Friday, June 24, 2011

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे

आज रविवार! जेवून दुपारी झोपलो आणि उठलो तेव्हा संध्याकाळचे ६:०० वाजले होते. उगाच मग थोडा वेळ टंगळ मंगळ केली. गरम पाण्याने एक वॉश घेतला आणि फ्रेश होऊन घराबाहेर पडलो. रविवारची संध्याकाळ, शांत, निवांत, आळसावलेली... अशा संध्याकाळी करण्यासारखं काही विशेष नसलं की पावलं आपसूक वळतात तुळशी बागेकडे. तुळशी बागेतील राममंदिर म्हणजे माझं श्रद्धास्थान! आम्ही जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला यायचो तेव्हा हटकून तुळशीबागेला भेट द्यायचो. खेळण्यांच्या दुकानात ठिय्या मारून बाबांकडे नाहीतर काकाकडे हव्या त्या खेळण्यांसाठी हट्ट धरायचो. माझं आणि तुळशी बागेचं नातं आहे ते तेव्हापासून. आजही तिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं. सार्‍या कोलाहलातून मन:शांतीकडे नेणारी ती प्राचीन वास्तू, सौभाग्य अलंकारांची दुकानं, अगदी चुलबोळक्यांपासून ते खर्‍याखुर्‍या संसारमांडणीपर्यंत सार्‍या गोष्टी मिळण्याचं पुण्यातील एक हक्काचं, आपुलकीचं स्थान! प्रवेश करताच, चंदन, काश्याची वाटी, पूजा साहित्य, देव्हारा, पितळी वस्तू विकणारी ती छोटीशी दुकानं. त्यात वर्षानुवर्षं घुमत असणारा चंदनाचा, उदबत्त्यांचा परिमल, कुठे दागिने, चांदीच्या मांडून ठेवलेल्या वस्तू. झगमगाटापेक्षा साधेपणात जास्त सौंदर्य असतं हे पटवून देणारी आमची तुळशी बाग!

असो. तर गाडीवर टांग टाकली आणि तुळशी बागेत पोहोचलो. (पुण्यात आम्ही दुचाकी, चारचाकी सार्‍यालाच 'गाडी' असं संबोधतो.) दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात सारे व्यवहार चालू होते. खुद्द राममंदिरात सुद्धा दिवे नव्हते. मनाला थोडासा आनंद झाला. सगळीकडे अंधार असतांना, फक्त एका समईच्या प्रकाशात देवाचा गाभारा, मूर्ती अद्वितीय दिसते. रामाचं, दास मारूतीचं दर्शन घेतलं, थोडा वेळ सभामंडपात विसावलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी पुढे झालो. तुळशी बागेतील राममंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या अगदी सुरूवातीस, वर भिंतीवर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं एक विधान लिहिलेलं आहे. ते मी आजवर असंख्य वेळा वाचलेलं आहे पण जेव्हा कधी मी ते पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा तोच आनंद, उत्साह, औत्सुक्य आणि उर्मी अनुभवतो. ईश्वराच्या जवळ जाण्याविषयी, साधनेविषयी त्यात काही अभूतपूर्व असं लिहिलेलं आहे. तो एक गुरूमंत्रच आहे, सोप्या शब्दात मांडलेला!


या बाबतीत माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट अशी. माझी मुलुंडची मावशी आमच्याकडे पुण्याला रहाण्यास आली होती. उषामावशी. त्यावेळेस मी मास्टर्स करत होतो. शिक्षण चालू असल्याने रियाज करण्यास वेळ मिळत असे. मी पहाटे लवकर उठून तानपुरा जोडून रियाज करत बसे. त्या दिवशी सुद्धा तसाच देवघराच्या खोलीत बसलो होतो. राग निवडला होता भैरव! भैरव कमालीचा राग आहे. जितका गोड तितकाच धीरगंभीर! पहाटेच्या वेळेस गाण्याचा हा राग. यातील कोमल रिषभ आणि कोमल धैवताची जादू काही औरच आहे. पुन्हा कोमल रिषभावर आंदोलन आहे. आंदोलन म्हणजे त्या स्वराचं केलेलं गोलाकार आवर्तन! कोमल धैवतावरून पंचमावर उतरण्यातील आणि कोमल रिषभावरून शुद्ध गंधारावर जाण्यातील आनंद हा एक अनुभव असतो. मी गात बसलो होतो. उषामावशीने ते ऐकलं आणि खोलीत माझ्या नकळत ती येऊन बसली. माझी आलापी चालू होती. तानपुर्‍यातून गंधाराची निष्पत्ती अमाप होत होती. त्यात माझा गंधार सुद्धा त्या दिवशी अगदी मिसळून जात होता. प्रत्येक स्वराला एक उंची असते. त्या उंचीचा स्वर बरोबर लागला की आपण म्हणतो frequency match झाली. एखाद्या माणसाशी frequency match होणं म्हणजे अजून काय? स्वर माणसांसारखे असतात. त्यांच्याशी मैत्र जमले की त्या घोळक्यात कधीही एकटं वाटत नाही, एकटं असूनसुद्धा. माझा रियाज झाला आणि मी उठलो. पहातो तर उषामावशी मागेच बसली होती. मला मजा वाटली. तीने सुद्धा तोंड भरून कौतुक केलं आणि त्यापुढे तीने मला जे सांगितलं ते मी कधीही विसरणार नाही. ती म्हणाली

