Friday, October 7, 2011

कोसला

भालचंद्र नेमाड्यांची 'कोसला' हा एक अंगावर येणारा अन् चिरस्मरणीय अनुभव आहे. ही कादंबरी मी फार पूर्वीच वाचली होती पण आज त्याच्यातील 'मनीचा मृत्यू' या कथानकाचा काही भाग सहज डोळ्यांपुढे आला. पु.लं.नी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मृत्यूचे इतके नितळ दर्शन यापूर्वी खरंच कधीही पाहीले नव्हते. पुन:प्रत्ययाचा आनंद इतका असीम आणि टोकाचा असू शकतो हे 'मनीचा मृत्यू' पाहिल्यानंतर (मी "वाचल्यानंतर" असे म्हणणार नाही) जाणवलं. त्याचाच भाग तुमच्यासाठी खाली देत आहे.

केदार केसकर

ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.


आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.


दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.


पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.

...

मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.

फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.

मग ती हात सोडा म्हणाली.
तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?
तेव्हा मनी बोललीच नाही.
आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.
पण ती आईशी बोललीच नाही.
आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?
तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.
लाल साडी.
हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो?
तिला मी आठवलो असेन. लाल साडी.
हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.

मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?
हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्‍या झाल्याच होत्या.

आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?
मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.
मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.
आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ
आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.
मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.
तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.
डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.
आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.

आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.

मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?
मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.
मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.
मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.
मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.
मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन.
मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.

...

आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास.
...

तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ.
...


कादंबरी - कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे

1 comment:

sonal m m said...

mi ticha jagna jagle. me ticha maran anubhavla. khol mateet bharun rahilela andhar ughdya dolyanni pahila. mateecha asaa vaas kadhich navhata anubhavla aajparyta...shabdanpalikadcha anubhav shabdat bandist karun jasachya tasa pohochla majhyaparyanta. 'bhayanak' ha shabdahi thita padava...