Thursday, February 10, 2011

"प्रेटी वुमन"

आज खूप दिवसांनी "प्रेटी वुमन" पाहीला. पूर्णपणे त्यात हरवून गेलो. त्यातील सार्‍याच कलाकारांच्या अभिनय सामर्थ्यापुढे शब्द थिटे. जुलिआ रॉबर्ट्स आणि रिचर्ड गेअरनी रंगवलेल्या भुमिका केवळ अविस्मरणीय. काही काही सीन खूप आवडले. रात्रभर आता त्याचाच विचार करत राहीन. विविअनच्या (जुलिआ रॉबर्ट्स) तोंडून उमटलेले ते दोन शब्द "he sleeps..."... भावना नुसत्या ओतप्रोत भरून राहील्यात या शब्दांत. तिची ते शब्द उच्चारण्याची किमया तीच करू जाणे.

एडवर्ड शेवटी विवियन निघून जातांना एक वाक्य बोलतो, "I never treated you like a prostitute."
विवियन हळू आवाजात बोलते. "you just did!"

अंगावर काटा येतो. हा सिनेमा आहे. पण खरोखर वेश्याव्यवसायात असलेल्या मुलींच्या पदरी किती उपेक्षा आणि अपमान पडत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. आणि शेवटी तिला तो लाभतो त्यावेळी मला अतोनात आनंद होतो. एका गरीब मुलीला इतकी सुखं मिळतील अशी स्वप्नातही आशा नसते. पण तिला ते प्रेम मिळतं, जोडीदार मिळतो. शेवटी वेश्येतही एक स्त्री असते, हा सांगण्याचा मतितार्थ. आयुष्य कधी कोणते रंग दाखवेल काही सांगता येतं नाही. म्हणून दु:खासाठी स्वत:ला तयार करण्यासोबत, सुखाचं स्वागत करण्यासाठी कायम तयार रहाणं हे ही तितकचं योग्य.

पुन्हा प्रत्येक पुरुष एका "प्रेटी वुमन"च्या शोधात असतोच. कुणाला आई, कुणाला बायको, कुणाला बहीण, कुणाला अजून कुणी तरी. स्त्री च्या भुरळ घालणार्‍या असंख्य रूपांपैकी कुठलं रूप कोणाला भावेल सांगता येणं कठीण आहे. आज "प्रेटी वुमन" पाहील्यावर "प्रत्येक स्त्रीरूपात एक प्रेयसी दडलेली असते" असं म्हटलं तर ते अयोग्य ठरायला नको.

केदार

3 comments:

Anonymous said...

नमस्कार.
आधी पिकासावरचे तुझे फोटो. जपानमधले. मग लिंक्ड इन. तिथे मिळालेला तुझ्या (चक्क) मुलाखतीचा दुवा. त्यातून कळलेलं अनपेक्षित असं बरंच काही. मग आपोआपच तुझा ब्लॉग.
तू वाचतोस. बघतोस. ऐकतोस. (कदाचित गातोसही..) लिहितोस. आठवणीत हरवतोस. हळवा होतोस. कृतज्ञ होतोस. ती कृतज्ञता सुरेख शब्दात व्यक्त करतोस.
परिच्छेदाची सुरुवात सॉनेटने करून थेट श्रीराम राम रघुनंदन राम राम वर येतोस. वाचकालाही नेतोस.
तुझं आप्पांचं व्यक्तीचित्रण आणि 'अव्यक्त' हे दोन लेख खासच. विशेषतः 'तिडीक म्हणजे तिरस्कार पण पोटतिडीक म्हणजे माया' हे.
अजून लिही. खूप सघन लिहितोस. त्यामुळे भरपूर लिही असं नाही म्हणत. पण लिहित राहा.
शुभेच्छा
योगिनी नेने

Kedar said...

बर्‍याच वेळा मनात असूनही काही गोष्टी जमत नाहीत. तुझ्या अभिप्रायाला उत्तर पाठवायचं राहून गेलं ते त्यामुळेच. कामाचा व्याप प्रचंड वाढलाय. क्षणाचीही फुरसत नाही. हा सारा आटापिटा कशासाठी चाललाय हेच काही वेळेस उमगेनासं होतं. हरवलेपण येतं. असो.

