Thursday, May 24, 2012

'पाऊसवाट - एक कोलाज' पुस्तक प्रकाशन


मित्रांनो, 

आयुष्यातले काही क्षण मोहोरलेले असतात. असाच एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात ३ जून रोजी येत आहे. माझ्या प्रथम पुस्तकाचे प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे ३ जूनला होत आहे. त्याचा हा वृत्तांत. 

आजच्या या धावपळीच्या स्पर्धायुगात कुठेतरी मनाचा कोंडमारा होणं ही नित्याचीच बाब झाली. ही होणारी कोंडी आणि घुसमट कमी करण्यासाठी प्रत्येक माणूस दिवसागणिक काही प्रयोग करतही असतो. आयुष्यानं घालून दिलेल्या कुंपणापलिकडे उडी मारायची आहे पण ते साधत नाही अशा संदिग्ध अवस्थेत तोल सांभाळत तारेवरची कसरत करत असणार्‍या अशाच एका व्यक्तिच्या विचारांचा कोलाज म्हणजे 'पाऊसवाट' हे पुस्तक. मनात आलेले विचार कुठल्याही वेगळ्या रूपामध्ये परिवर्तित न करता आहेत तसे या पुस्तकात उतरलेले आहेत.

जे आयुष्य वाट्याला आलेलं आहे ते या दुष्टचक्रातून सुटका नाही म्हणून परिस्थितीला दोष लावत नि:संकोच जगायचं याला लेखकाचा आक्षेप आहे. त्या पलिकडेही काहीतरी उदात्त असेल या आशेतून आणि विचारातून ही 'पाऊसवाट' फुललेली आहे.


'पाऊसवाट'. या नावातचं ही वाट कशी असावी याचं उत्तर मिळतं. पाऊस म्हणजे जीवन. जीवनाची वाट म्हणजे पाऊसवाट. ही वाट कितीही अडचणीची, गुंतागुंतीची असली तरी लोभस वाटते. याचं कारण आपण पाहिलेली स्वप्नं या वाटेवर पावलापावलांवर विखुरलेली असतात. ती गोळा करत पुढे जाण्यात अवीट गोडी असते. एखाद्या हमरस्त्याला लागल्यानंतर त्या गर्दीच्या ओघात किंवा मधमाश्यांचं मोहोळ फुटावं अशा फुटलेल्या कुठल्यातरी जमावाच्या पावलांखाली सारं चिरडून जाण्यापेक्षा आपण आपली वाट निवडलेली बरी असं लेखकाला वाटतं. आणि म्हणूनच उन्हाची काहिली असह्य झाली, सगळीकडे रखरखाट, सारं नीरस, शुष्क, निर्द्रव;निव्वळ कोरडेपणा आसमंतात भरून राहीलाय आणि अशा वेळेस अचानक पावसाची एक सर यावी; ते साक्षात्कारी थेंब आपल्या चेहर्‍यावरून ओघळू लागले आणि ती शीतलता मनात उतरली की जो आनंद होतो तोच या वाटेवर अपेक्षित आहे.

प्रेम, विरह, नातेसंबंध, प्रयत्न, देव अशा विविध विषयांवरील कथा, स्फुटं, लेख, कविता यांचा कोलाज असलेले केदार केसकर यांचे 'पाऊसवाट' हे ललित साहित्यातील पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे रविवार, दिनांक ३ जून २०१२ रोजी, पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात प्रकाशित होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. विनया देसाई करणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर पुस्तकातील काही लेखांचे वाचन होईल. 

प्रकाशनाध्यक्ष: ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक, जागतिक मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष मा. द. भि. कुलकर्णी
शुभहस्ते: सुप्रसिद्ध संगीतकार मा. आनंद मोडक
विशेष उपस्थिती: मा. डॉ. शोभा अभ्यंकर

स्थळः एस. एम. जोशी सभागृह, 
गांजवे चौक,
पत्रकार भवना शेजारी. 

वेळः

सायंकाळी ६:०० ते ६:३० - कॉफीपान
६:३० ते ८:०० - मुख्य कार्यक्रम

या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून माझा आनंद द्विगुणित राल अशी आशा मला आहे. 

तुमचा, 
केदार