"केदार, परमेश्वर प्राप्तीचा अर्थ शोधायचा म्हणजे काय? तो आपल्यातच लपलेला, रुजलेला आहे. त्याची रूपं असंख्य आहेत. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट पहाशील, अनुभवशील त्यावेळेस तिथे परमेश्वर आहे असं समजण्यात काहीच वावगं नाही. आज तू रियाज केलास. गंधार लावलास. त्या गंधारातून जे सौंदर्य, जो आनंद निर्माण झाला त्यात परमेश्वर आहे हे विसरू नकोस. परमेश्वर असाच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतो."


त्यावेळेस मला कळलं की
frequency match होणं म्हणजे काय? जसा रेडिओ एखाद्या frequency ला लागतो तसच हे. अगदी मनापासून देवाचं दर्शन घेत असता, मनात एखादी इच्छा यावी आणि एखादं फूल मूर्तीवरून टपकन पडावं याचा अर्थ सुद्धा माझ्या मते हाच आहे.

सगळीकडे frequency आहे. ती जिथे match होते तिथे सूर उमटतात, जिथे होत नाही तिथे असूर उपटतात. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं ते विधान मी याच दृष्टीने बघतो. ईश्वरप्राप्तीचा अर्थ शंखचक्रगदाधारी प्रकटणं हा नव्हे, छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वराचा सहवास अनुभवणं आणि त्यावर unbiased विश्वास ठेवणं हा आहे. पुन्हा साधनेला समर्थपण येण्यासाठी सातत्याची जोड हवीच आणि नेमकं हेच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एरवी जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आणि संसार, कामकाज यात स्वत्व हरवून गेलेला मनुष्य एखाद्या स्वत:ला हव्या असलेल्या पण हरवून गेलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा पुन्हा सज्ज होतो यालाही सातत्यच म्हणायचे ना? माझ्या प्रत्येक भेटीत तुळशीबागेतील राममंदिरात जतन करून ठेवलेलं हे विचारधन माझ्या मनावर आनंदघन म्हणून बरसतं आणि मला सातत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतं. स्वामी परमहंस म्हणतात...

"अथांग महासागरात मौल्यवान मोती वैपुल्याने मिळतील, परंतु ते मिळविण्याकरता तुला अचाट साहस लागेल. जरी तुला काही वेळा अपयश आले तरी सागरात मोती नाहीतच असे म्हणता येणार नाही. सातत्याने न खचता प्रयत्नशील राहिलास तर यश खात्रीने तुझेच आहे.

त्यापेक्षाही कष्टतर अनुभव मानवास ईश्वर साधनेबद्द्ल प्रत्ययास येईल. वैफल्याने खचून न जाता तू अविश्रांत प्रयत्नशील राहिलास तर मी विश्वासपूर्वक सांगतो की ईश्वर तुझ्या जवळच येईल.

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे.


तुमचा,
केदार

हाच लेख येथेही वाचता येईल.

Monday, June 13, 2011

मन सुद्ध तुझं!

३-४ दिवसांपासून काहीसं उदास वाटतयं. त्याला काही कारणं आहेत. काही करू नये असं वाटतय. हातून काही विशेष घडत नाहीये. स्विमिंग बंद पडलयं कारण समर कॅंम्प्स चालू आहेत. एकच बॅच असते दिवसभरात आणि ती बॅच कधीकधी चुकते. ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होतो वगैरे... मग काल संध्याकाळ पण तशीच चालली होती. का कोणास ठाऊक 'मारवा' ऐकावासा खूप वाटत होता. स्वत:च गायला बसणार होतो, तानपुरा काढून ठेवला होता पण पुढे त्याचीही इच्छा होइना. कधी कधी self-motivation कमी पडतं. मग youtube वर भीमसेनजींचा 'मारवा' ऐकला. 'बंगरी मोरी' हा त्यांचा प्रसिद्ध छोटा ख्याल. काय एक एक सूर लावलाय पंडीतजींनी! पण त्यामुळे व्हायचा तो परिणाम शेवटी झालाच. अजूनच कातर वाटायला लागलं. कसली तरी हुरहुर जाणवायला लागली. अन इतक्यात काही जुन्या मराठी गाण्यांचे दुवे डोळ्यांपुढे आले. असच सहज बघता बघता 'कुंकू' चित्रपटातील एक गाणं सापडलं. आईला बहूतेक मी काहीसा उद्विग्न आहे हे कळलं असावं. ती सुद्धा माझ्या खोलीत येऊन गेली. अन् तितक्यात streaming संपून ते गाणं लागलं आणि शब्द उमटायला लागले. आई काहीच बोलली नाही फक्त माझ्या पाठीवर एक आश्वासक थाप देऊन हसत हसत कामासाठी बाहेर निघून गेली.