तू स्वत: इतकं सुंदर लिहीत असतांना माझं कौतुक तू करावस याचं मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहीलं नाही. तुझ्या शब्दांची मांदियाळी छान आहे. शेवटी आपण सारेच पार्ले टिळकचे विद्यार्थी हेच त्यातून मला जाणवले. पण मला खरचं खूप आनंद झाला. आपण लिहीलेले कुणाला तरी आवडले आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे पटले याचा आनंद वेगळाच असतो. माझ्या मुलाखतीत जे लिहीलेले आहे ते सारे शब्द-न्-शब्द सत्य आहे. पण हेच त्यावेळेस जर मी कुणास सांगितले असते तर मला वेड्यात काढण्यासाठी असंख्य हात वर झाले असते. शेवटी प्रतिकूल परिस्थितीतून जाऊनही आपण आपल्यासाठी काही करून दाखवू शकलो हे महत्वाचे. या सार्‍यात देवाचा हात आहे, मित्रांचा आहे, हितचितकांचा आहे, आई-वडिलांचा तर सर्वात मोठा. अजून तर हातून काहीच झालेले नाही. ते घडावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत हीच इच्छा सदैव असते. परवाच मी ह्यूस्टनवरून परत आलो. त्या प्रवासाची डायरी हे बहूतेक माझ्या ब्लॉगवरील पुढील प्रकरण असेल.

माझा लिंक्ड-इन वर एक ग्रूप आहे. त्यात काही जुने मित्र-मैत्रिणी आहेत. परवाच मला नविन भालेराव चा मेल आला होता. बघू नेटवर्क पुन्हा फॉर्म होतय का? तरूणपणातील आणि उमेदीच्या काळात सुख-दु:ख वाटून घेणे महत्वाचे... म्हातारपणी असतातच स्नेहमेळावे... (त्यातून स्नेह वृद्धींगत होतो का ती फक्त एक गरज बनून रहाते हे ठाऊक नाही?)

तुझ्या अभिप्रायाबद्द्ल (आभार आणि धन्यवाद फार काटेकोर शब्द वाटतात) मनापासून थॅंक्स.

केदार

इनिगोय said...

लेखन हे श्वासाइतकं सहज असण्यापासून ते लेखन ही एक गरजेची पण न लाभणारी गोष्ट होण्याएवढे दिवस संपले. तळ्यात कोणीतरी दगड टाकला, तरच त्यात तरंग उठतात. तळं स्वत:हून वलयं उमटवत नाही. तसं झालंय अलीकडे. प्रतिक्रियात्मक, कोणाला तरी उद्देशून असं लिहिणं झालं तर होतं. पण स्वत: स्वत:पाशी व्यक्त होणं आता आठवणीत उरलंय.

सूर थोडा उदास वाटत आहे खरा. पण वैफल्याचा नक्कीच नाहीये. तळहातावर घेऊन बघितलं तर आयुष्य आठही अंगांनी अगदी सुबक, रेखीव दिसतंय. पण गाभ्यातली चिमूटभर जागा रिकामीच का वाटते मग? आणि त्या चिमूटभर जागेची जाणीव अशी अचानक सरसरून झाली, की मग मला न विचारता, माझी पर्वा न करता त्या चिमटीत अख्खं आयुष्य कसं भिरकावलं जातं?

कसं काय, हे विचारल्यावर, अगदी मस्त हे (खरं खरं) उत्तर येतं. पण ते तसं मस्त वाटणं राहत का नाही मनभर? याचं उत्तर शोधताना सगळं आयुष्य कानाकोपऱ्यातून चाचपून पाहत असते. अलीकडे असं चाचपून बघताना एका परीघाची जाणीव व्हायला लागली आहे. असा परीघ ज्यात सगळं आयुष्य सामावलंय, हाताभराच्या लांबीवर. कोणत्या दिशेला हात लांबवला की कशाचा स्पर्श होणार याचं उत्तर दर वेळी तेच येणार - अगदी अचूक. इकडे अंगण, तिकडे माजघर, या बाजूला कोठी, त्या तिथं तुळस. आणि इकडे आड, तिकडे विहीर. रहाट, गाडगं, सूपं, रोवळ्या, चूल, वैल, शेण, गोठा. मूल, बाळ. आला गेला. आता भरीस प्रोजेक्ट्स, डेड लाईन्स, सबमिशन्स, रिपोर्ट्स, क्वेरीज. या सगळ्यातलं काहीच 'त्या' चिमूटभर जागेपर्यंत पोचत नाही. मग ती रिकामीच. किंबहुना त्या जागेत नक्की आहे तरी काय, याचा शोध सुरूच.
ही कोवळीकही कधी कधी उसनी वाटावी, इतकी त्या ठिकाणी मी हरवून जाते.

दगड फोडून आतला जीव बाहेर काढण्याची किमया समर्थांनी केली. यंत्रवत सराईत जगताना मनाच्या होणाऱ्या दगडाला कोणता मोक्ष? परिघाच्या बाहेरच्या जगाची ओढ वाटत असूनही त्याबाहेर निघण्यासाठी लागणाऱ्या धाडसाचं रोप कसं रुजवायचं?
-आणि 'हे असले प्रश्न आपल्यालाच का पडतात' याचं उत्तर काय?
.
.
.
एवढ्या महिन्यांनी आणि त्यात हे असलं काहीतरी लिहिल्याबद्दल सॉरीही. आणि थोडसं का होईना लिहितं केलंस त्याबद्दल सॉरीपेक्षा भलं मोठं थँक्यूही.