Tuesday, October 26, 2010

झोंबी

'झोंबी' वाचून वाटलेलं थोडसं इथे लिहीतोय. वाचली नसेल तर जरूर वाचा.

झोंबी ही 'आंदू'ची आत्मकथा. अगदी डोळ्यांनी पाहीलेली, रसरसून जगलेली आणि भोगलेली. वाचतांना अंगावर काटा उभा राहील इतकी प्रखर. हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडून आपला ठसा उमटवावा असं काही ठरवून आंदू या जगात आलेला नव्हता. पण जे काही चाललयं ते चुकीचं आहे हे इतकं कळण्याइतपत जाण त्याच्याकडे होती. ती नसती तर आजचा आनंद यादव साहित्यिक म्हणून नावारूपास आला नसता.

ही कथा आहे एका पोराची. शिक्षणाचा जिथे मागमूस नव्हता अशा घरात आलेल्या या साहित्याच्या मुळीला खतपाणी पडलं ते माराचं, असह्य उपेक्षेचं आणि दारिद्र्याचं. आज ह्या मुळीचा वृक्ष झाला आहे हे 'झोंबी' वाचल्यानंतर लक्षात येतं. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करतांना मनाचा हळवेपणा आणि भळभळणारी जखम खोलवर कुठेतरी जिवंत झर्‍यासारखी चिरंतन वाहत असलेली जाणवते. साधी सरळ लेखनशैली आपल्याला एका वेगळ्याच विश्वात सहज घेऊन जाते. त्यासाठी शब्दबंबाळ उक्तींची गरज लेखकाला भासत नाही. त्या कल्लोळविश्वात मशगूल होण्याइतपत आपल्या मनाची तयारी मात्र होऊ शकत नाही...घुसमट घुसमट होते आणि मासा पाण्याबाहेर आणि पुन्हा पाण्यात जाण्यासाठी तडफडेल तसे आपण पुन्हा आपल्या संरक्षित विश्वात येण्यासाठी तडफडतो. एकाच वेळेला वेदना आणि वेदनेला तोंड फोडणारी अदम्य जिद्द देऊन जाणारी ही 'आंदू'ची आत्मकथा म्हणजे कादंबरी नव्हे. आंदूच एका ठिकाणी म्हणतो...

ही आहे गोष्ट....माणसं माणसांना सांगतात तशी....

केदार

No comments: