Sunday, May 29, 2011

ह्यूस्टन डायरी!

मी मागील लेखात लिहीले होते "आयुष्य कधी कोणते रंग दाखवेल काही सांगता येतं नाही. म्हणून दु:खासाठी स्वत:ला तयार करण्यासोबत, सुखाचं स्वागत करण्यासाठी कायम तयार रहाणं हे ही तितकचं योग्य." माझी ह्यूस्टनची सफर हे वाक्य सत्य आहे याची प्रचिती देणारी ठरली. तीच ही ह्यूस्टन डायरी. असच लिहावसं वाटलं. मन मोकळं करावस वाटलं. मिळालेला आनंद वाटावासा वाटला. इतकच!

मागील शुक्रवारी मी भारतात परत आलो. पु.लं.नी "म्हैस" या त्यांच्या कथेत म्हटल्याप्रमाणे "परदेशी जातांना मी का चाललोय आणि भारतात परत येतांना मी इथे का परत आलोय" अशी काहीशी द्विधा मनस्थिती माझी होती; बहुधा जेटलॅग असावा. मुंबई विमानतळावर माझं सामान येण्यास जवळ जवळ १ तास लागला. ३:०० ला पहाटे उतरलेला मी, ५:०० ला बाहेर आलो आणि त्यानंतर लगेचच पुण्याकडे रवाना झालो. तिथल्या प्रसन्न, थंड हवेतून एकदम मे महिन्याच्या उन्हाळ्यात पडण्याची ही माझी पहिली वेळ नव्हे. जो मानसिक त्रास व्हायचा तो झालाच. मी स्वप्नातून वास्तवात आलो होतो. "पहाटेचा गार वारा" वगैरे कवि-कल्पना हवेत विरून गेल्या. एक दोनदा तर ड्रायवरनी हॉर्न वाजवल्यावर मी चक्क दचकलो. एक दीड महिना माझा आणि हॉर्नचा तसा काही संबंध नव्हता. असो...

ह्यूस्टन हे अमेरिकेतील दक्षिणेकडचे गाव, टेक्सास प्रांतातील, मेक्सिकोच्या बॉर्डरवर असणारं, खूप स्पॅनिश लोकसंख्या असणारं, प्रशस्त. माझा ह्यूस्टनला जाण्याचा योग केवळ कामामुळे आला. पण ह्यूस्टनने काही इतक्या सुंदर आठवणी दिल्या आहेत की त्या विसरणं शक्य नाही. मी, प्रसन्न आणि शिवम. आमचा छोटासा पण मस्त ग्रूप. ग्रूपमधील सार्‍यांची तोंडं विरुद्ध दिशांना पण मस्ती मात्र एकत्र, काम एकत्र आणि मन लावून. त्यामुळे कोणालाच कधीच कामाविषयी सूचना कराव्या लागल्या नाहीत. अगदी योगायोगानी ही मंडळी भेटली आणि काही दिवसातच अगदी जवळची झाली. स्वत:ची दु:ख उघडपणे मांडू लागली. मलाही त्यांच्याशी बोलतांना हलकं वाटू लागलं. सोमवार ते शुक्रवार कसे जायचे ते ठाऊक नाही. मग शनिवारी दुपारपर्यंत झोप झाली की शिवम हॉटेलवर आम्हाला घेण्यासाठी यायचा. मग लंचला कधी इटॅलिअन, कधी इंडीयन, कधी मेक्सिकन, कधी सब-वे मधलं माझं लाडकं टुना सब, कधी फ्राईड चिकन, कधी फक्त एखादा बर्गर तर कधी बार्बेक्यू चिकन. खाण्यापिण्याची रेलचेल असायची. काहीही खायचो पण कधीही त्रास झाला नाही. उत्तम हवा हे कारण असावं.

मी रहात होतो ते Extended Stay हॉटेल अगदी माझ्या मनाजोगतं होतं. त्यात अपार्टमेंट हॉटेलच्या सार्‍या खूबी होत्या. म्हणजे अगदी इस्त्री पासून ते कुकींग रेंजपर्यंत सारं काही. बिछाना अगदी प्रशस्त. रात्री पाठ टेकली की डाऊनटाऊनमधील दोन टॉवर सदैव समोर चमचमत असायचे. माझ्या एकटेपणाला त्यांची मूक सोबत होती. रूममध्ये एक लेझी चेअर सुद्धा होती. तीत ऐसपैस बसून सूप वगैरे पिण्यास मजा येत असे. पुन्हा अपार्टंमेंटला dedicated swimming tank होता.

