Sunday, February 6, 2011

'तोडी'ची गोडी!

रविवारची निवांत सकाळ, हवेत असलेला गारठा, धुक्यातून पसरत जाणारी कोवळी किरणं आणि अशा प्रसन्न वातावरणात भिनलेल्या 'तोडी'च्या सूरांनी २६ डिसेंबरची सकाळ अविस्मरणीय झाली. डॉ. शोभाताई अभ्यंकर आणि शिष्यपरिवारातर्फे आयोजित 'तोडी'चे प्रकार या अनौपचारिक कार्यक्रमात 'तोडी'चे बरेचसे अप्रचलित आणि काही प्रचलित प्रकार सादर करण्यात आले. गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे पुणेकरांना तोडीचे अनवट प्रकार ऐकण्याची सुसंधी लाभली. कोमल रिषभ आसावरी तोडी, जौनपुरी तोडी, देवगंधार तोडी, गांधारी तोडी, जयवंती तोडी, सालग वराळी तोडी, देसी, लाचारी तोडी, अबीरी तोडी, भूपाल तोडी, बिलासखानी तोडी, मियॉं की तोडी, हुसैनी तोडी, खट तोडी, बहाद्दूरी तोडी, गुजरी तोडी असे तोडी रागाचे एकूण सोळा प्रकार या वेळेस सादर करण्यात आले. प्रत्येक रागाच्या सुरूवातीला त्या रागाचे शास्त्रशुद्ध विवेचन, रागाचा स्त्रोत, रागाचे स्वरूप, रागातील महत्वाच्या जागा, रागविस्तारातील अपेक्षित अंग आणि त्याचे जुने संदर्भ शोभाताईंनी संगीतरसिकांपुढे मांडले. अनेक संगीतप्रेमींना हा कार्यक्रम त्यांच्या संगीत अभ्यासासाठी चालना देणारा ठरला. संगीतकार केदार पंडित, डॉ. अरविंद थत्ते, पं. संजीव अभ्यंकर, डॉ. सुचेता बिडकर, डॉ. सुहासिनी कोरटकर, डॉ. शीतल मोरे यासारखे अनेक मान्यवर व संगीतज्ञ ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

शोभाताईंची संगीतातील शिस्त आणि अभ्यास त्यांच्या शिष्यांच्या सादरीकरणातून दिसून येत होता. प्रत्येकातील सर्जनशीलतेला योग्य तो वाव मिळूनही शिस्तबद्ध गाणं कसं असतं याचं उत्तम उदाहरण या कार्यक्रमाद्वारे रसिकांसमोर आलं. मीनल जोशी, मृण्मयी फाटक, नेहा दिक्षित, तेजश्री पिटके, मनिषा श्रीखंडे यांनी बर्‍याचश्या बंदिशी एकत्र सादर करूनही त्या एकसंध, एकसूर वाटल्या. त्या सादरीकरणात कुठेही अनपेक्षित आक्रमकता, सूरांची चढाओढ नव्हती तर सुसंवाद होता. संवादिनीवर श्री. सुयोग कुंडलकर व तबल्यावर श्री. अरूण गवई यांनी सुरेख साथसंगत केली. संहितेची अत्यंत प्रवाही पण योजनाबद्ध आखणी, रागांची संक्षिप्त पण सर्वसमावेषक मांडणी, त्यातून स्पष्ट होणारा स्वतंत्र विचार आणि तरीही सादरीकरणातील मतैक्य यामुळे हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीला जाऊन पोहोचला. ज्यावेळेस कार्यक्रमाची सांगता गुजरी तोडी रागातील तराण्याने झाली त्यावेळेस सूरांच्या या अद्भूत प्रत्ययामुळे हरखून गेलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. 'तोडी'ला तोड नाही याची प्रचिती देणारी ही तोडीची सकाळ रसिकांसाठी दीर्घकालीन आनंदाचा ठेवा ठरली यात शंका नाही.

केदार केसकर

No comments: