Tuesday, September 21, 2010

अप्पा...एक मुक्त चिंतन

माझे आजोबा कै. रामदास रामकृष्ण कोरान्ने हे बडोद्यातील एक प्रख्यात, प्रतिभावान आणि निष्ठावान शिक्षक. आम्ही त्यांना 'अप्पा' म्हणायचो. शेक्सपीअर आणि गडकरी त्यांना मुखोद्गत होते. काही महिन्यांपूर्वी मी इंग्लंडला कामानिमित्त जाऊन आलो. त्याच वेळी पुण्यात त्यांचा स्मृतीदिन आप्तांनी, स्नेहीजनांनी साजरा केला. मी तेव्हा नव्हतो. त्यांना जाऊन आज १० वर्ष झाली. त्यांच्यावर काहीतरी लिहावं असं फार वाटत होतं. तेच माझं लिखाण आज ब्लॉगवर प्रकाशित करत आहे. आजोबा म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराची जागा नेहमीच असेल पण त्याहीपेक्षा अशी अनेक माणसं असतात ज्यांच्या कार्याचा आणि प्रतिभेचा समाजाला परिचय होत नाही. अशा एका व्यक्तीचा परिचय तुम्हाला व्हावा म्हणून हा प्रयास!
----------------------------------------------------------------------------------



आज मी काहीसा अस्थिर आहे. शेक्सपीअरच्या भूमीत रस्त्यावरून चालत असता अचाट विचार डोक्यात येतायत. "Uneasy lies the head that wears a crown" ही ओळ पुन्हा पुन्हा मनात पिंगा घालतेय. वेस्टमिनिस्टर ब्रिजच्या खालून लंडन फेरीनी जात असता,

Earth has not anything to show more fair,
Dull would he be of soul who could pass by,
A sight so touching in its majesty!!

ह्या सॉनेटची अनुभूती येतेय. कुठेतरी आपलासा वाटणारा पण काळाच्या ओघात हरवून गेलेला थरथरता पण तजेलदार, सुस्पष्ट पण मायेनी ओथंबलेला आवाज माझ्या जवळ जवळ येत चाललाय आणि अचानक माझ्या अगदी कानाशी येऊन पोचलाय. संध्याकाळच्या वेळेला समोर चमचमणारं लंडन, झगमगीत कपडे घालुन आजुबाजुला झकपक वावरणारी माणसं, पिझ्झा, बर्गर, डोनट, रोस्टेड कॉफीचे मनमोहक वास, पर्सी स्लेजचं माहोल धुंद करणार एखादं गाणं आणि एकूणच प्रसन्न, आकर्षक पण अपरिचित अशा वातावरणात कुठून तरी धीरगंभीर आवाजातला

श्रीराम राम रघुनंदन राम राम

असा एक आपुलकीचा आश्वासक स्वर दाही दिशा कापत यावा आणि थंड वातावरणात क्षणभर का होईना आत्मिक ऊब निर्माण व्हावी अशी काहीशी मनाची अवस्था झालीय. प्रत्येक पावलागणिक एक नवा विचार जन्म घेतोय आणि अनंतात विरून जातोय. तानपुर्‍याच्या चारही भिन्न तारा एकजीव होताच जसा आपपरभाव रहात नाही तसेच माझे विचार भिन्न दिशांनी वहात एकत्र येत एकच सूर अंतरंगातून उमटतोय.

आज तुमचं स्मरण.
तुमच्या मायेचं स्मरण.

तुमच्यातील ह्रषीतुल्य गुरूचं स्मरण.
तुमच्यातील शिष्याचं स्मरण.

तुमच्या गुरूवरील विश्वासाचं स्मरण.
तुमच्या आत्मविश्वासाचं स्मरण.

तुमच्या स्वाभिमानाचं स्मरण.
तुमच्या ज्ञानाचं स्मरण.
तुमच्या कर्मनिष्ठेचं स्मरण.
तुमच्या धर्मनिष्ठेचं स्मरण.

तुमच्या अलौकिक कर्तृत्वाचं स्मरण.
तुमच्या मर्मभेदी वक्तृत्वाचं स्मरण.

तुमच्या कणाकणांत भिनलेल्या नामाचं स्मरण.
तुमच्यातील रामाचं स्मरण.