माझं अमेरिकेतील घर

ऑफीसमधून हॉटेलवर आलो की मी स्विमिंग न चुकता करत असे. १८:१५ ला ऑफिसमधून घरी आलो की १८:३० ला स्विमिंग टॅंक. तिथे ३०-४५ मिनटं पोहायचं. कधीही हा क्रम चुकला नाही. मग रूममध्ये जायचं. गरम पाण्यानी टब भरायला लावायचा आणि आंघोळ करून मस्त फ्रेश व्हायचं. कामाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जायचा.


अपार्टमेंटमधील स्विमिंग टॅंक

त्यानंतर मी आणि प्रसन्न फिरण्यासाठी जायचो. घराजवळ 'फीएस्टा' म्हणून मोठा मॉल होता. 'सुपर टारगेट' नावाचं सुपर मार्केट होतं. तिथे नुसतं फिरलं तरी दोन तास निघून जायचे. मी तिथून संध्याकाळसाठी काहीतरी विकत घेत असे. कधी फक्त दूध, फळं, प्रून्स, पीचेस. माझा सिगारेटचा ब्रॅंड होता 'मार्लबोरो स्पेशल ब्लेंड'. एखादं ते पाकिट. अशी छोटी मोठी खरेदी करून आम्ही पुन्हा हॉटेलवर परतत असू.

सुपर टारगेट मॉल

तिथे एक 'फ्रेंचीज' म्हणून रेस्तंरॉं चेन आहे. तिथलं फ्राइड चिकन आणि गंबो सूप म्हणजे केवळ आनंदाची पर्वणी. 'गंबो'त काय असतं हे मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहीलं आणि मी सुद्धा जाणून घेण्याचा विशेष प्रयत्न केला नाही.

फ्रेंचीज्

शिवमच्या गाडीतून जातांना kaskade and deadmau5 ची गाणी ऐकत जाणं म्हणजे आमच्यासाठी सुख होतं. त्यात प्रसन्न कधीकधी एकदम नाचायला सुरूवात करायचा. हळूहळू सारेच जण ती गाणी ऐकण्यात बेहोश होऊन जायचे. एक गाणं जे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही ते म्हणजे "I remember" by kaskade and deadmau5.


प्रसन्न त्याच्या रूममधून कधीतरी रात्री फोन करून मग ई-सकाळ वाचून दाखवायचा. मला खरतरं त्या सार्‍या त्याच त्याच बातम्यांपासून दूर रहायचं होतं. पण तो इतक्या मजेशीरपणे सांगायचा की मग मी सुद्धा माझ्या रूममध्ये ई-सकाळ उघडून बसायचो.

पहिल्या रविवारी मी आणि शिवम डाऊनटाऊनला गेलो. तिथे लहान मुलांचा समर कॅंप भरला होता. सगळी गर्दी. रंगीबेरंगी पोषाखातील गोड मुलं. वेगवेगळे वेष केलेली. डाऊनटाऊन ऍक्वेरीअम पहाण्यास जायचं होतं. त्या आधी फिरता फिरता मला हार्ड रॉक कॅफे दिसला. बरीच वर्ष तिथे जायचं होतच. भारतात ते आजवर शक्य झालं नाही. मला रॉक संगीत तुफ्फान आवडतं. आम्ही पोटेटो स्किन्स आणि चीज चिकन मागवलं आणि गाणी ऐकत, गप्पा मारत वेळ छान घालवला. दुर्दैवाने लाइव बॅंड ऐकण्यास मिळाला नाही. पण तरीही हार्ड रॉक कॅफे ला जाता आलं हे खरं सुख.

ह्यूस्टन डाऊनटाऊन हार्ड रॉक कॅफे

ह्यूस्टन स्कायलाईन

कामाचा ताण होताच. तो दिवसेंदिवस वाढतही होता. पण या सार्‍यातून वेळ काढून आम्ही खूप फिरलो. गॅल्वेस्टन आयलॅंड, हर्मन पार्क ची आमची सफर मस्तच झाली. गॅल्वेस्टनला शिवमचा एक मित्र रहातो. तिथे त्याच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो. अपार्टमेंटमध्ये अप्रतिम आणि ऊंची स्पा होता. त्यात नंतर जायचं असं सर्वानुमते ठरलं. मग आम्ही बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. त्याआधी फेरीतून गॅल्वेस्टन पलिकडील एका बेटावर जाऊन आलो. फेरीचा अनुभव फारच वेगळा होता. समुद्रात दिसणारे डॉल्फिन्स, जेली फिश, मधूनच लांबवर दिसणारा एखादा दीपस्तंभ आणि डोक्यावर अविश्रांत उडणारे देखणे सी-गल्स यामुळे ती फेरी अविस्मरणीय झाली.

गॅल्वेस्टन आयलॅंड

सी-गल्स

प्रसन्न आणि शिवम

फेरी

Gulf of Mexico लहानपणी पुस्तकात वाचलं होतं पण त्या अथांग समुद्रात डुंबण्याची मजा काही औरच होती. अजस्त्र लाटा किनार्‍यावर येत असतांना त्यांच्यातील शक्तीची आणि समुद्राच्या गहीरेपणाची कल्पना येत होती. थोडीशी भिती वाटत होती पण तरीही समुद्रात खूप पुढपर्यंत आम्ही गेलो. जितके पुढे जाण्याचा प्रयत्न करू तितक्याच वेगानी आम्ही परत किनार्‍यावर फेकले जात होतो. पण तो अनुभव छान होता.

गल्फ ऑफ मेक्सिको

गल्फ ऑफ मेक्सिको

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

भूक लागली तसे आम्ही एका चायनीज रेस्तरॉंमध्ये गेलो. तिथे चिकनपासून बेडकापर्यंत सारं काही यथासांग मांडून ठेवलेलं होतं. मी बेडूक खाल्ला हे मला आता सांगण्यास कसंतरीचं वाटतयं. पण आयुष्यात सगळ्या गोष्टींचा एकदा तरी आस्वाद घ्यायचा होताच. शिवमच्या मित्राने आणि मित्राच्या बायकोने अतिशय प्रेमाने आमचं आदरातिथ्य केलं.

हर्मन पार्क ही ह्यूस्ट्नमधली जॅपनीज बाग. तिथे चेरी ब्लॉसम पहाण्यास मिळेल या आशेवर तिथपर्यंत गेलो. चेरी ब्लॉसम पहाण्यास मिळाला नाही पण तरीही बाग अत्युत्तम होती. मोठा लेक, त्याच्यात बदकं, सारस पक्षी, बाजूने सगळी फुलं, दूरवर पसरलेली हिरवळ. मजा आली. तिथे बॅले नृत्याचा कार्यक्रम होणार होता.


बॅले

'बॅले'तील कलाकार

तसेच काही काळ थांबलो. बॅलेची तिकिटे घेऊन सभागृहात जाऊन बसलो. ओपेरा संगीताच्या पार्श्वभूमीवर चालू असणार्‍या त्या नृत्याने पश्चिम संस्कृतीचे रंग अलगद उलगडले. संध्याकाळ होत चाललेली, अंधूक दिवे लागत चाललेले अन् अशा कातरवेळी मनात प्रेमासाठीची आर्तता निर्माण करणारा तो नृत्यप्रकार पाहून मन काहीसं हळवं झालं. त्यातील सारेच कलाकार एकापेक्षा एक सरस होते. तिथेच मग एक हॅमबर्गर खाऊन आणि स्लश-पपी पिऊन आम्ही घराचा रस्ता धरला.

