सुरुवातीलाच सांगितली आहे. एअरपोर्टवर योग्य जागी पार्किंग केल्याची शिक्षा म्हणून २५० रुपये पार्कींग फी भरली आणि पुण्याच्या दिशेने निघालो.

सांगण्यासारखं अजून खूप आहे. पण काही नाती, गोष्टी, प्रसंग शब्दातीत असतात. त्यांना मनात जपावं हेच खरं. दिवस पाखरासारखे भुरर्र उडून गेले होते. आता पुन्हा ट्रॅफीक, धूळ, रस्त्यावर बिनधास्तपणे थुंकणारे थुंकसंप्रदायी, तीच घालमेल हे सारं डोळ्यांपुढे नाचू लागलं होतं. पण त्याच बरोबरीने या काहीशा कुरूप वास्तवतेला सुंदर करणारी आणि डोळ्यांपुढील अंधारात मिणमिणत असणारी कधीकाळी वाचलेली कुसुमाग्रजांची कविता मनात पिंगा घालत होती.

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

तुमचा,
केदार