मी स्वत: पाहीलेले आणि आईकडून ऐकलेले मला ज्ञात असलेले तुमचे काही पैलू माझ्या शक्तीनुरूप शब्दबद्ध करण्यासाठी बसलोय खरा, पण जे व्यक्तीमत्व रेखाटायचं त्याची व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्याच्यापुढे शब्द थिटे पडणारच. म्हणुनच उणेपणं राहीलं तर ते साहजिकच माझं. हे एक मुक्त चिंतन!

"I am not a beggar" या खणखणीत शब्दांपासून सुरू होणारं हे चिंतन पुढे अनंतकाल चालू रहातं. यानंतर उलगडत जातात असंख्य पदर, एखादा भरजरी गालिचा उलगडत जावा तसे! "Beggars are not choosers" या जळजळीत शब्दांनी कुणीतरी शिसाचा उकळता गरम रस कानात ओतलाय अशी स्थिती खचितच कोणाचीही होइल. पण परिस्थितीच्या जोखडाला झुगारून तीच परिस्थिती आपल्या बाजूनी फिरवून घेण्याचं सामर्थ्य कोणात असतं? अक्षरश: गूढ वाटत रहावं असे हे काही पैलू क्षणभरातच डोळ्यांपुढे साकार होतात. एका क्षणात आपल्या पदाचा राजीनामा देऊन अज्ञातात उडी मारण्याचं धैर्य तुम्ही कुठून मिळवलतं? स्वाभिमानाने जगण्याची दीक्षा कुठल्याही शाळेत मिळत नाही हे ज्ञान तुम्हाला कुठून झालं? अविश्रांत परिश्रम करून हाती घेतलेलं कार्य तडीला नेण्याचं अजब रसायन तुम्हाला कुठे साधलं आणि कुठेही गेलो तरी ईश्वराचा हात मला सावरण्यासाठी सरसावणार आहे ही ज्वलंत धारणा तुम्ही कशी जोपासलीत? सारचं स्वप्नवत. पण एक मात्र नक्की, त्यानंतरचा प्रत्येक क्षण एक आव्हान असावा. "रात्रंदीन आम्हा युद्धाचा प्रसंग" अशी काहीशी तुमची आणि तितकीच आजीचीही स्थिती झाली असेल. पण या सार्‍या खडतर परिस्थितीतून तुम्ही स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलतं. शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक या सार्‍याचं क्षेत्रात मानबिंदू म्हणुन ओळख निर्माण केलीत. पुरूषार्थालाही क्षणभर हेवा वाटावा असं विस्मयचकीत करून सोडणारं काही तुमच्या हातून घडलं आणि याला बहूतेक उत्तर एकचं. दुर्दम्य इच्छाशक्ती!

अलकेमिस्टमधलं एक वाक्य मला नेहमी भुरळ पाडतं.

When you really want something, the whole universe conspires in helping you achieve it.

कधीतरी वाटत की एखादं उत्तुंग व्यक्तीमत्व किंवा कार्य घडवायचं म्हणुन नियतीचं हा सारा खेळ मोडते आणि मांडते.

पुढे रामदास कोरान्ने हे नाव सर्वश्रूत झालं. कस्तूरीमृगाचा गंध खूप दूरून यावा तशी कीर्ती चहूकडे पसरायला लागली आणि माणसांचे अक्षरश: लोंढे फुटले. हे सगळ घडलचं, ते घडणारचं होतं. पण त्या आधी तुम्ही केलेली कठोर तपस्या आणि त्यासाठी आजीनी दिलेली सुयोग्य साथ विसरून कशी चालेल? वेळप्रसंगी अर्धपोटी राहून, लोकांच्या चोळ्या शिवून आजी तुम्हाला हातभार लावत असे. पण हे असूनही आजी समाधानी होती. तुम्ही करत असलेल्या कष्टांची जाणीव आणि तुमच्या कर्तृत्वावरील विश्वास ही झाली समाधानाची एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे आयुष्याकडे पहाण्याचा तरल आणि निरालस दृष्टीकोन. सुदाम्याचे पोहे तन्मयतेने ग्रहण करू शकणारी व्यक्तीच द्रौपदीच्या थाळीतून निर्माण होणार्‍या सुग्रास भोजनाचा आनंद घेऊ शकते हे सत्य तिला नेमकं ठाऊक होत असं म्हटलं तर त्यात वावगं का ठरावं?