हर्मन पार्क

हर्मन पार्क

माझा तिथल्या ऑफिसमधील अमेरिकन मित्र, स्टीव. अत्यंत गप्पिष्ट. ह्या माणसाने खूप मजा करविली. मी अमेरिकेला पहिल्यांदाच आलो आहे हे कळल्यावर तर त्याच्या उत्साहाला पारावर उरला नाही. सतत अमेरिकन संस्कृतीतील काहीतरी सांगत राहीला. दाखवत राहीला. देत राहीला. त्याला माझं नावं बोलता यायचं नाही. प्रेमाने तो मला केडी म्हणायचा. एक दिवस ऑफिसनंतर मी हॉटेलवर गेलो असतांना, हा त्याच्या गर्लफ्रेंडला आणि शिवमला बरोबर घेऊन मला घेण्यासाठी आला. मला आश्चर्य वाटलं. मला म्हणाला, "गाडीत बस". मी बसलो. कुठे चाललोय हे कुणीच सांगायला तयार नाही. त्याची गाडी मस्त होती. मून रूफ उघडून आकाशाकडे पहात, 'बोनोबो'ची गाणी ऐकत वेगाने जाण्यास मजा येत होती. बराच वेळ झाल्यानंतर त्याने एका स्टेडीयम समोर गाडी थांबविली. मला काही कळेना. मग त्याने सांगितले. मी त्याच्याकडे कधीकाळी बोललो होतो, बेसबॉलच्या मॅचबद्द्ल. अमेरिकेत जवळजवळ सार्‍यांनाच बेसबॉलचं वेड आहे. स्टीवने आमच्यासाठी त्याचे पासेस घेऊन ठेवले होते. मॅच होती ह्यूस्टन आणि शिकागो यांच्यामधील. ते प्रशस्त स्टेडीअम पाहून मी चक्रावून गेलो होतो. स्टेडीअमवर बसून लाइव मॅच पहाण्याचा माझा तो पहिला प्रसंग. मॅचनंतर तो आम्हाला "Tea and Tapioca" मध्ये घेऊन गेला. तिथे मी cold coconut tea प्यायलो. माझी एकच चुक झाली म्हणजे मी large tapioka मागितलं. त्याचे दाणे फुलून इतके मोठे झाले के पुढे पिता येईना. आता पुढील वेळेस लक्षात ठेवीन. एक दिवस स्टीव आम्हाला Thor 3D बघण्यासाठी घेऊन गेला. First day first show असूनही गर्दी फार दिसत नव्हती. ते सारं बघून मला काहीसं अजब वाटलं. टिकेटींग मशीनसमोर आम्ही उभे राहीलो आणि टिकेट्स काढली. ना धक्काबुक्की, ना त्रास. पुन्हा आपल्याला हवे त्या ठिकाणी बसायचे. सीट नंबर पद्धत नाही. पण सारं सुरळीत. आवाज नाही, गोंधळ नाही. Thor 3D हा एक वेगळाच अनुभव होता.

मी आणि स्टीव

ह्यूस्टन आणि शिकागो मधील बेसबॉल मॅच

'नासा'

नासा- माझी अमेरिकेतील शेवटची संध्याकाळ - पार थकलो होतो

मुळात ज्या कामासाठी गेलो होतो ते काम यशस्वी झालं हे सगळ्यात महत्वाचं. पण शेवटच्या क्षणापर्यंत इतकं काम होतं की शेवटी मला ऑफिसमधूनच तडक विमानतळावर जावं लागलं. किमान ४ तास आधी विमानतळावर पोचणं गरजेचं असूनही मी संध्याकाळी ५:०० पर्यंत ऑफिसमध्येच होतो, रात्री ८:३० ची फ्लाइट. मग मात्र किंचित धाकधुक वाटायला लागली. शेवटी सार्‍यांचा निरोप घेऊन मी टॅक्सीत बसलो. माझ्या बॅग्स उचलून शिवम आणि स्टीव दोघेही मला बाहेर पोचविण्यासाठी आले होते. टॅक्सीत मी बसेपर्यंत दोघेही तसेच उभे होते. शिवमबरोबर एक शेवटची सिगारेट मारली आणि त्या दोघांना जड मनानी परतीचा हात केला. टॅक्सीचं दार बंद झालं आणि क्षणभर मनात विचार येऊन गेला, "च्यायला, काय जिंदगी आहे! कुठे जिवाभावाचं कोण भेटेल काही सांगता येत नाही. सारी भूमी खरतरं अखंड आहे, मग सीमारेषा आपणच का आखल्यात?" ह्म्म्म्म....


माझी कंपनी - शेवटचा दिवस

निघालो तो नेमका हेवी ट्रॅफिकच्या वेळेस. कॅब ड्रायवरला मी माझ्या फ्लाइटची वेळ सांगितल्यावर तो ही क्षणभर चरकला असावा. काहीतरी मनात योजल्यासारखा वार्‍याच्या वेगाने निघाला आणि कुठल्यातरी निराळ्याच रस्त्यावरून जाऊ लागला. आता क्षणभर मी चरकलो. काही बोलणार एवढ्यात मला त्याच्या पुढील सीटवर ठेवलेलं बायबल दिसलं. "अरे, हा अध्यात्मिक दिसतोय" अशी मनाची समजूत करून घेत मी नि:संशय डोळे मिटले. सकाळपासून चालू असलेल्या धावपळीमुळे कधी झोप लागली हे कळलं नाही पण बरोबर त्यानंतर अर्धा तासात मी एअरपोर्टवर होतो हे खरं. पटापट बॅग्स उचलल्या आणि चेक-इन साठी निघालो. १५ तासांचा ह्यूस्टन ते दोहा प्रवास अतिशय छान झाला. मी जाण्याआधी मला कतार एअरलाइन्स दिल्याबद्द्ल मी कुरबुर केली होती. तेव्हा माझ्या ट्रॅवलडेस्क मधल्या मित्राने मला ही ५ स्टार एअरलाइन आहे असं सांगितलं होतं. अर्थातच मी त्यावर फार विश्वास ठेवला नव्हता. मुंबई-दोहा विमानप्रवास खत्रुड झाला. मी ब्लॅंकेट मागितल्यावर ब्लॅंकेटस संपली आहेत असं मला सांगण्यात आलं होतं. पुन्हा माणसं सगळीचं अद्वितीय. माझ्या बाजूच्या माणसाचा इमिग्रेशन फॉर्म मी भरून दिला. एअरहोस्टेस गोळ्या घेऊन आली, तर बचका भरून गोळ्या घेणारे असंख्य महाभाग. असो... यावर अधिक भाष्य नको.

