Tuesday, February 28, 2012

दोष ना कुणाचा...

डर्बनच्या समुद्रकिनार्‍यावर फिरत असतांना किंवा सनबाथ घेत निवांत पहुडलेलं असतांना एक गोष्ट आवर्जून पहावयास मिळते. इथे असणारे ब्लॅक्स कधी सनग्लासेस तर कधी आइसक्रीम विकण्यासाठी हातात ते डबोलं घेऊन भर उन्हात फेरीवाल्यासारखे अखंड फिरत असतात. इथली गरिबी आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असमानता बर्‍याच अंशी भारताशी मिळती जुळती आहे. असो...

सांगायचा मुद्दा इतकाच की ते तसं फिरत असतांना पाहून मन भरून येतं. शेवटी 'पापी पेट का सवाल आहे' असं म्हणत मनाची समजूत करून घेतली, तरी एक सवाल मनात तसाच अबाधित आणि अनुत्तरीत राहातो. देवानी हे पोट दिलंच कशासाठी? ह्म्म...तिथेच तर खरी गोम आहे. शेवटी हे असं वणवण फिरायचं ते कशासाठी? पोटासाठीच ना?

पोटाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मीही मनाचा कौल झुगारून पोटाची भूक मिटवण्यासाठी या गराड्यात सामील झालो. तेव्हापासुनचं सारं काही लख्ख आठवतयं. माझी झुंज सुरू आहे ती तेव्हापासून. सकाळ होताच पायाला चक्र लावलेल्या पिसाटासारखा घराबाहेर पडतो. महिनाअखेरी मिळणार्‍या पगारावर माझा पिंड पोसतो. निव्वळ पोटासाठी. हे पोटच नसतं तर किती बरं झालं असतं! अशी काही पोटं माझ्या कर्तबगारीवर भरलेली ठेवायची जबाबदारी माझी! प्रत्येकाचा पिंड वेगळा तो या पैशांवर पोसला जातो. पण त्याच बरोबरीने मनाची, बुद्धीची भुक काय असते ते सुद्धा मला माहितेय आणि देवानी ती भूक शमविण्यासाठी मला संधी दिली म्हणुन मी कृत़ज्ञसुद्धा आहेच. पण ही अशी वणवण फिरणारी माणसं दिसली की एक क्षण वाटून जातं... यांच्या आयुष्याचं फलित काय?

झालं... सनबाथ घेऊन झाला... किनार्‍यावरील भिजलेल्या वाळूवरून पायांचे क्षणभंगुर ठसे उमटवत घरी चाललो...मन मनाची समजूत घालत होतं...

"जाऊ दे केदार..., जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही... ज्याचे त्याचे भोग... ज्यानी त्यानी भोगून संपवायचे..., अरे, संतांना, देवाला हे भोग सुटले नाहीत... तुझी माझी काय कथा? त्या गीतरामायणातल्या गीतातला भावार्थ आता तरी भिडतोय का मनाला?"

"भिडतोय कसला... बोचतोय...चांगलाच बोचतोय..."

बहुतेक अशाच एका उद्विग्न क्षणी प्रभु राम भरताला म्हणाले असावेत...

"दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा...

दोष ना कुणाचा..."

तुमचा,
केदार