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् ।
न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता ।
चिदानंदरुप शिवोहं शिवोहं

सार्‍या घराचा आपल्या राबत्या हस्तस्पर्षानी कायापालट करणारी सचेतना, सात्विक आणि रुचीसंपन्न हातांनी भावी पिढीचा पिंड घडवणारी साक्षात अन्नपुर्णा आणि तुमच्या कर्तृत्वाला आपल्या असामान्य मानसिक बळानी चेतविणारी आणि तो निखारा फुलवत ठेवणारी निर्विकल्प प्रेरणा पाठीशी सदैव उभी होती म्हणुन एक असामान्य कर्तृत्व घडलं आणि एकेक सरता दिवस रामाला समर्पित करून तुमची वाटचाल अखंड चालू राहीली.

पुढे चहूबाजूनी विद्यार्थी येऊ लागले. व्याप्ती वाढली. तुमच्या ज्ञानाचा व्यास तर दिवसागणिक वाढतच होता. साता समुद्रापलीकडून वर्डस्वर्थ, टेनिसन, जॉर्ज बर्नार्ड शॉ, शेक्सपीअर हे दिग्गज थेट तुमच्या जिव्हेवर येऊन वास्तव्यास राहीले. तुम्ही शिकवलेला शेक्सपीअर अनेकांना भुरळ घालु लागला. वर्डस्वर्थच्या कवितांना तुमच्या संवेदनशील मनाचा साज चढला. पण इंग्रजीला तिच्या स्वभावसिद्ध वैशिष्ठ्यांसकट फुलवतांना मराठीचा मृदगंध कधी उणावला नाही. तुमचं मराठी साहित्यिक आणि साहित्याशी असलेलं नातं दृढ होत गेलं. 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', 'भावबंधन' याची ओढ मातेच्या दुधाइतकीच सकस आणि सात्विक राहीली. ज्ञानार्जन करत असता सामाजिक बांधिलकीही जपली पाहीजे या भावनेतून तुम्ही तुम्हापास येणारा कोणीही विद्यार्थी कधी रिक्तहस्ते जाऊ दिला नाहीत. कित्येक गरजू विद्यार्थ्यांना विनाशुल्क ज्ञानार्जन केलतं. कष्ट आणि सुबुद्धी एकत्र नांदतेय हे पहाताच कुबेरानी आपल्या धनाची बरसात केली. सगळीकडे आर्थिक समृद्धी नांदायला लागली. कुबेराचं धन ते कमी कसं होणार? ते वृद्धींगत होत गेलं आणि पुढे पुढे तर व्याप्ती इतकी वाढली की धन मोजायला माणसं नेमावी लागली. हा निसर्गनियम आहे असं म्हणायला हरकत नाही. समृद्ध व्यक्तीकडे नाना तर्‍हेची माणसं येतात. त्यातली बहूतांशी स्वार्थ साधून दूर निघून जातात. म्हणून कळकळीनी एक वाटतं की तुम्ही इथे थोडसं जपलं असतं तर? पैसे वाजवून घेणारे आयुष्यात अनंत मिळतात म्हणून माणसं घेतांना ती माणसचं वाजवून घेतली पाहीजेत. पण ते तुम्हाला साधत नव्हतं. साहजिक आहे, तुकारामाची जातकुळी असणार्‍यांना सगळीकडे विट्ठलचं दिसणार.

तुमच्या अध्यात्मिक कालखंडातील प्रसंग काही स्नेह्यांकडून, काही आईकडून ऐकले आणि चित्र डोळ्यांपूढे उभं राहीलं ते असं. आई सांगत होती. जिथे अप्पा प्रवचन करीत तिथे अशी तुडुंब गर्दी होत की माणसं रस्त्यावर मुग्ध होऊन उन्हापावसाची पर्वा न करता ऐकत. लक्ष्मण महाराजांचा मठ हे त्यातलं एक उदाहरण. सगळा खारीवाव रोड गर्दीने फुलून गेला होता. असे अनेक प्रसंग. प्रत्येक प्रसंग हा एक दृष्टांत म्हणावा लागेल इतका ज्वलंत.