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची ||

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ||


हाताच्या मुठी आपसुक वळल्या. छे... आयुष्यात अचाट दु:ख आहे पण निराशेच्या दलदलीतून खेचून बाहेर काढणारे काही अदृष्य हातही आहेत. आपण फक्त हात पुढे करण्याचा अवकाश...

अन् आज मला खूप बरं वाटतयं. काल पेक्षा खूप बरं! पण वर म्हटल्याप्रमाणे या माझ्या सुधारित मनस्थितीत बर्‍याच जणांचा हात आहे. गीतकार शांताराम आठवले यांचा, संगीतकार केशवराव भोळे यांचा, पेटीवर जिवंत साथ करणार्‍या वसंत देसाई यांचा, शब्द सूर अभिनयातून काळजापर्यंत पोचविणार्‍या मा. परशुराम यांचा आणि एक हात पाठीवरचा...

तुमचा,
केदार

Thursday, June 2, 2011

पाऊस आला...


पाऊस आला की मला दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते. पार्ल्याची माझी शाळा आणि माझं बालपण ही पहिली गोष्ट. मे महिन्याची सुट्टी संपून शाळा पुन्हा चालू व्हायची ती याच सुमारास. घराबाहेर पावसाच्या पाण्याचं तळं व्हायचं. कधी कधी मी रहात असलेल्या सुभाष रोडवर तर गुडघ्याएवढं पाणी असायचं. त्यातून वाट काढत जाण्यास मजा यायची. कधी कधी शाळेला सुट्टी मिळायची त्यावेळेस तर काय धमाल. आम्ही होड्यांचा खेळ खेळायचो. पावसात मनसोक्त भिजायचो. आईची मग हाक यायची. चिखलात माखलेला मी... आई खसखसून आंघोळ घालायची. कधी भजी, कधी वडा, कधी डोसा असं काहीतरी नाविन्यपूर्ण खायला असायचं. ते खायचं आणि पाऊस बघत आतल्या खिडकीला लागून असलेल्या बिछान्यावर पडून रहायचं.

दुसरी गोष्ट म्हणजे माझं पुण्यातील डी.एस.के. विश्वमधील घर. आधीच ते डोंगरांनी वेढलेलं. आपण जरी हातांनी झाडांना, रोपांना कितीही पाणी दिलं, तरी पाऊस प्यायल्यानंतरचं त्यांच रूप वेगळच दिसतं. तेच रूप समोर चारीही दिशांना दिसायचं. सभोवार सारे हिरवे-पोपटी छटा ल्यालेले डोंगर, तुडुंब भरलेले खडकवासला, सगळीकडे पसरलेलं धुकं. त्यात संध्याकाळ झाली की धुक्यातून लागत जाणारे दिवे समोर अंधूक अंधूक दिसायचे. सारं पुणचं समोर पसरलेलं. पहाणार तरी किती आणि कुठे? निसर्ग असा धुक्याची दुलई लेऊन शांत पहुडला असता आपणही अंगावर मऊ दुलई घेऊन पडून रहायचं. कुणाची कटकट नाही, गडबड नाही, आपणं आपले आणि आपलं कुणीतरी... आज मी त्यापासून दूर आहे पण पाऊस आला की त्या सार्‍या गोष्टी पुन्हा स्मरतात. म्हणावसं वाटतं...

ए आई, मला पावसात जाऊ दे...
एकदाच ग भिजूनी मला चिंबचिंब होऊ दे...

ती निरागसता आता शक्य नाही. माझ्यातील तारुण्याने माझ्यातलं बाल्य माझ्यापासून हिरावून नेलयं. पण तरीही लहानपणी पाहिलेली एक जाहिरात नेहमी आठवते. त्यात ऊंचावरून फेसाळत पडणारा एक धबधबा आठवतो, आकाशात उडणारे पक्षी आठवतात, हिरवागार माळ आठवतो आणि मग मनात त्या जाहिरातीतील शब्द रुंजी घालायला लागतात...

चल मन् चल उस और चले जहाँ होता ह्रदय प्रफुल्लित भी
जहाँ पंख पसारे बिना भय के खुले गगन मे उड सके मन भी...

सर्वांना पहिल्या पावसाच्या शुभेच्छा!

तुमचा,
केदार