तर सांगायचा मुद्दा मुंबई-दोहा विमानप्रवास खास झाला नाही. मी माझ्या अविश्वासावर ठाम होतो. मी जिंकलो असं वाटत असतांनाच मी दोहा-ह्यूस्टन फ्लाइटमध्ये पाय ठेवला आणि सारं चित्रच पालटलं.


ह्यूस्टन - दोहा प्रवासासाठी सज्ज होत असलेलं माझं फ्लाइट

एखाद्या ५-स्टार सारखी सरबराई बघून मी गोंधळलो. गेल्यागेल्या हॉट टॉवेल, गोळ्या, फ्रेशनेस नॅपकीन्स, ब्लॅंकेट्स, इअर फोन्स, वेलकम ड्रींक कशाची म्हणून ददात नव्हती. पुन्हा फ्लीट अगदी नवीन आहे हे जाणवत होतं. टीवी वर २०० च्या वर चॅनेल्स. असंख्य गाणी. ४०००० फूट उंचीवर, गरम कॉफीचा कप हातात असतांना, बडे गुलाम अली खॉं साहेबांचा 'कोमल रिषभ आसावरी' ऐकणं हे काय सुख आहे ते मला विचारा. थोडक्यात, कतार एअरलाइन्स खरोखरच चांगली आहे यावर माझा विश्वास बसला. पण पुन्हा परतीच्या प्रवासात दोहा-मुंबईची एअरलाइन फ्लीट पाहून यावेळेस थोडं वाईट वाटलं. हा भेद का? प्रश्न मनात असंख्य वेळा डोकावून गेला. उत्तर मात्र मिळालं नाही. मुंबईला पोचल्यावरची कहाणी सुरुवातीलाच सांगितली आहे. एअरपोर्टवर योग्य जागी पार्किंग केल्याची शिक्षा म्हणून २५० रुपये पार्कींग फी भरली आणि पुण्याच्या दिशेने निघालो.

सांगण्यासारखं अजून खूप आहे. पण काही नाती, गोष्टी, प्रसंग शब्दातीत असतात. त्यांना मनात जपावं हेच खरं. दिवस पाखरासारखे भुरर्र उडून गेले होते. आता पुन्हा ट्रॅफीक, धूळ, रस्त्यावर बिनधास्तपणे थुंकणारे थुंकसंप्रदायी, तीच घालमेल हे सारं डोळ्यांपुढे नाचू लागलं होतं. पण त्याच बरोबरीने या काहीशा कुरूप वास्तवतेला सुंदर करणारी आणि डोळ्यांपुढील अंधारात मिणमिणत असणारी कधीकाळी वाचलेली कुसुमाग्रजांची कविता मनात पिंगा घालत होती.

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

तुमचा,
केदार

4 comments:

साधक said...

छान वर्णन आहे. फोटो सुंदर आहेत. ह्यूस्टन सुंदर दिसते आहे. मुख्य म्हणजे तुम्ही मनमुराद आनंद घेतलात.

Kedar said...

धन्यवाद साधकजी! आपल्या ब्लॉगवर मी गेलो होतो. तेथे 'मौन' हा शब्द वाचून काय उमगायचं ते उमगलं. आज खरी गरज आहे ती त्याचीच. पुनश्च आभार! अधून मधून ब्लॉगला जरूर भेट देत रहा.

लोभ असावा,
केदार

Mohit said...

apratim varnan... on site jaun kamachya vyapat asunahi itaki site visits.. manala pahije..

Kedar said...

Thanks Mohit! Punha jaroor bhet dya.

Kedar