ऐक. दिंडोरकर महाराजांच्या मठात गुढीपाडवा ते रामनवमी तुलसी रामायणाचं प्रवचन चालू होतं. चैत्र शुद्ध अष्टमीचा दिवस. प्रवचनाच्या समाप्तीला एक दिवस बाकी राहीला होता. सगळा सभामंडप गर्दीने फुलला होता. अप्पांच्या वाणीत साक्षात सरस्वती अवतरली होती. माणसं ते विवेचन ऐकून आनंदाने गहिवरली होती. स्त्रिया लहान पोरांना दटावत होत्या. जमेल तेवढ कानात आणि मनात साठवून घ्यायचा प्रयत्न करीत होत्या. पोरं सुंठवडा मिळणार म्हणुन आनंदात होती. सारेजण प्रवचनात तल्लीन झाले होते आणि कोणालाही कल्पना नसतांना अचानक एक प्रचंड वानर रामाच्या मूर्तीच्या दिशेने झेपावलं. एकच गलका झाला. कोणाला कळेना काय करावं? अप्पा मात्र स्तब्ध होते. त्यांनी लोकांना शांत रहाण्याची खूण केली. हात जोडले. त्या वानरानी क्षणभर रामाच्या मूर्तीकडे पाहीलं, अप्पांकडे एक कटाक्ष टाकला आणि आलं होतं तसचं परत फिरलं. माणसं आताशा काय घडलयं हे कळण्याइतपत सावरली होती. अनिमिष नेत्रांनी प्रत्येकानी ते दृष्य पाहीलं आणि अप्पांच्या पायांवर लोटांगण घालण्यासाठी ही गर्दी जमली.

पण या सगळ्याचा कळसाध्याय गाठला गेला तो साठीच्या वेळेला झालेल्या अखंड रामनामाच्या दिवशी. अजूनही तुला सांगते आठवण आली तरी अंगावर सरसरून रोमांच उभे रहातात. त्याचं झालं असं. दिवसभर अखंड चालू असलेल्या रामनामाचा कैफ चढला होता. माणसं तहानभूक हरपली होती. समूहानी एकसूर गाठला होता. एकताल गाठला होता आणि मध्यरात्री अप्पा हातात चिपळ्या घेऊन उभे राहीले. गळ्यातला ताल आता पायात उतरला होता. पावलं रघुनंदनाचे गुण गाता गाता नाचायला लागली होती. डोळे मिटलेले. उन्मनी अवस्था. झांजा निनादत होत्या. चिपळ्या खणाणत होत्या. प्रत्येक आवर्तनाबरोबर आत्म्याला आहुती पडत होती. आंतराग्नी चेतवला जात होता. अभावितपणे अप्पा गायला लागले. मन एककल्ली झालं होतं. "मंगल भवन अमंगल हारी" च्या सुरांनी वास्तु पावन होत होती. आणि डोळे उघडतात तर चारी दिशांतून शेंदरी प्रकाश व्यापून राहीलेला. जयघोष झाला. दृष्टांत झाला. देवाच्या पायाशी बांधलेली पूजा सफल झाली. रामाच्या नामाशी केलेली सोयरीक अजूनच दृढ झाली. तोच शेंदरी प्रकाश मनात अवतरला आणि सगळीकडे दैवी तृप्ती झाली.

अंत:काली रामानीच आपल्या या दासासाठी "अकाल मृत्यू हरणम्" हे ब्रीद सत्य करून दाखवलं. आपला कार्यभाग आता संपला, राममय होण्याची घटका समीप आली हे अप्पांनी ओळखलं आणि अन्नत्याग सुरू केला.

शेवटचा श्वास! एकच! सार्‍या संचिताचं एका क्षणात दर्शन घडवणारा! या श्वासासोबत एक दिव्य मूर्ती डोळ्यांपुढे प्रकटली, खूणगाठ पक्की बसली. भारलेल्या अवस्थेत अप्पांनी हात जोडले आणि अंतरात्म्यातून शब्द फुटले.

बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा
सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे......

आणि आज म्हातारी खोडं निघून गेल्यानंतर आम्हाला जाणवतं की त्यांचा जन्म फक्त जळण्यासाठी नव्हता. खोडं म्हणायचं कशासाठी? त्यांच्या फार खोडी असतात म्हणुन? नव्हे. त्यांच्यावर भार टाकून आपण खोल समुद्रात तरंगत होतो याची जाणीव ते खोड निसटल्यानंतर होते. पण एके दिवशी अचानक ते खोड निसटतं. फुकट मिळणार्‍या गोष्टींची किंमत जाणवायला लागते ती इथे. नाकातोंडात पाणी जायला लागल्याशिवाय श्वासांचं महत्व कळत नाही म्हणतात ते असं.

हे चिंतन इथे संपत नाही. मात्र आता या पुढच्या प्रवासासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी. बघूयात काही हरवलेलं गवसतयं का? कुठलाही प्रतिकार न करता कधीतरी मनात घोळणार्‍या विचारांबरोबर निर्धास्त वहावत जायचं. काळाच्या आड गेलेल्या कित्येक गोष्टी आठवतात. त्या गोष्टींभोवताली गुंफलेलं त्या काळचं आपलं विश्व आठवतं. अचानक थकल्या भागल्या मनाला तरारी येते आणि त्या आठवणींबरोबर दोन घटका सुखाने व्यतीत होतात. स्वत:भोवती निर्माण केलेलं बेगडी अस्तित्वाचं कवच गळून पडतं आणि असं वाटत की

चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते....
पुन्हा एकदा सांधते आहे
अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या....

असचं वहात जाता जाता मी जाऊन पोचलो बडोद्याच्या घरी. बडोद्याचं घर! माझ्या डोळ्यांनी पाहीलेलं बडोद्याचं घर! बडोद्याच्या घरात आताशा अंधार आहे. आजीचा तांब्याचा बंब धूर ओकायचा थांबून बरीच वर्ष झाली. समोरचा झाप्याचा दरवाजा गंजायला लागला. तो माडीकडे जायचा मोडलेला जिना शेवटच्या घटका मोजतोय. ज्या देवघरातल्या देवांना धृवतार्‍याचं स्थैर्य होतं, त्यांचं स्थानही कालचक्राने बदललं. ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या पानांच्या चिंध्या झाल्या आणि तुमच्या कष्टांची आणि कर्तृत्वाची धार बघितलेली ती वास्तु पोरकी झाली.

तुम्ही मात्र अजरामर झालात....आमच्या विचारांतून, आमच्या भाषेतून, आमच्या संस्कारांतून तुम्ही अजून जिवंत आहात याचा साक्षात्कार आम्हाला होतो, दर क्षणी होतो आणि हा प्रवाह फोफावत असाच पुढे पुढे जाणार आहे. साक्षात्कार अशासाठी कारण साक्षात्कार येतो तोच मुळी प्रत्येक वेळी नाविन्याचं लेण लेऊन! अनुभव शिळे होतात पण साक्षात्कार अबाधित रहातात. आमच्या विचारांमध्ये तुम्ही नकळत जे प्रगल्भतेचं बीज पेरलतं त्याचा आता कल्पवृक्ष झालाय. वृक्षाची उंची त्याचा घेर किती मोठा आहे याही पेक्षा त्याची मुळं किती भक्कम आहेत यावर ठरत असते ही शिकवण तुम्ही मला दिलीत. तसं पहायला गेलं तर तुम्ही कल्पवृक्षचं होतात! तुम्हापास येऊन कोणी विद्यार्थी, परका, नातेवाईक किंवा अगदी एखादा तर्‍हेवाईक, रिता गेलाय असं कधी झालं? हे असं झालं नाही याचं कारण तुम्ही जाणलं होतं आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते, इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते. किती जणांना जगवलतं कितींना जिंकवलत! यातून आम्हाला शिकण्यासारखी गोष्ट एकच आणि ती म्हणजे दूसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही.

आज सूर्य मावळला. पण सूर्य मावळला तरी उरतो संधीप्रकाश, सूर्याचं अस्तित्व बराच काल जपणारा! तसचं काहीसं झालं. बडोद्याच्या घरी गेल्यावर अचानक चारही बाजुंनी आवाज घुमायला लागले.

मी थरारलो.
बाळ, अरे घाबरू नकोस.
मी अजून जिवंत आहे.
कोण? मी विचारलं.
मी वास्तु!

माझ्या कर्त्याच्या सार्‍या गोष्टींना मी आजवर तथास्तु म्हणत आलो. तितकीच माया आणि जिव्हाळा मला माझ्या कर्त्याने दिला. दिवसरात्रीचे प्रहर पाहीले. प्रहार सोसले. आनंद उपभोगले. अनेक विधायक, मंगल कार्यांचं पहीलं पाऊल पडलं ते या वास्तुतून! लहान थोर सारे समानतेनी वागवले. या घरात किणकिणणार्‍या पोरी....... त्यांचं बालपण जपलं डोळ्यात तेल घालून आणि बालपण फुलल्यावरती त्यांची बाळंतपणं केली तळहाताचा पाळणा करून! कुणी कधी दुर्मुखलेला पाहीला नाही आणि दुर्मुख होऊन दारावरून परतलेला तर नाहीच. सणासुदीला पुरणपोळीसाठी शेर शेर तुपाच्या धारा वहायच्या. सगळीकडे तृप्ती ओसंडून वहात होती. कित्येक दैवी कलाकारांना या डोळ्यांनी पाहीलयं. त्यांचं हास्य, आवाज, विचार, विनोद, गप्पा कानात अजून तशाच जिवंत आहेत. नाना महाराजांची समाधी लागली ती याच वास्तुत आणि बालगंधर्वांचा जोहार रंगला तो ही इथेच! आज मी समाधानी आहे. समृद्ध तर होतोच. पण आज माझ छ्त्र हरपलं. माझा वाली गेला. माझा कर्ता गेला. अरे, शेक्सपीअर आणि गडकरी या भिंतीनी जिवाचे कान करून ऐकलाय आणि आज कुणी आपलं दिसताच या भिंतींना फुटल्यात अगणित जिव्हा! असं वाटतं की भरभरून द्यावं पण ते दान घेण्यासाठी रित्या झोळीनी आणि निरागस नेत्रांनी कोणी आमच्याकडे परत येईल याची शाश्वती नाही. ज्या डोळ्यांनी एक सुवर्णयुग निर्माण होतांना पाहीलं ते डोळे हे कलियुग पाहून आता थकले.

ठाऊक आहे मला. ठाऊक आहे की मला कोणी वारस नाही. पण तरीसुद्धा मी आज उभा आहे फक्त एक चिरंतन वारसा जपण्यासाठी! अनेक प्रश्न अजून तसेच अनुत्तरीत आहेत. कित्येक कोडी पडलीयत. पण आज त्यांचं उत्तर देणारा आम्हापास कोणी नाही.

अचानक शांत झालं. या जीवघेण्या शांततेत दूरून कुठूनतरी स्वर कानी येत होते.

पक्ष्यांची घरटी होती
ते झाड तोडीले कोणी
प्रत्येक ओंजळीमागे
असतेच झर्‍याचे पाणी

घर थकलेले सन्यासी
हळुहळु भिंत ही खचते
आईच्या डोळ्यांमधले
नक्षत्र मला आठवते

मनातली अस्वस्थता शिगेला जाऊन भिडली. डोळ्यांतून अश्रु वाहू लागले. क्षणभर असं वाटलं की थंड पडलेली चूल पुन्हा धडाडून उठेल. धूर ओकणारा तो बंब पुन्हा पेटून ऊठेल. देवघरातली कृष्णाची मूर्ती पुन्हा ते बाळसं धरेल. स्टडीरूम मधून पुन्हा तुमचा आवाज येईल आणि क्षणार्धात या खचलेल्या भिंती उठून उभ्या रहातील.

खिन्न होऊन ओसरीपर्यंत आलो आणि बाहेर पडणार इतक्यात पुन्हा एकदा पुसटसे शब्द कानावर आले.
To be or not to be, that is the question.To be or not to be, that is the question.............
त्यानंतर बराचं काळ ते शब्द भिंतीतून घुमले. घुमत राहीले.........





........आज मी काहीसा अस्थिर आहे.
कारण तेच शब्द अविश्रांत लांबवरून येतायत. अगदी ईंग्लंडपर्यंत!
शेक्सपीअरच्या भूमीत रस्त्यावरून चालत असता अचाट विचार डोक्यात येतायत.
"Uneasy lies the head that wears a crown" या उक्तीचा अर्थ आता उमगलाय.
अनेक कोडी पडलीयत. कित्येक प्रश्न अजूनही तसेच अनुत्तरीत आहेत.
पण सध्या तरी एकच प्रश्न ऐरणीवर आहे
आणि आज त्याचं उत्तर देणारा माझ्यापाशी कोणी नाही.


To be or not to be, that is the question.
To be or not to be, that is the question.



केदार केसकर

1 comment: